Eknath Shinde, Devendra Fadnavis  Sarkarnama
विश्लेषण

Shinde - Fadnavis News : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडवणीस दोघेही डॉक्टर ; 'सर्जरी'साठी कुणाचा नंबर लावणार ?

Rashmi Mane

Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधकच शिल्लक न ठेवण्याचा चंग बांधलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांना साथ देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकारणासोबतच डॉक्टरेट पदवीही मिळवली आहे. हे सर्व त्यांनी व्यवस्थित मॅनेज केले असले तरी आगामी काळात निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्या दरबारात त्यांना जायचे आहे.

फडणवीस यांनी शिवसेना फोडत एकनाथ शिंदे गट गळाला लावला तर त्यानंतर वर्षभरातच शिंदे, फडवणीस दोघांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस फोडत अजित पवार यांना जवळ केले. त्यामुळे आगामी काळात डॉक्टर असलेले एकनाथ शिंदे, देवेंद्र फडवणीस दोघेही सर्जरीसाठी कोणाचा नंबर लावणार ? याची उत्सुकता आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी चर्चा रंगली आहे. त्यामुळे दोघेही या डॉक्टरकीच्या माध्यमातून राजकीय उपचार कोणावर करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काही दिवसापूर्वी सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापनातील उल्लेखनीय कार्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूटकडून डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली. तर जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे. त्यामुळे दोघेही नावापुढे आता नावापुढे डॉक्टर ही पदवी लावू शकणार आहेत.

गेल्या वर्षभरातील दोघांचे राजकारण पाहता त्यांना फोडाफोडातील सर्जन असलेले डॉक्टर काही जण म्हणत असतील तर राजकारणात अशा उपहासात्मक दिल्या जाणाऱ्या पदवीकडे लक्ष देण्याची गरज नाही. काही जण दोघांकडून रात्री अपरात्रीच्या गुप्त भेटीतून केल्या जात असलेल्या त्यांच्या अभ्यासावर होत असलेल्या टिकेकडंही जास्त लक्ष देण्याची गरज नाही.

कारण राजकारणात यशस्वी होण्यासाठी अशी वेळोवेळी ऑपरेशन करावीच लागतात. त्याशिवाय कधी कधी तर अजित पवार यांना सत्तेत सहभागी करून घेत विरोधकांवर सर्जिकल स्ट्राइक करावाच लागतो, हे तुम्ही दाखवून दिले आहे. राजकारणातील चाणक्य हे सिद्ध करून दाखवायचे असेल तर अशी ट्रीटमेंट करावीच लागते. त्याशिवाय ऑक्सिजनवर असलेल्या यंत्रणेला येत्या काळात कॅल्शियमची गोळी देऊन पूर्ववत आणायची किमया साधावी लागणार आहे.

काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण लोकप्रिय होत असलेली दिलेली जाहिरात, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी होत असलेली जवळीक, वारंवार दिल्लीचे दौरे, शिंदेंची काम करण्याची पद्धत यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस सावध पावले टाकत असताना दिसत आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांची सत्तेतकरून घेतलेली एंट्री, बदलती मुख्यमंत्रीपदाची चर्चा यावरून देखील एकनाथ शिंदे वारंवार नाराज होत असल्याच्या घटना, या दोघांमधील कधी न बोलून दाखवली जाणारी छुपी ईर्षा समोर येत आहे. एकंदरीतच हे वातावरण चाल-प्रतिचाल करणारे असले तरी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या डॉक्टरकीचा फायदा या दोघांना एकत्र राहून उचलायचा आहे.

गेल्या काही दिवसात महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बदललेली आहे. फोडाफोडीच्या राजकारणामुळे जनमाणसात दोघांनीही आपली प्रतिमा मलीन केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सतेत आल्यानंतर तळागाळातील कार्यकर्ता आपल्या सोबत कसा राहील याचा विचार येईल तो आपला ही भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर ठाकरे गट अस्तित्वाला शिल्लक आहे. शिंदे आणि त्यांच्या आमदारावर गद्दारीचा शिक्का असल्याने जनमत त्यांना स्वीकारेल का याची शाश्वती नाही. तर दुसरीकडे भाजपच्या काळात वाढती महागाई, गॅस दरवाढ, राज्यातील फोडाफोडीचे राजकारण, अजित पवार यांना सत्तेत सहभागी करून घेणे या संपूर्ण प्रकारामुळे सर्वसामान्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिमा मलीन केली आहे. त्यामुळे या सर्व बाबीवर योग्य उपचार करावे लागणार आहेत.

त्याशिवाय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात सुरू असलेला छुपा संघर्ष व्हेंटिलेटरवर न घेऊन जाता, विरोधकांना मिळालेलेल्या सहानुभूतीचे सलाईनवर या सर्वांवरच राजकीय ट्रीटमेंट करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना राजकारणातील चाणक्य हे सिद्ध करून दाखवायचे आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर येत्या सहा महिन्यात आपल्या स्वतःला सिद्ध करायचे आहे. या दोघांनाही विरोधक आणि मतदार यांच्यावर योग्य ती ट्रीटमेंट करायची आहे. त्यामुळे हे दोघेही डॉक्टरकीचे आव्हान पेलत कोणावर राजकीय उपचार करणार हे पाहणे येत्या काळात औतुसक्याचे ठरणार आहे.

SCROLL FOR NEXT