Raj Thackeray, Brij Bhushan Sharan Singh Sarkarnama
विश्लेषण

Raj Thackeray News : मनसेच्या परप्रांतीयांना विरोधाचा बृजभूषण यांनी लावला सोक्षमोक्ष

Brij Bhushan Sharan Singh : राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी, तरच त्यांना उत्तर प्रदेशात प्रवेश देण्यात येईल, अशी भूमिका खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी घेतली होती.

अय्यूब कादरी

Maharashtra MNS Political News : मराठी माणूस आणि भूमिपुत्रांचे हित केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली होती. त्याच्या सोबतीला हिंदुत्वही होतेच. मनसेच्या या भूमिकेमुळे अनेकवेळा संघर्षाचे प्रसंग निर्माण झाले. उत्तर भारतीय आणि बिहारी नागरिकांना मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे, तर विधिमंडळात आमदारकीची शपथ मराठीत घेतल्यामुळे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना मनसेच्या आमदारांनी मारहाण केली होती. आता मात्र मनसेची भूमिका मवाळ झाली आहे. उत्तर प्रदेशातील भाजपचे वादग्रस्त खासदार, कुस्ती महासंघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात अक्षरशः आग ओकली होती. मात्र, राज ठाकरे आणि मनसे त्यावेळी शांतच राहिले. (Raj Thackeray News)

उत्तर भारतीय आणि बिहारी नागरिकांमुळे महाराष्ट्रातील नागरिकांचा, तरुणांचा रोजगार हिरावला जातो, रेल्वे भरतीत उत्तर भारतीयांना अधिक संधी मिळते, असे मनसेचे आक्षेप आहेत. रेल्वेभरतीची जाहिरात मराठीत प्रसिद्ध करायला मनसेने भाग पाडले. उत्तर भारतीय नागरिक मुंबई, पुण्यासह राज्यभरातील विविध शहरांमध्ये येऊन मिळेल ती कामे करतात. अनेक कुशल कामे करवून घेण्यासाठी उत्तर भारतीय कारागिरांवर अवलंबून राहावे लागते.

उत्तर भारतीय नागरिक राज्यभरात विविध व्यवसायही करतात. अशा नागरिकांना मनसेने (MNS) काही वर्षांपूर्वी लक्ष्य केले होते. दुकानदारांवर हल्ले, उत्तर भारतीय कारागिरांना मारहाण, रेल्वे भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीयांना मारहाण असे प्रकार घडले होते. इतकेच नव्हे, तर उत्तर भारतीय, बिहारी लोकांच्या छटपूजा उत्सवालाही मनसेचा विरोध होता. छटपूजेला विरोध नाही. मात्र, या निमित्ताने काही उत्तर भारतीय नेते येथे येऊन राजकारण करतात, याला आक्षेप असल्याचे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्पष्ट केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज ठाकरे 2022 मध्ये अयोध्येला दर्शनासाठी जाणार होते. या दौऱ्याची घोषणा झाल्यानंतर मोठ्या घडामोडी सुरू झाल्या. उत्तर प्रदेशचे भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला. राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मुंबईत उघडपणे मारहाण केली, त्यांना अपमानित केले. त्यामुळे राज ठाकरे यांनी आता हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, त्यानंतरच त्यांना अयोध्येत प्रवेश दिला जाईल, अन्यथा त्यांना उत्तर प्रदेशात येऊ देणार नाही, अशी भूमिका बृजभूषण यांनी घेतली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊ नये, असे आवाहनही बृजभूषण यांनी केले होते. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली होती.

दरम्यान, राज ठाकरे यांची भाजपशी जवळीक निर्माण झाली होती. मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून त्यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात मोर्चा उघडला होता. असे असतानाही बृजभूषण यांच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केले जात होते. राज्यातील भाजपचे नेते राज ठाकरे यांच्या समर्थनासाठी उघडपणे समोर येतील, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही.

कालांतराने बृजभूषण यांनी आपली भूमिका सौम्य केली. मात्र, त्यांचा उद्देश तोपर्यंत साध्य झाला होता. राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या उत्तर भारतीयांच्या अपमानाचा हिशेब त्यांनी चुकता केला होता. बृजभूषण यांच्याविरोधात राज ठाकरे आणि मनसे आक्रमक होईल, असे त्यावेळी वाटत होते, पण तसे झाले नाही. (Latest Political News)

शिवसेनेने (Shivsena) अगदी सुरुवातीच्या काळत घेतलेल्या आणि नंतर त्याग केलेल्या भूमिकेचा राज ठाकरे स्वीकार करू पाहत होते. मराठी माणसाच्या हितासाठी या गोंडस नावाखाली घेतल्या जाणाऱ्या या भूमिकेने फारसे काही साध्य होणार नव्हते. मात्र, मतांच्या जुळवाजुळवीसाठी त्याचा उपयोग होणार होता. परप्रांतीयांना विरोधाची भूमिका कायदेशीरही नव्हती. बृजभूषण शरण सिंह यांनी एका झटक्यात परप्रांतीयांना विरोध या राज ठाकरे यांच्या भूमिकेचा सोक्षमोक्ष लावला होता.

त्यावेळी राज ठाकरे यांची भाजपशी उघड जवळीक सुरू झाली होती, तरीही राज्यातील भाजप नेत्यांनी बृजभूषण सिंह यांना विरोध केला नाही. निवडणुकीच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून भाजपला त्याचा फायदाच होणार होता. अशा तऱ्हेने मराठी माणसासाठी परप्रांतीयांना विरोध ही राज ठाकरे आणि मनसे यांची भूमिका जवळपास निकाली निघाली होती. असे असले तरी राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना विरोधाची भूमिका सोडली, असे म्हणता येणार नाही. मात्र, ती तितकी तीव्रही राहिली नाही, असे दिसत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT