IPS Anjana Krishna visiting Kurdu village during the murum excavation row,  Sarkarnama
विश्लेषण

Ajit Pawar Vs Anjana Krishna: अंजना कृष्णाविरुद्ध अजित पवारः चुकले कोण?

Ajit Pawar Controversy with IPS officer Anjana Krishna: आयपीएस अंजना कृष्णा यांना अजित पवार यांनी फोनवरून दमदाटी केल्याच्या संदर्भात समाजमाध्यमांवर गरमागरम चर्चा आहे. त्यानंतर अंजना कृष्णा यांना ‘हिरो’, तर पवार यांना ‘व्हिलन’ असे चित्रण रंगविण्यात आले. पण ही घटना दोन्ही बाजूंच्या अंगाने पाहिली पाहिजे.

पांडूरंग म्हस्के

सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कुर्डू गावचे ग्रामस्थ बेकायदेशीरपणे मुरूम उत्खनन उपसा करीत असल्याची माहितीवजा तक्रार पोलिसांकडे आल्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या तरुण तडफदार पोलीस उपअधिक्षक असलेल्या अंजली कृष्णा घटनास्थळी पोहचल्या. याठिकाणी कथित बेकायदेशीर मुरूम उपसा करणारे आणि बेदरकारपणे वागणाऱ्या संबंधितांना कृष्णा यांनी बेकायदेशीर मुरूम उपसा व उत्खनन थांबवा असे बजावले.

मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करमाळा तालुका अध्यक्ष बाबासाहेब जगताप यांनी थेट अजित पवार यांनाच याबाबत तक्रार करून घटनेबाबत माहिती दिली. आपल्याच कार्यकर्त्याचा फोन म्हटल्यावर पवार यांनी जगतापांच्या फोनवरून पोलिस उपअधीक्षक कृष्णा यांना दमदाटी करत बेकायेशीर मुरूम उपसा कारवाई स्थगित करण्याचा आदेशवजा हुकूम दिला.

या दोघांच्या संभाषणात कृष्णा यांनी मुळात तिसऱ्याच व्यक्तीच्या फोनवर उपमुख्यमंत्री बोलत असल्याबाबत अविश्वास दर्शवित व्हिडीओ कॉल करा असे नम्रपणे सांगितले. त्यावर चिडलेल्या पवार यांनी ‘मला तू मला ओळखत नाहीका? माझा आवाज ओळखत नाहीका, मला व्हिडीओ कॉल करावयास सांगते. तुझी एवढी हिंम्मत कशी होते, माझा फोटो (चेहरा) ओळखते का?’ असे फर्मावत ‘दादा’गिरी केली. वरवर पाहता असा या घटनेचा क्रम असला, तरी काही प्रश्न अनुत्तरित राहतात. वास्तविक अवैध उत्खननाबाबत कारवाईचा अधिकार महसूल विभागाचा असल्याने महसूल विभागाकडे तक्रार करणे आवश्यक होते.

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मागणीनंतरच पोलीस त्यात हस्तक्षेप करू शकतात किंवा अगदीच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरच पोलीस अशा प्रकरणामध्ये हस्तक्षेप करतात. वास्तविक पोलिसांना असलेल्या अमर्याद अधिकारांमुळे पोलिसांच्या हस्तक्षेपाबाबत स्पष्टता करता येत नसली, तरी सामान्य शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून पोलीस इतक्या तातडीने तेही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोचतात का, हा प्रश्न सुद्धा यंत्रणेला विचारणे आवश्यक आहे.

मुळात राज्याचा उपमुख्यमंत्री तिऱ्हाईत व्यक्तीच्या फोनवरून अधिकाऱ्याला सांगून कारवाई थांबवण्याचे आदेश देत असेल, तर संबंधित अधिकाऱ्याने ते का ऐकावे. त्याही एवढ्या अनुभवी राजकारणी व्यक्तीला वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रोटोकॉल काय असतो हे माहित असणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा व्यक्तीने वरिष्ठ अधिकाऱ्याला अशा पद्धतीने खालच्या पातळीवर बोलणे शोभत नाही.

अजित पवार यांची सारवासारव

या प्रकरणात अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठताच अजित पवार यांनी तात्काळ सारवासारव करीत खुलासा केला. कायद्याच्या अंलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा आपला उद्देश नसल्याचे त्यांनी तत्काळ स्पष्ट केले. यात आपला उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये या काळजीपोटी होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसेच धैर्याने आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचे आहे, मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे पवार यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे.

या स्पष्टीकरणानंतरही पवार यांच्या पक्षात तर आपल्या नेत्याला वाचविण्याची स्पर्धाच सुरु झाली. पवार यांची पाठराखण करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पवार यांनी सार्वजनिक हिताच्या कामासाठीच संबंधित महिला अधिकाऱ्याला दुरध्वनी केला होता. त्यात व्यक्तिगत कोणाचे हित नसल्याने हा विषय फार वाढवणे उचित नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

मिटकरींचे एक पाऊल पुढेच..

अजित पवारांवर विरोधकांपैकी कुणी काही टीका केली की आपली तलवार सदैव उंचावणारे पक्षाचे प्रवक्ते आ.अमोल मिटकरी या प्रकरणात तरी मागे कसे राहतील.

त्यांनी तर कहरच केला. त्यांनी संबंधित महिला अधिकाऱ्याची पात्रतेची कागदपत्रेच तपासणी करण्याची मागणी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे केली. नेहमीप्रमाणे तोंडघशी पडल्यानंतर त्यांना ते पत्र मागे घ्यावे लागले. वास्तविक केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून काठिण्य चाचण्या उत्तीर्ण झालेली महिला अधिकारी पुन्हा तिच्या पात्रतेवर संशय निर्माण करणे कितपत योग्य आहे.

आपल्या नेत्याचे चुकलेच आहे ही भावना कधीतरी कार्यकर्त्यांना सुद्धा झाली पाहिजे. हेच त्या नेत्याचे यश असते. तसे होत नसेल तर पवार यांच्या पक्षातसुद्धा व्यक्तिपूजेचे स्तोम वाढत चालल्याची भीती व्यक्त केल्यास वावगे ठरू नये.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते कार्यकर्ते खासगीत संबंधित अधिकारी कशा चुकीच्या आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र नसताना त्या कशा गेल्या वगैरे सांगून अजित पवार यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न करीत असले तरी अधिकाऱ्याशी अरेरावीची बोलणे कसे चूक आहे याची चर्चा केलीच जात नाही. अजित पवार यांचा आवाजच तास आहे. ते सौम्य भाषेत बोलले, तरी रंगात बोलतात असे वाटते. हा अत्यंत दुबळा प्रतिवाद आहे. कारण अजित पवार हे दरडावणीच्या सुरातच बोलत होते. अजित पवार अंजना कृष्णा यांच्याशी कसे बोलले हा मुद्दाच गैरलागू आहे. कारण अजित पवार यांनी अंजना कृष्णा यांच्याशी बोलणेच चूक होते, यासाठी त्यांच्यावर टीका व्हायला हवी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT