Telangana, Congress Sarkarnama
विश्लेषण

Congress Politics : काँग्रेसचे तेलंगणात सत्ता स्थापनेचे स्वप्न दहा वर्षांनंतर पूर्ण होणार ?

Anand Surwase

Telangana Political News : तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत 30 नोव्हेंबर रोजी 119 जागांसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीत सत्ताधारी बीआरएस, काँग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्षांत जोरदार लढत दिली आहे. सत्ताधारी भारत राष्ट्र समितीनेदेखील आपण तिसऱ्यांदा सत्तेत येणार असल्यचा दावा केला आहे.

भाजपकडूनही या वेळी जोरदार प्रचार करण्यात आला आहे. भाजपने बीरआएस सोडून काँग्रेसलाच लक्ष्य केल्याचे दिसून आहे. तरीही या वेळी तेलंगणामध्ये बीआरएसला धक्का देत काँग्रेस आपले 2013 मधील सत्ता स्थापनेचे स्वप्न पूर्ण करण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी होणाऱ्या मतमोजणीत हे चित्र स्पष्ट होणार आहे.

यूपीए-2 सरकारच्या कार्यकाळात 2014 मध्ये केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सहीने आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगणा हे देशातील सर्वात तरुण राज्य उदयास आले. त्यावेळी काँग्रेसला तेलंगणा निर्मितीचा निवडणुकीत फायदा होईल, असा अंदाज होता. मात्र, त्यावेळच्या निवडणुकीत मतदारांनी केसीआर यांना तेलंगणा राष्ट्रनिर्मितीचे श्रेय देत तेलंगणा राष्ट्र समितीकडे तेलंगणाची सत्ता बहाल केली, तर दुसरीकडे आंध्र प्रदेशमध्येही विभाजनाच्या मुद्द्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला. परिणामी 2014 मध्ये सत्तेत येण्याचे काँग्रेसचे स्वप्न अपूर्णच राहिले. आता 10 वर्षांनंतर काँग्रेसला आता तेलंगणामध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी मिळत असल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. तेलंगणामध्ये काँग्रेस विजयी झाल्यास कर्नाटकनंतर दक्षिणेतील दुसऱ्या राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता स्थापन होणार आहे.

एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला कौल

मतदानानंतर विविध संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार तेलंगणामध्ये काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळताना दिसून येत आहे. तेलंगणामध्ये सत्ता स्थापनेसाठी 119 पैकी 60 जागांची गरज आहे.

इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या अंदाजानुसार तेलंगणात काँग्रेसला 63 ते 79 जागा मिळतील, तर केसीआर यांच्या बीआरएसला 31-47 ते जागांवर समाधान मानावे लागेल. या वेळी बीआरएसला सुमारे 40 जागांवर फटका बसण्याची शक्यताही वर्तवण्यात आली. पोलनुसार राज्यात भाजपला 2-4 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

न्यूज-24-टुडे चाणक्य यांच्या अंदाजानुसार काँग्रेस 62 ते 80 ठिकाणी विजयी होईल, तर बीआरएस 24-42 जागा आणि भाजपला 2-12 जागा मिळण्याची शक्यता आहे. टाइम्स नाऊ-ईटीजीच्या पोलमध्येही काँग्रेसच बहुमताचा आकडा पार करताना दिसून येत आहे. काँग्रेसला 60-70 जागा प्राप्त होतील, तर केसीआर यांच्या बीआरएसला 37-45 जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

काँग्रेसच्या सहा गॅरंटी परिणामकारक

कर्नाटक निवडणुकीवेळी काँग्रेसने मोफत वीज, मोफत बस, बेरोजगार तरुणांना भत्ता, घर प्रमुख महिलेस मानधन आणि गरिबांना मोफत धान्य अशा पाच गॅरंटीवर प्रचारात भर दिला होता. त्याचे परिणामही दिसून आले. कर्नाटकात सत्तेत येण्यासाठी वापरलेला तोच फार्म्युला काँग्रेसने आता तेलंगणातही वापरला आहे.

काँग्रेसने या ठिकाणी जनतेला सहा आश्वासने दिली आहेत. महालक्ष्मी" रायतु भरोसा, गृहज्योती, इंदिराम्मा हाऊस", युवा विकास आणि ज्येष्ठांना पेन्शन आणि विमा या गॅरंटीचे आश्वासन दिले. तसेच युवकांच्या रोजगाराचा प्रश्न, भ्रष्टाचार, दलित समाजाच्या समस्या आणि विकासाच्या मुद्द्यांवरही भर दिला. याचा सकारात्मक परिणाम तेलंगणातील मतदारांवर होत असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.

फार्महाऊसवरून सरकार चालवणारे केसीआर

तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने या निवडणुकीत जोरदार प्रचार केला. काँग्रेसची सोशल मीडिया टीम तगडी असून, ते बीआरएस विरोधातील मुद्दे जनतेपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरली. रेवंत रेड्डी यांनीही केसीआर यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्रात भाजपने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घरात बसून राज्य चालवल्याची टीका केली, तीच नीती तेलंगणामध्ये काँग्रेसने केसीआर विरोधात वापरली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बैठका बंद केल्या

केसीआर फार्महाऊसवरून सरकार चालवणारे मुख्यमंत्री आहेत, अशी टीका रेवंत रेड्डींनी केली. ते मंत्रालय सचिवालय सोडून फार्महाऊसवर जास्त वेळ असतात. त्यांच्या आमदारांनाही भेटीसाठी वेळ देत नाहीत. याशिवाय केसीआर यांनी यापूर्वी सर्वसामान्य जनतेसाठी सुरू केलेल्या बैठकाही बंद केल्या आहेत. त्यामुळे हे सरकार जनतेचे नाही, तर केसीआर कुटुंबाचे असल्याच्या आरोपावर प्रचारात जोर दिला गेला.

कुटुंबांचे सरकार

केसीआर, यांच्यानंतर त्यांचा मुलगा केटीआर, मुलगी के कविता, जावाई हरिश राव, दुसरे जावाई राज्यसभा सदस्य आहेत. त्यामुळे बीआरएसही एक कुटुंबासाठी सत्ता हाकणारी प्रायव्हेट कंपनी असल्याची टीका केली जात आहे. केसीआर यांच्या कुटुंबाचा तेलंगणामध्ये राजकारणातील वाढत्या प्रभावामुळे जनतेमध्ये नाराजीचा सूर होता. त्याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजप कमकुवतच

तेलंगणामध्ये आक्रमक प्रचार केला असला तरी भाजपच्या पदरात दोन आकडी जागाही पडण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जाते. भाजप आणि बीआरएस हे हातात हात घालून ही निवडणूक लढवत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी सातत्याने केला. रेवंत रेड्डी यांनीही भाजप, बीआरएसला मदतच करत असल्याचे जनतेपुढे उघड केले. त्यातच धार्मिक मुद्दे पुढे करून युवकांना वळवण्याची रणनीती भाजपची आहे. मात्र, तेलंगणात भाजपला त्यामध्ये यश येत नसल्याचे चित्र आहे. 2018 च्या निवडणुकीत भाजपचा एकच आमदार निवडून आला होता. आता रविवारी होणाऱ्या मतमोजणीत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT