Sanjay Raut Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Politics And Black Magic : लिंबू, मिरची अन् 'काळी जादू'...! राजकीय नेत्यांनो...कुठे नेऊन ठेवलाय माझा 'पुरोगामी' महाराष्ट्र...?

Mahayuti Vs Mahavikas Aaghadi : ज्या महाराष्ट्र राज्यात जादूटोणा विरोधी कायदा मंजूर करण्यात आला.त्याच पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात काळी जादू लिंबू-मिरची,अंधश्रध्देची चर्चा होणं,त्यातही विशेष म्हणजे ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं,अशा नेत्यांनीच राजकीय डाव साधण्यासाठी अंधश्रध्देला खतपाणी घालणारं विधानं करावीत हे नक्कीच शरमेची बाब आहे.

Deepak Kulkarni

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा नावलौकिक हा देशाच्या राजकारणात कायमच एक पुरोगामी विचारांचं राज्य असा राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,न्यायमूर्ती रानडे,गोपाळ कृष्ण गोखले,गोपाळ गणेश आगरकर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,यांसारख्या महापुरुषांच्या पुरोगामी विचारधारेतूनच महाराष्ट्राची आजपर्यंतची जडणघडण होत आली आहे.

तसेच प्रबोधनकार ठाकरेंनी पुरोगामित्वाचाच पुरस्कार केला. पण याच प्रचंड वैविध्यता, वैचारिकता, सामाजिक सलोखा यांच्यासह पुरोगामित्वाची कास धरुन महाराष्ट्र वाटचाल राहिली आहे. मात्र,याच महाराष्ट्राचा पुरोगामित्वाचा वसा पुसुन टाकण्यासाठी जणू राजकीय नेतेमंडळींमध्ये स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'सामना'मुखपत्रातून राज्यात नवीन सरकार येऊन 2 महिने झालेत,तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला का गेले नाही, असा सवाल केला होता.एवढ्यावरच थांबतील ते राऊत कसले. त्यांनी पुढं प्रकरण तापलं पाहिजे याची पुरेपूर काळजी घेतली.

ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला का घाबरत आहेत? त्यांचं कुटुंब का घाबरत आहे? वर्षा बंगल्यावर असं काय घडलं आहे की फडणवीस तिथे जायला घाबरतायत? हा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंतेचा व संशोधनाचा विषय आहे.मी कुठेही म्हटलं नाही की तिथे लिंबू-मिरच्या असतील.

‘वर्षा’ हा सरकारने मुख्यमंत्र्यांना दिलेला अधिकृत बंगला आहे आणि फडणवीस या बंगल्यावर जायला तयार नाहीत.त्यांना नेमकी कसली भीती वाटतेय? तिथे नेमकं काय घडलंय? की याआधी तिथे असणाऱ्यांनी घडवलंय?अशी शंका घेत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं.

या त्यांच्या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'काळ्या जादू'ची एन्ट्री झाली. संजय राऊतांनी केलेल्या वर्षा बंगल्यावरील विधानाला महायुतीतील शिवसेना पक्षाचे फायरब्रँड नेते रामदास कदम हे कुठलाही विलंब न करता पलटवार करून मोकळे झाले.त्यांनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद सोडून वर्षा बंगला सोडला तेव्हा तिथे टोपलीभर लिंबू सापडले,असं एकनाथ शिदेंनी म्हटल्याचा दावा करुन खळबळ उडवून दिली.

याचवेळी त्यांनी संजय राऊतांनी काळी जादू काय ते उद्धव ठाकरेंना विचारायला पाहिजे,काळी जादू काय त्यांना अधिक माहिती,कारण त्याचा अनुभव संजय राऊतांना जास्त असेल म्हणून त्यांच्या डोक्यात काळ्या जादूचं आलं असेल असंही कदमांनी म्हटलं.

त्यावर आता मंत्री उदय सामंत यांनीही संधी साधत संजय राऊतांना चिमटा काढला. त्यांनी राऊतांनी सकाळी नऊ वाजताची मुलाखत देणं बंद करा, तर ती काळी जादू पण बंद होईल”, अशी टिप्पणी केली. त्यात भर म्हणजे मंत्री व भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने मातोश्रीवर काळी जादू केली जातेय असा खळबळजनक दावा केला.

त्यात अडीच वर्षांच्या कालखंडानंतर मंत्रिपद पदरात पडलेल्या संजय शिरसाटांनीही टीकेचं टायमिंग साधलं.ते म्हणाले की,"काळी जादू आम्ही पाहिलेली आहे. ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ना तेव्हा आम्ही काय काय काढले हे आम्हाला माहीत आहे.तुम्ही एकनाथ शिंदेंना हे विचारा,असंही शिरसाट यांनी सांगितलं.पण याचवेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस हे सगळं मानत नाही.वर्षावर काही रेनोव्हेशनचे काम सुरु असेल असंही त्यांनी म्हटलं.

ज्या महाराष्ट्र राज्यात जादू टोणा विरोधी कायदा मंजूर करण्यात आला.त्याच पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात काळी जादू लिंबू-मिरची,अंधश्रध्देची चर्चा होणं,त्यातही विशेष म्हणजे ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं,अशा नेत्यांनीच राजकीय डाव साधण्यासाठी अंधश्रध्देला खतपाणी घालणारं विधानं करावीत हे नक्कीच शरमेची बाब आहे.

एकीकडे महाराष्ट्राला इतका मोठा प्रदीर्घ पुरोगामीपणाचा जाज्वल्य इतिहास आहे.तरी गेल्या तीन दशकांपासून हा पुरोगामीपणा कुठेतरी जातीयवाद,धार्मिकतेच्या बंधनात जास्तच अडकत चालल्याचं दिसून येत आहे. खरंतर पुरोगामीपणा हा कायमच राजकारण,अर्थकारण तसेच समाजकारणाशीही निगडित समजला जातो.

सध्या तर ग्रामपंचायत पासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत अशा सर्वच निवडणुकांमध्ये जातीय समीकरणं अवलंबून असतात.एनडीए असो वा यूपीए, महायुती असो वा महाविकास आघाडी यांनी प्रत्येकानं राजकीय समीकरणं डोळ्यासमोर ठेवून सोयीनुसार पुरोगामित्वाचा खोटा मुखवटा घालून जातीनिष्ठ राजकारणालाच गोंजारणं सुरू ठेवलं आहे.

आजसुध्दा प्रत्येक निवडणुकीत भाजप असो वा काँग्रेस कोणताही पक्ष जातीय समीकरणं डोक्यात ठेवूनच उमेदवारांची यादी जाहीर करतो.पुरोगामित्वाचे सोंग घेणार्‍या आणि काळी जादूच्या चर्चा चवीनं चघळणार्‍या आजकालच्या राजकीय नेत्यांना वठणीवर महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत आणि समाजानं पुढाकार घ्यायला हवा. मात्र, पुरोगामी विचारवंतच, काय प्रत्येक नागरीक आज कोणत्या ना कोणत्या राजकारण्याच्या कंपुत आपापल्या जाती घेऊन अभिमानानं मिरवतोय. त्यामुळेच पांढरपेशी'काळ्या जादू' वाल्यांचं फावतंय असं बोललं तर वावगं ठरणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT