Nashik Political Analysis : चार भांडी एकत्र आली की आवाज होतोच, अशी म्हण ग्रामीण भागात आहे. कुटुंबात वाद सुरू झाले की ती वापरली जायची. राजकारणातही यापेक्षा वेगळे नसते. वर्चस्वाची, मान-सन्मानाची लढाई सुरूच असते. त्यातून रुसवे-फुगवे सुरू असतात. निवडणूक हा राजकारणाचा परमोच्च बिंदू असतो. त्यामुळे निवडणुकीच्या काळात नाराजी, रुसवे, फुगवे असे प्रकार घडत असतात. Chhagan Bhujbal Politics
महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसची मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांत भुजबळ यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दोनवेळा बाजू घेतली आहे. मुंबईतील होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली, त्यावेळी भाजप नेत्यांनी त्यासाठी उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरले होते. त्यावेळी भुजबळ यांनी उघडपणे उद्धव ठाकरे यांची बाजू घेतली.
बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना काही वाटले नाही का, अशी टीका मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला होता. त्याला हा प्रश्न राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारावा, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
लोकसभेच्या जागावाटपापासून महायुतीत धुसफूस सुरू झाली. सर्वेक्षणे नकारात्मक असल्याचा हवाला देत भाजपने महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी केली. शिवसेना सुरवातीला दबावात आल्यासारखी वाटले, मात्र नंतर त्यांनी आपला वाटा मिळवला. शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री शिंदे Eknath Shinde यांनी दबाव झुगारून लावला. राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र हे शक्य झाले नाही. नाशिकच्या जागेचा तिढा अनेक दिवस कायम राहिला.
महाविकास आघाडीच्या उमेदवाराने प्रचाराच्या फेऱ्या पूर्ण केल्या तरी नाशिकचा उमेदवार कोण हे ठरले नव्हते. नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्याविषयी नकारात्मक वातावरण आहे, असे सांगत त्यांना उमेदवारी देण्यास भाजपने विरोध केला होता. त्यापूर्वी अशाच प्रकारातून मुख्यमंत्री शिंदे यांना हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी रद्द करावी लागली होती. नाशिकच्या बाबतीत मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाम भूमिका घेतली.
दरम्यान, नाशिकची जागा राष्ट्रवादीला सुटणार आणि आणि छगन भुजबळ उमेदवार असणार, असे जवळपास निश्चित झाले होते. माझ्या उमेदवारीला दिल्लीतून हिरवा कंदिल मिळाला आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi आणि केंद्रीय मंत्री अमित शाह हे आपल्या पाठिशी आहेत, असा संदेश भुजबळ यांनी दिला होता. तरीही हा तिढा लवकर सुटला नाही, कारण खासदार गो़डसे यांनी नमती भूमिका घेतली नाही.
उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पिच्छा सोडलाच नाही. विद्यमान खासदार असताना हाही मतदारसंघ सोडला असता तर कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला असता, याची जाणीव मुख्यमंत्री शिंदे यांना होती. शिंदे ठाम राहिल्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीला माघार घ्यावी लागली आणि शिंदे गटाचे खासदार हेमंत गो़डसे Hemant godse यांना उमेदवारी मिळाली.
नाशिक लोकसभा लढवण्याची मानसिक तयारी भुजबळ यांनी केली होती. माझी उमेदवारी दिल्लीतून निश्चित झाली आहे, असे ते त्यामुळेच म्हणत होते. असे असतानाही जागा राष्ट्रवादीला सुटली नाही आणि उमेदवारी मिळाली नाही, यामुळे भुजबळ नाराज झाले असावेत. त्यातच राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या नाराजीत भर पडत असावी. बाळासाहेब यांच्या अटकेच्या प्रयत्नानंतर छगन भुजबळ यांनी 'मातोश्री'वर बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांची भेट घेतली होती. त्यावेळी तो विषय संपल्याचे बाळासाहेबांनी सांगितले होते, असे भुजबळ यांनी वारंवार सांगितले आहे. तरीही नुकत्याच झालेल्या प्रचारसभेत राज ठाकरे यांनी त्या विषयावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे हे महायुतीचेच घटक आहेत. तरीही ते भुजबळ यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची बाजू घेत असल्याचे दाखवून भुजबळ 'माइंड गेम' खेळत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नाक दाबले की तोंड उघडते, याप्रमाणे भुजबळ यांची नाराजी काम करून जाण्याची शक्यता आहे. उमेदवारी उशीरा जाहीर झाल्यामुळे नाशिक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे Rajabhau Waje यांच्यापेक्षा प्रचारात मागे आहेत. गोडसे यांच्या प्रचारात भुजबळ सक्रिय नसल्याचे सांगितले जात आहे. त्याबाबतचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले. त्यामुळे भाजपचे संकटमोचक म्हणवले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी भुजबळ यांची तातडीने भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, असे सांगितले जात आहे. भुजबळ हे नाराज असण्याचे कोणतेही कारण नाही, असे मंत्री महाजन यांनी नंतर माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. महजनांच्या भेटीनंतर भुजबळांची नाराजी दूर होते का, राज ठाकरे यांच्या टीकेचा रोख त्यांच्यावरून बाजूला होतो का, यायबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.