Devendra Fadnavis & Shaktipeeth Mahamarg Sarkarnama
विश्लेषण

Shaktipeeth Mahamarg : फडणवीसांनी 'श्रावणबाळा'चा हट्ट पुरवलाच नाही? 'समृध्दी'नंतर आता ड्रीम प्रोजेक्ट 'शक्तिपीठ' महामार्गावर फोकस

Hasan Mushrif In Mahayuti Government : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने वेग दिला आहे.

Aslam Shanedivan

Kolhapur News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समृद्धी आणि शक्तीपीठ महामार्ग असे ड्रिम प्रोजेक्ट आहेत. यापैकी समृद्धी महामार्गावरून गाड्या धावू लागल्या असून अनेकांचा बळी अपघातात येथे जात आहे. असाच बळी आता सरकार शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा देत आहे.

मध्यंतरी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कोणताही बडेजाव न आणता शक्तिपीठ रद्द करण्याची घोषणा सरकारतर्फे राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. पण आता सरकार सत्तेत येताच शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला गती आली आहे. यामुळे कोल्हापुरच्या जनतेत महायुती सरकारने शेतकऱ्यांसह हसन मुश्रीफ यांचा विश्वास घात केल्याची भावना तयार झाली आहे.

तब्बल 5200 एकर जमीन जाणार

यवतमाळ जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंत हा शक्तिपीठ महामार्ग जाणार असून तो 12 जिल्ह्यांतून जाणार आहे. हा महामार्ग 825 किलोमीटरचा असून 340 गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिगृहीत करण्यात येणार आहेत. या महामार्गासाठी एकूण शेतकऱ्यांची 9,385 तर वन विभागाची 265 हेक्टर जमीन भूसंपादन केली जाणार आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापुरातील 60 गावांचा समावेश असून तब्बल 5200 एकर जमीन जाणार आहे. एकूण 86 हजार 300 कोटी इतका निधी केला जाणार आहे.

10 चे 10 आमदार महायुतीचे

या लढ्याला विविध संघटना, महायुतीचे नेते आमदार खासदार यांच्यासह माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील बळ देण्याचे काम केलं होते. पण आता महायुतीला जिल्ह्यासह राज्यातील लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांनी भरभरून दिले. जिल्ह्यात महाविकास आगाडीला विधानसभा निवडणुकीत औषधाला देखील आमदार निवडून आला नाही. 10 चे 10 आमदार आजच्या घडीला महायुतीचे आहेत. त्यामुळेच आता जिल्ह्यातील रद्द झालेल्या शक्तीपीठ महामार्ग पुन्हा एकदा रेटण्याचे काम सुरू आहे.

जिल्ह्यात विरोधकच नाही

याआधी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात सहा आमदार होते. या लोकप्रतिनिधींसह माजी खासदार राजू शेट्टी आणि त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, शक्तिपीठ महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समिती या महामार्गाविरोधात रस्त्यावर उतरली होती. पण आता जिल्ह्यातला विरोधकच संपल्याने कोण सरकारला आडवणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.

मुश्रीफांचा शब्द फेटाळला

दरम्यान महायुतीत मंत्री, जिल्ह्याचे नेतृत्व आणि 'श्रावणबाळ' अशी ओळख असणारे हसन मुश्रीफ यांनी देखील कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही. तो रद्द झाल्याची ग्वाही दिली होती. मात्र त्यांचा देखील शब्द महायुती सरकारने फेटाळला. ज्या मुश्रीफांनी महायुतीचे 10 च्या 10 आमदार निवडून आणण्यासाठी जीवाचे राण केले आज त्यांचा शब्दच शक्तिपीठ महामार्गाच्या खाली चिरडला जातोय असेच काहीसे चित्र तयार झाले आहे.

गुलालासाठीच शब्द..

विधानसभा निवडणुकीत राज्य सरकारने महामार्ग रद्द केल्याचे लेखी पत्र दिले होते. पण आता राज्यात महायुतीचे सरकार आले असून जिल्ह्यात महायुतीच्या 10 आमदारांना आणि 1 खासदाराला गुलाल लागला आहे. पण राज्य सरकारने कोल्हापूर सांगलीमधील जनतेला येथील शेतकऱ्यांना विचारात न घेताच पुन्हा एकदा महामार्ग पूर्ण करण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

महायुतीचा आश्वासनाला हरताळ

एकीककडे महायुतीने महामार्गाला दिलेली मंजुरी ही मुश्रीफ यांनी दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासणारी आहे. तर दुसरीकडे पल्टी मारणाऱ्या महायुतीवर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी निशाना साधला आहे. पाटील यांनी सरकारने आठ दिवसांत याबाबत स्पष्टीकरण द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

मुश्रीफ यांचा विरोध

दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावरून आपला विरोध स्पष्ट दर्शवताना कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग जाणार नाही, अशी भूमीका घेतली आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून सांगलीपर्यंत या महामार्गाला विरोध नाही. त्या जिल्ह्याबाबत बोलण्याचा आपला अधिकार नसल्याचेही ते म्हणाले. सांगलीतून पूढे हा महामार्ग संकेश्वर मार्गे गोव्याला जाणार असल्याचेही सांगितले आहे.

मुश्रीफ गोड बोलून मार्ग काढताय?

एकीकडे मुश्रीफ शक्तिपीठ महामार्गाला विरोध असल्याचे सांगत असतानाच दुसरीकडे गोड बोलून हा मार्ग पुढे नेण्यासाठी गोड बोलत आहेत. त्यांनी, समृद्धी महामार्गला विरोध नव्हता. पण आता शक्तिपीठ महामार्गाला जिल्ह्यात प्रचंड विरोध आहे. जिथपर्यंत विरोध नाही तिथपर्यंत भूसंपादन केले जाईल, तिथंपर्यंत कामाची अलाइनमेंट पूर्ण करायची आणि पुढचे कामाला जिथे विरोध सुरू होईल तेथे थांबायचं. सगळ्यांशी चर्चा करून मधला मार्ग काढू, अशी ग्वाही दिली आहे.

आमची मानसिकता नाही...

तसेच मुश्रीफांनी शेतकऱ्यांना नाराज करून, शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन विकास करण्याची आमची मानसिकता नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपली ही भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील स्पष्ट शब्दात सांगितली आहे. मात्र ज्या महायुतीने आपलाच शब्द पाळलेला नाही. ते मुश्रीफ यांचा शब्द मनावर का घेईल? अशी शंका आता जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत. जिल्ह्यात महामार्गाचे काम सुरू झाल्यास मोठ्या आंदोलन पेटेल अशी शक्यता आता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT