Chitra Wagh News : महाराष्ट्रातील कायदेमंडळाच्या वरिष्ठ किंवा ज्येष्ठ सभागृहाला विधान परिषद असे म्हणतात. या सभागृहात राजकारणासह विविध क्षेत्रांतील जाणकारांना, तज्ज्ञांना सदस्य म्हणून पाठवले जाते ते राज्याच्या हिताची चर्चा व्हावी, त्यातून काहीतरी चांगले घडावे यासाठी. अनेक मान्यवरांनी या सभागृहाचे सदस्यपद भूषवले आहे. हे आता सांगायची काय गरज आहे?, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. 'तुमच्यासारखे 56 मी पायाला बांधून फिरते...' असे विधान या सभागृहात गुरुवारी ऐकायला मिळाले. त्यामुळे हे सर्व सांगावे लागत आहे.
'तुमच्यासारखे 56 मी पायाला बांधून फिरते...' याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की तुम्ही माझ्या लेखी अत्यंत किरकोळ आहात. मी तुम्हाला मोजत नाही. तुम्हाला म्हणजे कोणाला? तर विधान परिषदेतीलच एका सदस्याला! राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या आणि मंत्री संजय राठोड हे एका तरुणीच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत, असा आरोप करून त्यांच्याविरोधात रान पेटवणाऱ्या, भाजपमध्ये आल्यानंतर ते सोयीस्करपणे विसरणाऱ्या चित्रा वाघ यांची ही 'डरकाळी' होती. या डरकाळीमुळे ज्येष्ठांच्या सभागृहाची प्रतिष्ठा धुळीला मिळाल्याचे काल पाहायला मिळाले.
सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. या दरम्यान दोन्ही सभागृहांतील कामकाज पाहिले तर अधिवेशनाची खरेच गरज आहे का?, त्यासाठी जनतेच्या पैशांचा चुराडा करण्याची आवश्यकता आहे का? असे प्रश्न कोणत्याही संवेदनशील मनाच्या व्यक्तीला पडू शकतात. राज्यातील महत्वाचे मुद्दे बाजूलाच राहिले आणि अनावश्यक वाटाव्या अशा मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा सुरू आहे. सत्ताधारी महायुतीकडे प्रचंड असे बहुमत आहे. तरीही कामकाज म्हणावे तसे प्रभावी झालेले नाही. सत्ताधाऱ्यांना आपली छाप पाडता आलेली नाही.
दिशा सालियन याच्या मृत्यूचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. दिशाने आत्महत्या केली आहे, असा निष्कर्ष विविध तपासयंत्रणांनी काढला होता. मात्र काही वर्षांनंतर दिशा सालियनच्या वडिलांनी आता न्यायालयात धाव घेत मुलीचा खून झाल्याची आणि या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विधान परिषद सदस्य, माजी मंत्री अनिल परब यांनी या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला. हे करताना त्यांनी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या प्रकरणाचा उल्लेख केला.
संजय राठोड यांचे प्रकरण हे चित्रा वाघ यांच्यासाठी जणू दुखरी नसच आहे. अनिल परब यांनी ती नस दाबली आणि वाघ यांच्या अंगाचा तिळपापड झाला. संजय राठोड यांच्यामुळे एका तरुणीने आत्महत्या केल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी राठोड हे महाविकास आघाडीत मंत्री होते. त्याच सरकारच्या काळात पोलिसांनी त्या तरुणीचा खून झाला नसून, तिने आत्महत्या केली होती, असे स्पष्ट केले होते. आरोप झाल्यानंतर राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी चित्रा वाघ यांनी अक्षरशः रान पेटवले होते. मात्र काही दिवसांनी चित्रा वाघ यांची अभूतपूर्व अशी कोंडी झाली.
शिवसेना फुटली, महाविकास आघाडीचे सरकार पडले. संजय राठोड यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. महायुतीचे सरकार स्थापन झाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. शिंदे यांनी राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश केला. त्यामुळे नाकाने कांदे सोलणाऱ्या चित्रा वाघ यांची अडचणी झाली. त्यांनी राठोड यांच्याविरोधात न्यायालयात दाखल केलेला खटला मागे घेण्याचाही प्रयत्न केला, अशा बातम्या व्हायरल झाल्या. महायुती सरकारमध्ये राठोड हे मंत्री झाल्यानंतर वाघ यांनी त्यांच्याविषयी आवाज उठवला नाही. 'लेट गो' अशी भूमिका घेण्यावाचून त्यांच्यासमोर अन्य पर्यायही नव्हताच.
दिशा सालियनने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष तपासयंत्रणांनी काढल्यानंतरही पुन्हा आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले जात असल्यामुळे परब यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. आदित्य ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे, अशी मागणी भाजपचे मंत्री आणि ठाकरे कुटुंबीयांचे पारंपरिक विरोधक नितेश राणे यांनी केली. याचा संदर्भ देत अनिल परब यांनी संजय राठोड यांचा राजीनामा का मागितला जात नाही, असा हल्ला केला. तो चित्रा वाघ यांच्या जिव्हारी लागला.
चित्रा वाघ यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याचा उल्लेख करत, 'तुझ्यासारखे 100 मी तंगड्याला बांधून फिरते,' असे विधान केले होते. काल विधान परिषेदत त्या माजी मंत्री, आमदार अनिल परब यांना उद्देशून, 'तुमच्यासारखे 56 मी पायाला बांधून फिरते,' असे विधान केले. तर लोकहो, अशा प्रकरणांसाठी, कारणांसाठी ज्येष्ठांच्या सभागृहाच वापर केला जाऊ लागला आहे. राजकाणासह अन्य क्षेत्रांतील जाणकारांना संधी देण्याऐवजी उथळ, वाचाळ व्यक्तींना संधी दिली की असेच घडणे अपेक्षित असते.
चित्रा वाघ यांनी वापररेली भाषा कामकाजातून काढून टाकली जाणार की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. हल्ली सर्वच राजकीय पक्षांमध्ये उथळ, वाचाळ नेते, पदाधिकाऱ्यांती मांदियाळी झाली आहे. त्यात सत्ताधारी भाजपमध्ये अशा नेत्यांचा भरणा अधिक झालेला आहे. वैयक्तिक 'स्कोअर सेटल' करण्यासाठी वरिष्ठ सभागृहाचा वापर केला जाणे, है दुर्दैवीच म्हणावे लागेल. संबंधित पक्ष अशा वाचाळांवर नियंत्रण का ठेवत नसतील? अशा नेत्यांमुळे महाराष्ट्राचे राजकारण नासत आहे, देशभरात बदनाम होत आहे. सुदृढ लोकशाहीसाठी अशी वायफळ बडबड आणि आक्रस्ताळेपणा घातक ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.