विरोधी पक्ष एकमेकांच्या विरोधात राजकारण करतात, एकमेकांवर कुरघोड्या करतात. विरोधक एकमेकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करतात. अशाच प्रकारचे राजकारण पक्षांतर्गतही सुरू असते. किंबहुना, राजकारण, एकमेकांचे पाय ओढणे, कुरघोड्या करणे असे प्रकार पक्षांतर्गतच अधिक असतात, याची प्रचीती गेल्या दोन - तीन दिवसांपासून महाराष्ट्राला येत आहे. राज्याच्या सत्तेत अत्यंत सुरक्षित असलेल्या भाजपमध्ये असे प्रकार सध्या पाहावयास मिळत आहे.
मस्साजोगचे (ता. केज, जि. बीड) सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने महाराष्ट्र हादरून गेला. या प्रकरणातील आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. एक आरोपी अद्यापही फरारी आहे. खंडणी मागण्याच्या आड येत असल्याने संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या विरोधात बीड जिल्ह्यातील आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात राज्यभरात रान पेटवले होते.
सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांची अडचण झाली. आमदार धस हे रोज एक गंभीर आरोप पुराव्यांसह करू लागले होते. त्यामुळे मुंडे बॅकफूटवर गेले आणि केवळ आमदार असलेले सुरेश धस 'हीरो' झाले. सत्ताधारी महायुतीतील मंत्र्याच्या विरोधात धस हे भूमिका घेतात, याबाबत कुतुहल निर्माण झाले होते. मात्र पक्षातील वरिष्ठांच्या परवानगिशिवाय धस अशी भूमिका घेऊ शकत नाहीत, हे लोकांच्या हळूहळू लक्षात आले. असे असले तरी धस हीरो झालेच होते. पक्षात त्यांचे वजन वाढू लागले होते. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धस यांच्या वाढत्या वजनाला अखेर टाचणी लावली.
आमदार धस यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतली, आम्ही तिघे साडेचार तास एकत्र होतो, असा गौप्यस्फोट बावनकुळे यांनी गेल्या आठवड्यात केला. या माहितीमुळे सर्वांनाच धक्का बसला. धस यांच्या हेतूबद्दल शंका व्यक्त केली जाऊ लागली. गेले दोन महिने चर्चेत असलेले आमदार धस एकदमच बॅकफूटवर गेले. या भेटीची माहिती बावनकुळे यांनी सार्वजनिक का केली, अशी चर्चा सुरू झाली. हा धुराळा अद्याप खाली बसलेला नाही, त्यातच बावनकुळे यांनी पुन्हा बॉम्ब टाकला आहे. मुंडे आणि धस यांची भेट महिन्यापूर्वीच झाली आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
धनंजय मुंडे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे चार दिवसांपूर्वी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली, असे आमदार धस यांनी बावनकुळे यांच्या पहिल्या गौप्यस्फोटानंतर स्पष्ट केले होते. मुंडे यांची भेट घेतली असली तरी संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठीचा आपला लढा थांबणार नाही, असेही धस म्हणाले होते. आता बावनकुळे यांनी दिलेल्या नव्या माहितीनंतर आमदार धस यांची पुरती कोंडी झाली आहे. त्यांची विश्वासार्हता संपण्याचा धोका निर्माण झाला आहे. धस म्हणतात चार दिवसांपूर्वी मुंडेंना भेटलो, बावनकुळे म्हणतात ही भेट महिनाभरापूर्वीच झाली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सुरुवातीला मराठा विरुद्ध ओबीसी असे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. आमदार धस दररोज एक नवा आरोप करत होते, त्यामुळे काही ओबीसी नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. ओबीसी हा भाजपचा 'डीएनए' आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागे एकदा म्हणाले होते. धस जे बोलतात, अर्थात त्याला फडणवीस यांचा पाठिंबा आहे, असा संदेश समाजात गेला होता. त्यामुळे ओबीसी समाजात नाराजी निर्माण झाली होती का, ती दूर करण्यासाठीच बावनकुळे यांनी धस यांचा करेक्ट कार्यक्रम केला का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धस यांच्या भूमिकेमुळे मराठा समाजात देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा उजळून निघत होती. फडणवीस यांच्यामुळे आपल्याला आरक्षण मिळत नाही, ही मराठा समाजमनातील भावना पुसट व्हायला लागली होती. त्यामुळेच धस यांना मोकळीक देण्यात आली असावी. याद्वारे मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव कमी करण्याचाही प्रयत्न झाला. मग असे अचानक काय झाले की बावनकुळे यांची 'एन्ट्री' झाली आणि त्यांनी धसांची विश्वासार्हताच पणाला लावली? तीही एकदा नव्हे तर दोनदा! पहिला प्रयत्न अपुरा ठरला म्हणनू बावनकुळेंनी दुसऱ्यांदा धस यांना उघडे पाडले का?
संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण उचलून धरल्यामुळे आमदार सुरेश धस यांची लोकप्रियता वाढली होती. मराठा समाजात मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिमाही सकारात्मक व्हायला लागली होती. असे असले तरी ओबीसी समाजाच्या नाराजीचा 'फॅक्टर' भाजपला परवडणारा नाही. शिवाय पक्षांतर्गत कुरघोड्या आहेतच, राजकारण आहेच. तरीही आपल्याच आमदाराला असे दोनवेळा तोंडघशी पाडण्याचा अर्थ काय? भाजपमध्ये शीतुयद्ध सुरू आहे, असा त्याचा ढोबळ अर्थ होतो. त्यामुळे बावनकुळे यांच्या मनात चाललयं तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.