Maharashtra shocking incidents : महाराष्ट्राचे समाजमन सुन्न करणाऱ्या, हादरवून टाकणाऱ्या दोन घटना...!

Santosh Deshmukh murder case Somnath Suryawanshi death in custody Maharashtra crime news : सरलेल्या वर्षात डिसेंबरमध्ये घडलेल्या दोन घटनांमुळे महाराष्ट्राचे समाजमन सुन्न झाले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या आणि परभणीत न्यायालयीन कोठडीत झालेला सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू, या त्या दोन घटना. हादरवून टाकणाऱ्या या घटनांचे पडसाद अद्यापही उमटत आहेत.
Santosh Deshmukh, Somnath Suryawanshi
Santosh Deshmukh, Somnath SuryawanshiSarkarnama
Published on
Updated on

सरलेल्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये 9 आणि 15 तारखेला महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या दोन दुर्दैवी घटना घडल्या. त्या घटनांचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. सामाजिक, राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मस्साजोग (ता. केज. जि. बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांचा 9 डिसेंबर रोजी अत्यंत क्रूर पद्धतीने खून करण्यात आला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी परभणी येथे पोलिस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. ही दोन्ही प्रकरणे नेमकी काय होती, हे जाणून घेऊ.

आमदार जितेंद्र आव्हाड, सुरेश धस यांनी वाचा फोडली

सरपंच देशमुख यांच्या खुनाची बातमी बाहेर आली होती. मात्र खून ज्या क्रूर पद्धतीने करण्यात आला, त्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, भाजपचे बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी सभागृहात मांडली. खून करण्याची पद्धत हादरवून टाकणारी होती. आव्हाड यांनी या प्रकरणात वाल्मिक कराड याचे नाव घेतले. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे संशयाच्या फेऱ्यात अडकले. सुरेश धस यांची मांडणी मुद्देसूद होती, मात्र त्यांनी त्या दिवशी सभागृहात कोणाचेही नाव घेतले नव्हते.

Santosh Deshmukh, Somnath Suryawanshi
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडच्या अडचणीत भर; खंडणी प्रकरणी आता 'या' साथीदाराचे घेतले व्हॉईस सॅम्पल्स

सरपंच देशमुख यांचा खून का करण्यात आला?

मस्साजोग येथे पवनचक्की कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीकडून खंडणी उकळण्यासाठी 6 डिसेंबर 2024 रोजी काही गुंड आले होते. कंपनीचा सुरक्षारक्षक हा मस्साजोगचा रहिवासी आहे. गुंडांनी त्याला आत सोडण्यास सांगितले, मात्र अधिकाऱ्यांशी बोलून परवानगी घेतो, असे सुरक्षारक्षकाने त्यांना सांगितले. हे सहन न झाल्यामुळे गुंडांनी त्याला मारहाण केली. सुरक्षारक्षकाने सरपंच देशमुख यांना कॉल केला. गावातील व्यक्तीला मारहाण झाल्याचे समजल्यामुळे सरपंच देशमुख काही कार्यकर्त्यांसह तिकडे गेले. त्यांनी मध्यस्थी केली. गुंडांनी त्यांच्याशीही अरेरावी केली. देशमुख यांनी या गुंडावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला सुदर्शन घुले त्या दिवशी घटनास्थळावर होता. त्यानेच देशमुख यांच्याशी वाद घातला होता. या रागातूनच सरपंच देशमुख यांचे नंतर अपहरण करण्यात आले आणि अमानुष मारहाण करून त्यांचा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. पवनचक्कीच्या वादातूनच त्यांचा खून झाला आहे. खंडणीखोरांच्या आड येणे सरपंच संतोष देशमुख यांच्या जिवावर बेतले.

Santosh Deshmukh, Somnath Suryawanshi
Dhananjay Munde : "पुरुष वेश्या पहिल्यांदाच..."; धनंजय मुंडेंवर टीका करताना शरद पवारांच्या आमदाराची जीभ घसरली

त्या दिवशी नेमके काय घडले?

सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आले. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख हे होते. शिवराज देशमुख हे 9 डिसेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास संतोष देशमुख यांना केजमध्ये भेटले. त्यानंतर ते दोघे केजहून गावाकडे परत निघाले. संतोष देशमुख हे वाहन चालवत होते, शिवराज त्यांच्या शेजारी बसले होते. डोणगाव येथील टोलनाक्यावर त्यांच्या वाहनासमोर अन्य एक वाहन आले. देशमुख यांचे वाहन अडवण्यात आले. त्या वाहनातून खाली उतरलेल्या पाच ते सहा जणांनी देशमुखांच्या गाडीवर दगडफेक केली.

दगडफेक करत त्या तरुणांनी संतोष देशमुख यांना गाडीतून ओढून बाहेर काढले. काठ्या, लोखंडी रॉड, कोयत्याने त्यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना वाहनात टाकून अपहरण करण्यात आले. दगडफेकीतील एक दगड शिवराज देशमुख यांच्या सीटजवळ पडला होता. तो दगड बाजूला सारून बाहेर येईपर्यंत गुंडांनी संतोष देशमुख यांचे अपहरण केले होते. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, महेश केदार यांना शिवराज यांनी ओळखले होते. त्यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना फोन करून लागलीच ही माहिती दिली होती.

Santosh Deshmukh, Somnath Suryawanshi
Jitendra Awhad : 'वाल्मिक कराड 'विकृत', 'सायकोपॅथ', 'सीरियल किलर''; आमदार आव्हाडांचा बीडमधील दहा वर्षांतल्या हत्यांबाबतच्या दाव्यानं खळबळ

धनंजय देशमुख यांनी तातडीने केज पोलिस ठाणे गाठले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. अपहरणाच्या तीन तासांनंतर बोरगाव-दहिटणा रस्त्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी याची माहिती धनंजय देशमुख यांना दिला. संतोष देशमुख यांच्या शरीरावर शंभर ते दीडशे वार करण्यात आले, अशी माहिती आमदार धस यांनी सभागृहात दिली होती. गॅसचा 44 इंचांचा पाइप, दांड्याला लोखंडी तार गुंडाळलेले लाकूड, लोखंडी फायटर, कत्ती आणि तलवारसदृश्य हत्यारांनी सरपंच देशमुख यांना बेदम मारहाण करण्यात आली होती, हे उघड झाले आहे.

संतोष देशमुख यांचा खून किती क्रूर पद्धतीने करण्यात आला, याची माहिती आमदार आव्हाड, आमदार धस यांनी सभागृहात दिली. देशमुख यांना मारहाण करताना मारेकऱ्यांनी कोणाला तरी व्हिडीओ कॉल लावून ती दृश्ये दाखवली होती. आता पोलिसांनाही न्यायालयात याची पुष्टी केली आहे. देशमुख पाणी मागत होते, मात्र मारेकऱ्यांनी त्यांच्या तोंडात लधुशंका केली, असेही धस यांनी सांगितले होते. त्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे.

देशमुख यांच्या खूनप्रकरणात सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार प्रतीक घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. पवनचक्की कंपनीला तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे हे आरोपी आहेत. देशमुख यांचा खून केल्यानंतर आरोपी पळून गेले होते. घुले, सांगळे आणि कृष्णा आंधळे यांनी गुजरात गाठून तेथे एका मंदिरात आश्रय घेतला होता. कृष्णा आंधळे अद्यापही फरारी आहे. अन्य आरोपींना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. वाल्मिक कराड हाही पुण्यातच सीआयडीला शरण आला आहे.

परभणीत संविधानाचा अपमान, सोमनाथ सूर्यवंशीचा जीव गेला

परभणी येथे 10 डिसेंबर रोजी एका माथेफिरूने संविधानाच्या प्रतिकृतीचा अपमान केला. परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्याजवळ राज्यघटनेची प्रतिकृती बसवण्यात आलेली आहे. 10 डिसेंबरच्या सायंकाळी एका माथेफिरूने या प्रतिकृतीची विटंबना केली. राज्यघटनेची प्रतिकृती सुरक्षित राहावी, यासाठी काच लावण्यात आली होती. ती काच त्याने फोडली होती. त्यामुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. संविधानाचा अपमान करणाऱ्या माथेफिरूला पोलिसांनी अटक केली.

या प्रकारानंतर 11 डिसेंबर रोजी परभणीसह जिल्हा, राज्यातील अन्य शहरांमध्येही आंदोलने, निदर्शने करण्यात आली. आंबेडकरी संघटना, चळवळी रस्त्यावर उतरल्या होत्या. परभणीत हिंसाचार, जाळपोळ झाली. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून अनेकांना ताब्यात घेतले होते. या कोम्बिंग ऑपरेशनवरही प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सोमनाथ सूर्यंवशी या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशींचा 15 डिसेंबर रोजी मृत्यू झाला. ही घटनाही हादरवून टाकणारी होती. सोमनाथ यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केली होती, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता.

पुण्यात कामाला, परभणीत कायद्याचे शिक्षण

सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हा 35 वर्षीय तरुण मूळचा लातूरचा रहिवासी होता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सांगितले होते. कामानिमित्त तो पुण्यात राहत असे. त्याच्या आधार कार्डवर तो भोसरीचा रहिवासी असल्याचा उल्लेख होता. परभणीतील एका महाविद्यालयात त्याने एलएलबीला प्रवेश घेतला होता. तृतीय वर्षाची परीक्षा देण्यासाठी तो परभणीत आला होता. न्यायालयीन कोठडीत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने सोमनाथ यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते, मात्र मार लागल्याच्या धक्क्यातून त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. 

मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत निवेदन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ यांच्या मृत्यूबाबत विधानसभेत निवेदन केले होते. त्यानुसार, सोमनाथ यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहणीमुळे झालेला नाही. छातीत अचानक जळजळ सुरू झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यंवशी हे आंदोलक होते. परभणीत सुरू असलेल्या जाळपोळीच्या व्हिडीओत ते दिसत होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. सोमनाथ यांना दोन वेळा दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले, तुम्हाला मारहाण झाली का, अशी विचारणा दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे केली होती.

सोमनाथ कोठडीत असतानाचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध आहे. त्यांना कुठेही मारहाण झाल्याचे या फुटेजमध्ये दिसत नाही. वैद्यकीय अहवालात त्यांच्या जुन्या जखमांचा उल्लेख आहे. त्यांच्या खांद्याजवळचे एक हाड तुटलेले आहे. त्यांना श्वसनाचा दुर्धर आजार होता, असा उल्लेख वैद्यकीय अहवालात असल्याचे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. छातीत जळजळ सुरू झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेले जात होते. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सोमनाथ यांच्या मृत्यूबाबत निर्माण झालेल्या शंकांचे निरसन व्हावे, यासाठी न्यायालयानी चौकशी झाली पाहिजे, असे सांगत फडणवीस यांनी सोमनाथ यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणी येथे जाऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही सोमनाथ यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सोमनाथ यांच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथ यांचा मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबीयांनी केला. राहुल गांधी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, डॉ. प्रकाश आंबेडकर यांनीही असाच आरोप केला. पोलिसांवर कारवाईची मागणी करण्यात आली.

सोमनाथ यांचा ही मृत्यू 'कस्टोडियल डेथ' आहे, पोलिसांनी त्यांची हत्या केली. पोलिसांना संदेश देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत खोटे बोलले, असा आरोप राहुल गांधी यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर केला होता. सोमनाथ हे दलित होते, ते संविधानाचे संरक्षण करत होते, त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली, असेही राहुल गांधी म्हणाले होते. त्यामुळे वातावरण तापले होते. सोमनाथ यांचा जाळपोळीत सहभाग नव्हता, तो तेथे फोटो काढत होता, असे रामदास आठवले म्हणाले होते. पोलिसांनी कोठडीत सोमनाथ यांना मारहाण केली होती, असा दावा आठवले यांनी केला. त्यामुळे सरकारच्या, पोलिसांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातुःश्री विजया सूर्यवंशी यांनीही पोलिसांवर गंभीर आरोप केलेले आहेत. माझ्या मुलाला पोलिसांनी मुद्दाम उचलून नेले आणि त्याला बेदम मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी सोमनाथचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यासाठी आम्हाला फोन केला, असे त्या म्हणाल्या आहेत. माझ्या मुलाला गंभीर मार लागला होता. त्याला अवघड ठिकाणीही मारहाण करण्यात आली होती. डोक्यावरही मारहाण करण्यात आली, असा दावा विजया सूर्यवंशी यांनी शवविच्छेदन अहवालाचा हवाला देत केला होता.

सोमनाथ यांना पोलिसांनी तीन-चार दिवस बेदम मारहाण केली, असा आरोप त्यांच्या लहान भावाने केला होता. देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना पकडण्यासाठी दिरंगाईचा आरोप पोलिसांवर झाला. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्युमुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे. दोन्ही घटनांमध्ये राज्य सरकार आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाले आहेत. या दोन्ही दुर्दैवी घटनांना आता महिना पूर्ण होईल. अद्यापही त्याचे पडसाद उमटत आहेत.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com