Uddhav Thackeray sarkarnama
विश्लेषण

Uddhav Thackeray: लढण्याचा निर्धार पक्का, उद्धव ठाकरेंचा विरोधक, मित्रांनाही इशारा

अय्यूब कादरी

शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काय बोलणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते. काल झालेल्या मेळाव्याबाबतही अशीच उत्सुकता निर्माण झाली होती. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाऊन हिंदुत्व सोडले या शिंदे गट, भाजपकडून केल्या जाणाऱ्या राजकीय आरोपाला ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले. जाता जाता त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही चिमटा घेतला. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर न करणाऱ्या महाविकास आघाडीलाही त्यांनी हा मुद्दा आपण सोडला नसल्याचा इशारा दिला. (Dasara Melava 2024 Uddhav Thackeray)

आपला निर्धार पक्का आहे, पक्ष सोडून जाणाऱ्यांना (ठाकरे यांच्या भाषेत गद्दारी करणाऱ्यांना) प्रामाणिक, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर सत्तेतून खाली खेचणार, असा संदैश देत आपल्यासोबत राहिलेले कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमघ्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी केला. हे करताना त्यांनी आपण दिल्लीच्या भाजपच्या नेत्यांना भीत नाही, असे सांगत विरोधक दडपशाही करतात आणि आपण त्याला भीक घालणार नाही, असे स्पष्ट केले. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे 40 आमदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या भीतीनेच शिवसेनेतून बाहेर पडले, असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकले.

गेल्या काही वर्षांत उद्धव ठाकरे यांच्या वक्तृत्वशैलीत कमालीची सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. या दसरा मेळाव्यातही तसे चित्र दिसून आले. ते मुख्यमंत्री असताना कोरोनाच्या काळात त्यांनी लोकांशी साधलेल्या संवादाची चर्चा अजूनही होत असते. विरोधक त्यावर कितीही टीका करत असले तरी त्याचा काही उपयोग होत नाही. तशाच शैलीतून उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून उपस्थितांशी संवाद साधला. केंद्र आणि राज्य सरकार काही उद्योगपतींच्या हितासाठी कार्यरत आहेत, यावरही त्यांचा भर होता.

दिल्लीतील नेत्यांची मला पर्वा नाही, असे उद्धव ठाकरे सांगत होते त्यावेळी त्यांचा इशारा मोदी, शाह यांच्याकडे होता आणि आपण एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे त्यांना शरण जाणार नाही, असे त्यांना लोकांच्या मनावर ठसावायचे होते. महाराष्ट्र हा दिल्लीसमोर झुकत नाही, याचा लोकांनाही अभिमान वाटतो. लोकांच्या या अभिमानाशी शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांनी तडजोड केली, ते दिल्लीसमोर झुकले, असा संदेश ठाकरे यांनी पुन्हा एकदा दिला. कार्यकर्त्यांचे स्फुल्लिंग चेतवणे, लोकांच्या अभिमानाला कुरवाळणे आणि मग त्या बळावर विरोधकांना गाडणार, असे सांगत त्यांनी ठाकरी बाणा दाखवला.

कुणाकडे तलवार आहे, कुणाकडे मशीनगन आहे, पण माझ्याकडे लढवय्या मन आहे, असे म्हणत शिंदे गट आणि भाजपवर त्यांनी हल्ला केला. शिंदे गट आणि भाजपने आपले सर्वकाही औरबाडून घेतले, असे त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. आई जगदंबा सोबत आहे. जगदंबा आणि कार्यकर्त्यांच्या बळावर विरोधकांच्या उरावर भगवा फडकवून दाखवणार, असे म्हणत आपण हिंदुत्व सोडलेले नाही, हे त्यांनी अधोरेखित केले. हे करत असताना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नस दाबायला ते विसरले नाहीत. गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात विश्वगुरू बसले आहेत. हे विश्वगुरू हिंदूंचे संरक्षण करू शकले नाहीत का, असा प्रश्न त्यांनी संघाला विचारला.

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, ही शिवसेना ठाकरे गटाची मागणी मित्रपक्षांकडून मान्य करण्यात आली नाही. उद्धव ठाकरे हेच चेहरा असावेत, असा त्यांच्या पक्षाचा आग्रह आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळवणे शक्य झाले नाही, त्यानंतर ठाकरे गटाच्या या मागणीने उचल खाल्ली आहे. त्याचे प्रतिबिंब दसरा मेळाव्यात दिसून आले. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतानाची व्हिडीओ क्लिप दसरा मेळाव्यात दाखवण्यात आली. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत वाद पेटणार का, हे काही दिवसांतच समोर येणार आहे.

एकनाथ शिंदे आणि 40 आमदार सोडून गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांची अवस्था बिकट झाली. त्यांच्या पक्षाला लागलेली गळती पुढे अनेक महिने कायम राहिली. अशा परिस्थितीत राजकारणात तग धरणे जिकीरीचे असते. चहूबाजूंनी त्यांच्याव हल्ले सुरू होते. ठाकरे संपले, अशी हाकाटी सातत्याने पिटली जात होती. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणूक आली आणि चित्र बदलले. सर्वकाही ताब्यातून गेलेले असतानाही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने चांगली कामगिरी केली. महाविकास आघाडीने महायुतीला धूळ चारली. महाविकास आघाडीच्या यशात उद्धव ठाकरे यांना असलेल्या सहानुभूतीचा मोठा वाटा आहे. तरीही ही लढाई सोपी नाही, असे अजूनही त्यांना वाटत आहे, कारण आहे विरोधकांकडे एकवटलेली सत्ता, सर्व प्रकारची शक्ती. याचाही उल्लेख त्यांनी दसरा मेळाव्यात केला.

शिवसेना हा बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष भाजप आणि एकनाथ शिंदे गटाला संपवायचा आहे, असा संदेशही उद्धव ठाकरे यांनी दिला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते 'वर्षा'तून बाहेर पडू लागले, त्यावेळी झालेली मोठी गर्दी शिंदे आणि भाजपच्या गोटात धडकी भरवणारी होती. बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाचे मुख्यमंत्रिपद भाजप, शिंदे यांनी घालवले, अशी भावना त्यावेळी लोकांमध्ये निर्माण झाली होती. ती कायम राहावी, याची काळजी उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून घेतली. प्रत्येक शिवसैनिक बाळासाहेबांची मशाल बनून या सरकारला चूड लावल्याशिवाय राहणार नाही, असे ते यामुळेच म्हणाले.

शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यातील आदित्य ठाकरे यांच्या भाषणाचीही मोठी चर्चा झाली. त्यांनी पहिल्यांदाच दसरा मेळाव्यात भाषण केले. बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातूनच आदित्य यांचे राजकारणात लॉँचिंग केले होते. विरोधकांची खिल्ली उडवणे, त्यांची मिमिक्री करणे हे शिवसैनिकांना आवडते. नेमके हेच हेरून आदित्य यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री केली असावी. महायुती सरकारच्या भ्रष्टाचारावरही त्यांनी प्रहार केला.

लढणार, मैदानात घट्ट पाय रोवून उभे राहणार, असा संदेश उद्धव ठाकरे यांनी दिला. मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत त्यांनी महाविकास आघाडीलाही इशारा दिला. लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास उंचावला होता. त्या बळावर काँग्रेस नेते कुरघोड्या करत होते. हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयश आले, त्यामुळे आता या कुरघोड्या चालणार नाहीत, असा इशारा ठाकरे यांनी काँग्रेसला दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT