BJP 
विश्लेषण

भाजपचा ऐतिहासिक विजय; गांधीनगरमध्ये काँग्रेसचा सुफडा साफ

सरकारनामा ब्युरो

गांधीनगर : गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगर महापालिकेत सलग दुसऱ्यांदा भाजपनं सत्ता मिळवली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत यावेळी भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवला असून 44 पैकी 41 जागांवर कमळ फुललं आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा सुफडा साफ झाला असून केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. तर आपने यावेळी खातं उघडलं असलं तरी केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

गांधीनगर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर 2011 मध्ये काँग्रेसनं सत्ता काबीज केली होती. त्यानंतर 2016 मध्ये भाजप व काँग्रेसला प्रत्येकी 16 जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजपनं सत्ता हस्तगत केली. त्यानंतर यावर्षी झालेल्या निवडणुकीत भाजपनं ऐतिहासिक कामगिरी करत काँग्रेसचा पराभव केला. भाजपला पहिल्यांदा एवढ्या जागा मिळाल्या आहेत.

एकूण 44 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने एकहाती विजय मिळवला आहे. महापौर पद हे अनुसुचित जातीसाठी राखीव होते. या जागेसह भाजपचे सर्व पाचही अनुसुचित जागेवरील उमेदवार विजयी झाले आहेत. मुख्यमंत्री बदलानंतर गुजरातमध्ये ही पहिली निवडणूक होती. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासाठी ही निवडणूक लिटमस टेस्ट मानली जात होती. यामध्ये त्यांना मोठं यश मिळालं आहे.

काँग्रेसने सर्व 44 जागांवर उमेदवार उतरवले होते. तर आपचे 40 जागांवर उमेदवरा होते. बसपाचे 14, राष्ट्रावादी काँग्रेसचे दोन, इतर पक्षांचे सहा आणि 11 अपक्ष उमेदवार रिंगणात होते. पण भाजपने 41 जागा मिळवत काँग्रेससह सर्वच पक्षांना धूळ चारली आहे. मागील वर्षी सुरत महापालिकेत काँग्रेसचा पराभव करत आपने 27 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे गांधीनगर महापालिकेच्या निवडणूकीत आप चमत्कार करेल, असा दावा पक्षाकडून केला जात होता. पण प्रत्यक्षात आपला केवळ एकच जागा मिळाली आहे.

गांधीनगरसोबत ओखा, भानवड आणि थारा या नगरपालिकांची निवडणुकही झाली होती. यापैकी भानवड नगरपालिका काँग्रेसनं खेचून आणली आहे. भाजपची मागील 1995 पासून या नगरपालिकेत सत्ता होती. काँग्रसने 24 पैकी 16 जागा जिंकत भाजपचा पराभव केला. भाजपला केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले. ओखा नगरपालिकेत भाजपने 36 पैकी 34 तर थारा नगरपालिकेत 24 पैकी 20 जागा जिंकत सत्ता मिळवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT