Rahul Gandhi, Delhi Election Sarkarnama
विश्लेषण

Delhi Assembly Election : काँग्रेस एकाकी; सर्वच प्रमुख मित्रपक्षांनी सोडली साथ, कोणती चूक नडली?

Congress Politics AAP RJD Samajwadi Party TMC India Alliance : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आप, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होत आहे.

Rajanand More

New Delhi : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने आता सर्व राजकीय पक्षांचा उत्साह दुणावला आहे. आम आदमी पक्षाने उमेदवार जाहीर करण्यापासूनच मोठी आघाडी घेतली आहे. काँग्रेसही त्यामध्ये फार मागे नसली तरी एकाही प्रमुख मित्रपक्षाचा पाठिंबा नसल्याने पक्षाची स्थिती फारशी मजबूत नसल्याचेच चित्र आहे. याचा सर्वाधिक फायदा आपला होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.

दिल्लीत सत्ताधारी आपसमोर भाजप आणि काँग्रेसचे आव्हान आहे. तिरंगी लढतीचा फटका आपला बसण्याची शक्यता आहे. तर मतविभाजनाचा फायदा आपल्याला होईल, या आशेवर भाजप आहे. पण सद्यस्थितीत दिल्लीत काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. पक्षाचा एकही आमदार, खासदार नाही. एवढेच नाही तर इंडिया आघाडीतील एकही पक्ष काँग्रेसच्या बाजूने उभे राहायला तयार नाही.

ममता, अखिलेश यांचा आपला पाठिंबा

लोकसभा निवडणुकीवेळी उदयास आलेल्या इंडिया आघाडीमध्ये बहुतेक सर्व प्रमुख पक्ष होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील या आघाडीतील आप, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दल हे चार प्रमुख पक्ष सध्या दिल्लीच्या निवडणुकीत आघाडीत नाहीत. आप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होते आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांच्यापाठोपाठ तेजस्वी यादव यांनीही केजरीवालांना पाठिंबा दिला आहे.

काँग्रेस एकाकी

दिल्लीत काँग्रेस एकाकी पडली आहे. सर्वच पक्षांनी केजरीवालांना साथ दिल्याने काँग्रेसच्या पातळीवरही फारसा उत्साह नाही. खरी लढत आप आणि भाजपमध्ये होणार असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे. मोजक्याच मतदारसंघात काँग्रेस तुल्यबळ लढत देऊ शकते, असे चित्र आहे. पण त्याचा निवडणुकीच्या निकालावर फारसा परिणाम होईल, असे चित्र नाही. एकाकी पडलेल्या काँग्रेससमोर खाते उघडण्याचेच आव्हान असेल.

कोणती चूक भोवली?

इंडिया आघाडी ही केवळ लोकसभेपुरतीच होती, असा दावा आघाडीतील सर्वच मित्रपक्ष करत आहेत. त्यामुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे. एकीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र होते. पण दिल्लीमध्ये मात्र काँग्रेससोबत कुणीच नाही. त्याला काँग्रेसचेच आत्मघातकी धोरण कारणीभूत ठरल्याचे दिसते.

हरियाणातील निवडणुकीदरम्यान आप आणि काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हेही त्यासाठी आग्रही होते. पण राज्यातील काही नेत्यांच्या विरोधामुळे त्यात मिठाचा खडा पडला. विधानसभेचा निकाल आल्यानंतर काँग्रेसने आघाडी न करण्याची मोठी चूक केल्याचे स्पष्ट झाले. त्याचाच वचपा आपने दिल्लीत काढला. हरियाणामध्ये आघाडी झाली असती आणि सत्ता मिळाली असती तर कदाचित दिल्लीतही चित्र वेगळे निर्माण झाले असते.

आपने हरियाणाचे सुत्र दिल्लीत लागू करत काँग्रेसला काही जागा सोडण्याची तयारीही दाखवली असती. काँग्रेसचा दिल्लीत एकही आमदार नाही. त्यामुळे आपच्या साथीने राज्यात खाते उघडण्याची संधी पक्षाला मिळाली असती. पण तसे घडले नाही. हरियाणामध्ये पक्षाला अतिआत्मविश्वास नडला. त्याचे परिणाम आता पुढील अनेक निवडणुकांमध्ये भोगावे लागणार, हे स्पष्ट आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT