Sitaram Yechury 12.jpeg Sarkarnama
विश्लेषण

Sitaram Yechury Passed Away : झुंजार 'कॉम्रेड'ची चटका लावणारी एक्झिट; श्रमिकांचा बुलंद आवाज शांत झाला..!

अय्यूब कादरी

Sitaram Yechury News: (Sitaram Yechury) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे 12 सप्टेंबर रोजी दिल्ली येथील एम्समध्ये उपचार सुरू असताना निधन झाले. रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा त्रास सुरू झाल्याने 19 ऑगस्ट रोजी त्यांना एम्समध्ये दाकल करण्यात आले होते. माकपचे सरचिटणीस असणारे येचुरी हे 1992 पासून पक्षाच्या पॉलिट ब्यूरोचे सदस्यही होते. धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण शिखरावर असताना सीताराम येचुरी यांच्या निधनाने डावे पक्ष, डाव्या चळवळींसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत.

तो काळ असावा 1990-91 चा. बीबीसी हिंदी रेडिओवरून देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांच्या मुलाखती ऐकायला मिळायच्या. त्यात आमच्या एका पिढीचे लक्ष वेधून घेतले होते ते डाव्या पक्षांच्या नेत्यांनी. त्यातही सीताराम येचुरी यांचे नाव आघाडीवर होते. स्पष्ट मांडणी, आर्थिक विषयांचा दांडगा अभ्यास आणि सामाजिक प्रश्नांची खोलवर असलेली जाणीव समोरच्याला पटकन आकर्षित करून घेत असे. त्यांची तेलुगू बाजाची हिंदी आणि इंग्रजी एेकतच राहावे, असे समोरच्यांना वाटायचे. येचुरी यांच्यासारख्या नेत्यांची भाषणे एेकून भारावून जाण्याचा तो काळ होता.

सोलापुरात माकपचे (CPI) माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी कामगारांसाठी निवासी वसाहती उभ्या केल्या आहेत. त्यानिमित्त येचुरी यांचे अधूनमधून सोलापूरला येणे व्हायचे. छत्रपती संभाजीनगर (आधीचे औरंगाबाद) येथेही डावी चळवळ जोमात होती. येचुरी हे 2003-2004 मध्ये एकदा छत्रपती संभाजीनगरलाही आले होते.

पत्रकारितेत असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर येथेही काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी तीन - ते चार वेळा त्यांच्याशी भेट झाली. सोलापूर येथील एका भेटीत त्यांनी डावी चळवळ, केली जाणारी आंदोलने आणि माध्यमांकडून, विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडून केला जाणारा दुजाभाव याबाबत खासगीत बोलताना परखड मत व्यक्त केले होते. शेतकऱ्यांची अलोट गर्दी असल्याचे फोटो दाखवत त्यांनी प्रश्न केला होता, भाई, आप मीडियावालोंने यह दिखाय है क्या? त्यांचा प्रश्न खराच होता. इलेक्ट्रॉनिक माध्यमे भांडवलदारधार्जिणी होण्याचा तो काळ होता.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जेएनयूच्या चान्सलर पदावरून हटवण्यासाठी जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्क्ष सीताराम येचुरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. आणीबाणी उठवल्यानंतर १९७७ मध्ये इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन करण्यात आले होते. इंदिरा गांधी या कणखर नेत्या म्हणून ओळखल्या जातात. येचुरी यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्याचे पत्र वाचून दाखवले आणि इंदिरा गांधी यांनी ते शांतपणे एेकून घेतले होते.

सीताराम येचुरी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस होते. त्यांच्या आधी हे पद प्रकाश कारत यांनी भूषवले होते. काही बाबींमुळे कारत हे वादग्रस्त ठरले होते. येचुरी यांच्या रूपाने माकपला लिबरल चेहरा मिळाला होता. त्यांच्याशी जेव्हा जेव्हा संवाद साधण्याची संधी मिळाली, त्या त्या वेळी माझा प्रश्न ठरलेला असायचा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विलीनीकरण कधी होणार? उत्तरादाखल ते फक्त स्मितहास्य करायचे. ते सरचिटणीस झाल्यानंतर विलीनीकरणासाठी पावले उचलली जातील, अशी अपेक्षा निर्माण झाली होती, मात्र तसे झाले नाही.

सीताराम येुचुरी यांचा जन्म चेन्नई (तत्कालीन मद्रास) येथील एका तेलुगू भाषिक कुटुंबात 12 ऑगस्ट 1952 रोजी झाला. त्यांचे आई-वडील (कल्पकम येचुरी-सर्वेश्वरा येचुरी) हे मूळचे आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील मूळ रहिवासी. त्यांचे वडील सर्वेश्वर आंध्र प्रदेश परिवहन महामंडळात अभियंता होते, तर आई या सरकारी अधिकारी होत्या.

येचुरी हे हैदराबाद शहरात वाढले, दहावीपर्यंतचे त्यांचे शिक्षण तेथेच ऑल सेंट्स हायस्कूलमधून झाले. हैदराबाद येथील निझाम कॉलेज, दिल्ली येथील सेंट स्टीफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. जेएनयूतून त्यांनी अर्थशास्त्रात एमए. केले.

येचुरी यांची शैक्षणिक कारकीर्द उज्ज्वल होती. हैदराबादेतून दहावी झाल्यानंतर त्यांनी दिल्लीतील प्रेसिडेन्ट्स इस्टेट स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि उच्च माध्यमिकच्या सीबीएसई परीक्षेत ते देशातून पहिले आले होते. सेंट स्टीफन्स कॉलेजमधून त्यांनी अर्थसाश्त्रात बीए केले आणि तेथेही ते प्रथम आले. जेएनयूमधून त्यांनी अर्थशास्त्रात एमए केले. त्यांनी पीचडीही सुरू केली होती, मात्र 1975 मध्ये आणीबाणी लागू झाली आणि तो विषय मागे पडला. शालेय जीवनापासूनच हुशार असलेल्या येचुरी यांच्या विद्वत्तेची झलक ते बोलायला लागले की यायची.

येचुरी यांनी 1974 मध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इडिया (एसएफआय) या माकपशी संलग्न विद्यार्थी संघटनेत प्रवेश केला. जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचे ते तीनवेळा अध्यक्ष बनले. जेएनयूमध्ये डावी विचारसरणी रुजवण्यात येचुरी आणि प्रकाश कारत यांची महत्वाची भूमिका होती. एसएफआयमध्ये गेल्याच्या वर्षभरानंतर येचुरी यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीवर त्यांची निवड झाली.

अल्पकालावधीत ते पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले. 2005 ते 2017 पर्यंत ते पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर निवडून गेले होते. भारत-अमेरिका अणुकारारादरम्यान येचुरी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. येचुरी यांनी राज्यसभेत मांडलेल्या सर्व अटींचा तत्कालीन काँग्रेस सरकारने करारात समावेश केला होता. तरीरी प्रकाश कारत यांचे समाधान झाले नव्हते. त्यावेळी कारत आणि येचुरी यांच्यातील मतभेद समोर आले होते.

माकपचे माजी सरचिटणीस हरकिशनसिंग सुरजित यांनी सत्ताधाऱ्यांसोबत आघाडी करण्याची एक परंपरा सुरू केली होती. सीताराम येचुरी यांनी सुरजित यांचा वारसा पुढे चालवला. 1996 मध्ये युनायटेड फ्रंट सरकारचा किमान समान कार्यकम तयार करण्यासाठी त्यांनी पी. चिदंबरम यांच्यासोबत मिळून काम केले होते.

यूपीए सरकारच्या स्थापनेवेळी 2004 मध्येही येचुरी यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. उजव्या विचारसणीच्या पक्षांना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी त्यांनी शक्य ते प्रयत्न केले होते. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांना येचुरी यांनी सातत्याने विरोध केला. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना 2015 च्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्याच्या निर्णय़ालाही त्यांनी विरोध केला होता. इस्लामी मूलतत्ववाद्यांच्या उदयाला अमेरिका जबाबदार आहे, असे येचुरी यांचे म्हणणे होते.

पत्रकार सीमा चिश्ती यांच्याशी सीताराम येचुरी यांचा विवाह झाला होता. सिमी चिश्ती या 'द वायर'च्या संपादक आहेत. यापूर्वी त्या 'बीबीसी हिंदी'च्या संपादक होत्या, 'इंडियन एक्प्रेस'च्या निवासी संपादक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. आर्थिक बाजू पत्नी सीमा चिश्ती याच सांभाळतात, असे त्यांनी एकदा सांगितले होते.

सीमा चिश्ती यांच्यापूर्वी येचुरी यांचा विवाह वीणा मुझुमदार यांच्या कन्या इंद्राणी मुझुमदार यांच्याशी झाला होता. इंद्राणी आणि सीताराम येचुरी यांना एक कन्या आणि एक पुत्र झाले. अखिला असे त्यांच्या कन्येचे नाव असून, त्या एडिनबर्ग आणि सेंट अँड्र्यूज विद्यापीठात इतिहास शिकवतात. येचुरी यांचे पुत्र अखिलेश (वय 34) यांचे कोरोनामुळे 2021 मध्ये निधन झाले. त्यावेळेसपासून ते मानसिकदृष्ट्या खचले होते. आंध्र प्रदेशचे माजी मुख्य सचिव, आयएएस अधिकारी मोहन कांडा हे येचुरी यांचे मामा.

काही वर्षांपूर्वीपर्यंत डाव्यांचा पश्चिम बंगाल विधानसभेत आणि लोकसभेतही दबदबा होता. पश्चिम बंगालमध्ये माकपची अनेक वर्षे सत्ता होता होती. तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांचा उदय झाला आणि माकपचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले. लोकसभेतही डाव्यांचे संख्याबळ नगण्य होत गेले. गेल्या महिन्यातच, म्हणजे 8 ऑगस्ट रोजी पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन झाले. त्यापाठोपाठ येचुरी यांच्या निधनाने डाव्या चळवळीची मोठी हानी झाली आहे.

डाव्या चळवळींकडे तरुणांना आकर्षित करू शकणारी मांडणी करण्याची क्षमता येचुरी यांच्यात होती. ते एप्रिल 2015 मध्ये माकपचे सरचिटणीस झाल्यानंतर माकपचे, डाव्या चळवळींचे पुनरुज्जीवन होईल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र त्यावेळी देशात नरेंद्र मोदी यांचा झंझावात नुकताच सुरू झालेला होता. महिनाभराच्या अंतरात बुद्धदेव भट्टाचार्य आणि सीताराम येचुरी असे दोन दिग्गज, अभ्यासू नेते गमावलेल्या माकपसमोर, डाव्या चळवळींसमोर नवीन नेतृत्वाचा, पुनरुज्जीवनाचा निर्माण झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT