Dharashiv News: एकनाथ शिंदे 40 आमदारांसह उद्धव ठाकरे यांच्यापासून बाजूल होत भाजपसोबत गेले. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. ठाकरेंची साथ सोडणाऱ्या त्या आमदारांचा रोष त्यावेळी कोणावर होता? काही आठवते का? डोक्याला थोडा ताण दिलात तर तुम्हाला आठवेल की या आमदारांचा सर्वाधिक राग अजितदादा पवार यांच्यावरही होता.
निधीच्या वाटपात अजितदादा पवारांनी अन्याय केला, हे त्या रागाचे कारण असल्याचे त्यावेळी हे आमदार सांगत असत. आता हे आमदार कुठे आहेत आणि अजितदादा पवार कुठे आहेत?
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे अर्थातच ठाकरे यांना सोडलेल्या त्या 40 आमदारांपैकीच एक. सरनाईक यांच्या गळ्यात धाराशिवच्या पालकमंत्रिपदाची माळ पडली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री म्हणून सरनाईक यांनी धाराशिवचा पहिला दौरा केला.
विधानसभा निवडणुकीत या जिल्ह्याने एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. त्यांचे एक माजी मंत्री तानाजी सावंत यांचा भूम-परंड्यातून निसटता विजय झाला आहे. सलग तीन टर्म उमरग्याचे आमदार राहिलेले ज्ञानराज चौगुले यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे सरनाईक यांना ठाकरे यांच्या शिलेदारांशी जवळीक दाखवण्याचा मोह आवरता आला नसावा.
हा मोह पालकमंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या अंगलट आल्याचे दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे महायुतीतच आहेत, असे विधान त्यांनी केले. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या भुवया उंचावल्या. सरनाईक यांचे हे विधान राजेनिंबाळकर यांच्यासाठी जणू फुलटॉस बॉलच ठरला, त्या बॉलवर त्यांनी सिक्सर लगावला.
पालकमंत्री म्हणून सरनाईक यांचा हा पहिलाच दौरा होता. राजकीय नेते राजकारण करणारच. पण आपल्या पहिल्या दौऱ्यात हे टाळून सरनाईक यांनी जिल्ह्यातील प्रश्नांचा आढावा घेण्यावर भर दिला असता तर बरे झाले असते.
राजेनिंबाळकर यांनी सरनाईक यांच्या विधानाला सडेतोड उत्तर देताना भाई उद्धवरावदादा पाटील यांचा दाखला दिला. भाई उद्धवरावदादा पाटील हे शेतकरी कामगार पक्षाच्या संस्थापकांपैकी एक. ते विरोधी पक्षनेते होते. यशवंतराव चव्हाण यांना केंद्रात जावे लागणार होते. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी सक्षम नेत्याचा शोध सुरू केला होता. त्यांनी उद्धवरावदादा यांना काँग्रेसमध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास उद्धरावदादा यांना मुख्यमंत्री करू, असा निरोप यशवंतरावांनी पाठवला होता.
भाई उद्धवरावदादा पाटील यांनी यशवंतरावांची ही ऑफर नाकारली होती. मुख्यमंत्रिपदासाठी मी माझ्या विचारांशी, पक्षाशी प्रतारणा करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. राजेनिंबाळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना याचा दाखला दिला. मी उद्धवरावदादांच्या जिल्ह्यातला आहे, याची आठवण त्यांनी सरनाईक यांना करून दिली.
संकटकाळात उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असेही त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात वाघाचा मुक्त संचार आहे. माझा नाद सोडून सरकारने आधी त्या वाघाला पकडावे, असेही ते म्हणाले.
खासदार राजेनिंबाळकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत सुरू असलेल्या काही घडामोडींचा उल्लेख केला. यासाठी त्यांनी उदय सामंत प्रकरणाचा आधार घेतला. उद्योगमंत्री उदय सामंत हे 20 आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार आणि उपमुख्यमंत्री बनणार, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे.
अर्थात मंत्री सामंत यांनी त्याचा इन्कार केला आहे. उदय सामंत यांच्या प्रकरणापासून लक्ष विचलित व्हावे, यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आपण महायुतीत येणार असल्याची अफवा पसरवली, असा पलटवार राजेनिंबाळकर यांनी केला.
पालकमंत्री सरनाईक यांच्या पहिल्या दौऱ्याने काय साध्य झाले? राजकीय वातावरण ढवळून निघाले, हे खरे असले तरी सरनाईक यांना पालकमंत्रिपद फोडाफोडी करण्यासाठी मिळाले आहे का? अशी चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे. आता थोडे मागे जाऊया. मागे म्हणजे शिवसेना फुटली, फुटणाऱ्यांनी अजितदादांवर खापर फोडले वगैरे. खापर फोडणारे आता अजितदादांसोबत सत्तेची फळे चाखत आहेत. त्यामुळे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना महायुतीत, शिवसेनेत घेण्यासाठी सरनाईक आणि त्यांच्या पक्षप्रमुखांना कोणतीही अडचण नसणार, हे उघड आहे.
कार्यकर्त्यांच्याही आता हे अंगवळणी पडले असण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राजेनिंबाळकर यांच्याविरोधात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला होता. त्यात शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते, कार्यकर्त्यांचाही समावेश होता. विधानसभा निवडणुकीतही असेच झाले. जिल्ह्यातील चारपैकी दोन ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विजयी झाले. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत कसेबसे निवडून आले, या निवडणुकीतही कार्यकर्ते एकमेकांच्या समोर शड्डू ठोकून उभे ठाकले होते.
कार्यकर्त्यांनी मर मर मरायचे, शत्रुत्व पत्करायचे आणि पालकमंत्र्यांनी येऊन म्हणायचे की, राजेनिंबाळकर हे महायुतीचेच आहेत! पालकमंत्री सरनाईक यांची ही कृती कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारी, त्याचा भ्रमनिरास करणारी ठरली आहे. तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगजतिसिंह पाटील आणि खासदार राजेनिंबाळकर यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. या पार्श्वभूमीवर सरनाईकांना काही वेगळा संदेश तर द्यायचा नव्हता ना, अशीही चर्चा सुरू झाली आहे. राजकारण जरूर करावे, मात्र फक्त राजकारणच न करता लोकांच्या समस्यांकडेही लक्ष द्यायला हवे, याचे भान पालकमंत्र्यांनी ठेवायला हवे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.