Congress Sarkarnama
विश्लेषण

Congress crisis : काँग्रेसमध्ये 5 वर्षांपूर्वी जे घडलं, आज त्याचीच पुनरावृत्ती; एका नेत्यामुळे होणार पक्षाचा घात?

Punjab Congress, Charanjit Singh Channi, Amarinder Singh Raja Warring : आता सिध्दू यांच्या जागी माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आहेत. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या विविध समित्यांमध्ये चन्नी यांना प्रचार समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले आहे.

Rajanand More

Punjab Assembly election : मागील काही वर्षांत काँग्रेस पक्षाने निवडणुकांमध्ये हातातोंडाशी आलेली सत्ता गमावली आहे. पक्षासाठी सकारात्मक वातावरण असतानाही केवळ आणि केवळ पक्षातील नेत्यांमध्ये गटतट पडल्याने पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागल्याची काही उदाहरणे आहेत. त्यामध्ये हरियाणा, पंजाब, छत्तीसगढ आदी राज्यांचा उल्लेख करता येईल.

पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच विविध समित्यांची घोषणा करण्यात आली. पण त्यावरूनही आता वाद पेटला आहे. पाच वर्षांपूर्वी घडलेल्या घटनाच पुन्हा घडत आहेत. पक्षामध्ये पुन्हा गटबाजी उफाळून आली आहे. मागील निवडणुकीआधी नवज्योत सिंग सिध्दू यांनी तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याविरोधात मोहीम उघडली होती.

आता सिध्दू यांच्या जागी माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आहेत. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या विविध समित्यांमध्ये चन्नी यांना प्रचार समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले आहे. त्यावरून ते नाराज झाले आहेत. त्यांना प्रदेशाध्यक्षपद हवे आहे. मात्र, पक्षाने अमरिंदर सिंग राजा वडिंग यांच्यावरच पुन्हा विश्वास दाखविला आहे.

खासदार चन्नी यांनी उघडपणे वडिंग यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यांच्या समर्थक नेत्यांसोबत बैठक घेत पक्षनेतृत्वावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. पक्षाने तातडीने भूपेश बघेल यांना पंजाबमध्ये धाडले आहे. पुढील एक-दोन दिवसांत त्यावर तोडगा काढला जाऊ शकतो. मात्र, सध्याची पक्षांतर्गत स्थिती पाहता पक्षात दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

काय घडलं पाच वर्षांपूर्वी?

2022 च्या निवडणुकीआधी सिध्दू यांनी अमरिंदर सिंग यांना कडाडून विरोध केला होता. या काळात सिंग यांना हटवून चन्नी यांना मुख्यमंत्रि‍पदावर संधी देण्यात आली होती. तर सिध्दू यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले होते. पण त्यानंतर सिंग यांनी पक्ष सोडत नवा पक्ष काढला अन् नंतर भाजपमध्ये विलीन केला.चन्नी यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुकीला काँग्रेस पक्ष सामोरे गेला. सिध्दू यांचे त्यांच्याशीही खटके उडला होते. परिणामी पक्षाचा दारूण पराभव झाला.

सिध्दू यांनीही नंतर पक्षापासून फारकत घेतली. निवडणुकीतील पराभवानंतर वडिंग यांच्यावर पक्षाने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. त्यानंतर पक्षाने दोनच वर्षांत झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित कामगिरी करून दाखविली. चन्नी हेही लोकसभेत पोहोचले. आता विधानसभा निवडणुकीतही वडिंग यांच्याकडे पक्षाचा कारभार सोपविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. चन्नी यांना प्रचार प्रमुख करत त्यांच्या मदतीला दिले आहे. मात्र, चन्नी यांनाच प्रदेशाध्यक्षपद हवे असल्याने पक्षासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

पक्षात दोन गट पडल्याने निवडणुकीला सामोरे जाण्याआधीच पक्ष बॅकफूटवर गेला आहे. लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याची संधी पक्षाकडे असताना नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत. पंजाबमध्ये आम आदमीच्या सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. राज्यसभेच्या सहा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कथित वादग्रस्त व्हिडीओमुळे वाद निर्माण झाला आहे. शिरोमणी अकाली दलामध्येही अंतर्गत वाद आहे. भाजपला अजूनही आपली ताकद दाखविता आलेली नाही. त्यामुळे काँग्रेसला मोठी संधी असल्याचे पक्षाच्या नेत्यांना वाटते. पण पुन्हा एकदा अंतर्गत वादात काँग्रेसचा घात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT