Sanjay Shirsat: शिळ्या कढीला ऊत! संजय शिरसाट यांच्या पोटातले पुन्हा आले ओठांवर!

Sanjay Shirsat controversial statement: उद्धव ठाकरे यांची साथ का सोडली, याची कारणे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांकडून अनेकदा देऊन झाली आहेत. मंत्रिपदाची इच्छा पूर्ण झालेल्या संजय शिरसाट यांनी ठाकरे यांना सोडल्यामुळे आमचा फायदा झाला, असे थेट सांगून टाकले आहे.
Uddhav Thackeray Vs Sanjay Shirsat
Uddhav Thackeray Vs Sanjay Shirsat Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena News: सध्या राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. परभणी, बीड जिल्ह्यांतील दुर्दैवी घटनांचे पडसाद दररोज उमटू लागले आहेत.

महायुतीला प्रचंड असे बहुमत मिळाले आहे, त्यामुळे सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. त्यामुळेच की काय काही सत्ताधारी नेते, आमदारांची बिनधास्त वक्तव्ये कानावर पडत आहेत, मात्र लोकांचे त्याकडे फारसे लक्ष जात नसावे.

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचेही एक वक्तव्य लोकांच्या फारसे लक्षात आले नसेल. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो, त्याचा आम्हाला फायदा झाला, असे ते म्हणाले आहेत.

मंत्री शिरसाट यांच्या विधानात वादग्रस्त किंवा महत्वाचे काय आहे, असे वाटणे साहजिक आहे. शिवसेना सोडण्याची, म्हणजे उद्धव ठाकरे यांना सोडण्याची अनेक कारणे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहेत. हिंदुत्वासाठी आम्ही शिवसेना सोडली, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तडजोड केली, महाविकास आघाडी सरकारमधील वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून निधी मिळत नव्हता... अशी होती ती कारणे.

Uddhav Thackeray Vs Sanjay Shirsat
PCMC News: तिसरं अपत्य जन्माला घातलं अन् सरकारी नोकरी गेली! पिंपरी महापालिकेचा बडा अधिकारी बडतर्फे

महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे मंत्री होते. बहुतांश मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवून घेतलेले नगरविकास खाते त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना दिले होते. महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र असल्यामुळे शिरसाट आणि अन्य काही इच्छुक आमदारांना मंत्रिपदे मिळाली नव्हती. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी, बाळासाहेबांच्या विचारांशी तडजो़ड केली, असा साक्षात्कार एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या 40 आमदारांना झाला, त्यावेळी सरकार स्थापन होऊन अडीच वर्षे झाली होती. तोपर्यंत हे सर्वजण सत्तेचे लाभार्थी होते.

ठाकरेंची साथ सोडल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावेळीही शिरसाट यांची मंत्रिपदी वर्णी लागली नाही. त्यांना अखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागली, मात्र ते वंचितच राहिले. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादा पवारही आपल्या 40 आमदारांसह महायुतीत सहभागी झाले, पुन्हा अर्थमंत्री झाले. अजितदादा आम्हाला निधी देत नव्हते, हे ठाकरे यांना सोडण्यासाठीचे शिंदे आणि त्यांच्या आमदारांचे कारण अशा पद्धतीने निकाली लागले होते. ठाकरे यांनी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार बाजूला सारले, हे कारणही निकाली लागले होते.

Uddhav Thackeray Vs Sanjay Shirsat
Congress New Headquarters : भाजपनंतर काँग्रेसच्या मुख्यालयाचाही पत्ता बदलणार; काय आहे 'इंदिरा गांधी' भवन; VIDEO पाहा

लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबर धक्का बसला. त्यामुळे महायुतीचे नेते आणि आमदारांचे धाबे दणाणले होते. विधानसभा निवडणुकीने मात्र महायुतीला तारले. महायुतीतही तीन पक्ष असल्यामुळे मंत्रिपद मिळेल की नाही, अशी धाकधूक संजय शिरसाट यांच्या मनात निर्माण झाली होती. तशी ती अनेकांच्या मनात निर्माण झाली असेल, मात्र गेली अडीच वर्षे शिरसाट आणि भरत गोगावले हे मंत्रिपदावरून सातत्याने चर्चेत राहिले. या दोघांनाही मंत्रिपद मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी अनेकवेळा नाराजी व्यक्त केली होती.

शिरसाट, गोगावले यांच्या गळ्यात अखेर मंत्रिपदाची माळ पडली. शिरसाटांची इच्छा पूर्ण झाली आणि त्याच्या भरातच मंगळवारी (ता. 7) ते बोलून गेले. उद्धव ठाकरे यांना सोडल्यामुळे आमचा फायदा झाला, असे ते म्हणाले. मी अतिशय सामान्य कुटुंबातून आलो आहे. माझ्यात क्षमता होती म्हणून पक्षाने मला संधी दिली, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून ते सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. यापूर्वी तीनवेळा ते विजयी झाले, त्यावेळी ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते.

सत्ता आणि पद हे कोणत्याही राजकीय नेत्यासाठी सर्वात महत्वाचे असते, हे 2019 नंतरच्या राज्यातील राजकीय घडामोडींनी अधोरेखित केले आहे. एखादा नेता विचारसरणी, तत्व याबाबत बोलत असेल तर त्यावर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न या घडामोडींमुळे निर्माण झाला आहे. संजय शिरसाट यांच्या तोंडून सत्य बाहेर पडले आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. शिवसेनेतून बाहेर पडल्यामुळे आमचा फायदा झाला, हे त्यांचे विधान बोलके आहे, राजकीय नेत्यांच्या मनात काय चालत असते, याची प्रचीती देणारे आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com