
Chandrakant Khaire News : एकीकडे जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागली आहे. त्यांचे एक एक पदाधिकारी सत्ताधारी शिवसेना शिंदे गटात जात आहेत. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटाकडून आपल्याला खासदार पदाची तर भाजपाकडून राज्यपाल पदासाठी ऑफर आली होती, असा दावा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक असल्यामुळे या दोन्ही पक्षांच्या ऑफर धुडकावल्या, असेही खैरे यांनी सांगितले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Shivsena) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अशा दोन सेनांमध्ये गेल्या अडीच वर्षापासून संघर्ष सुरू आहे. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीने मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात सपाटून मार खाल्ला. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा सोडता महाविकास आघाडीने सातही जागा जिंकल्या.
संभाजीनगर मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Chandrakant Khaire) चंद्रकांत खैरे यांचा पराभव होऊन ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. दरम्यान त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मराठवाड्यासह राज्यात जोरदार मुसंडी घेत बहुमताने सत्ता मिळवली. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्हाच नव्हे तर मराठवाड्यातील नांदेड, जालना व इतर जिल्ह्यातील स्थानिक नेते आणि पदाधिकारी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत नवा राजकीय पर्याय म्हणून शिवसेना शिंदे गटाला पसंती दर्शवली.
संभाजीनगर मध्ये पक्षाला गळती लागलेली असताना चंद्रकांत खैरे यांनी मात्र वेगळाच दावा केला आहे. लोकसभा निवडणूक होण्याआधी शिवसेना शिंदे गटाने माझ्याकडे काही माणसे पाठवून मला उमेदवारीची ऑफर दिली होती. मात्र उद्धव ठाकरेंच्या पाठीत ज्यांनी खंजीर खुपसला, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली त्यांच्यासोबत मी कदापी जाणार नाही, हे ठणकावून सांगितले. एवढेच नाही तर भाजपानेही आपल्याला राज्यपाल करतो अशी ऑफर देत पक्षात येण्याची गळ घातली होती, असा दावाही खैरे यांनी केला.
मी दहा वर्षे आमदार आणि वीस वर्षे खासदार होतो, राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणूनही काम केले आहे. तर दिल्लीत माझा मोठा जनसंपर्क आहे. भाजपाच्या दिल्लीतील अनेक नेत्यांनी मला भाजप मध्ये येण्याची ऑफर दिली होती. परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला खूप काही दिले आहे. आता काही मिळाले नाही तरीही शिवसेना सोडण्याचा विचार माझ्या मनाला कधी शिवणार नाही. मी निष्ठावान शिवसैनिक आहे, असेही चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.
2019 आणि त्यानंतरच्या 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. त्यानंतर मातोश्री वरील खैरे यांचे राजकीय वजन कमी झाल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र जेव्हा 2024 मध्ये लोकसभेची उमेदवारी कोणाला द्यायची? याची पक्षात चर्चा झाली तेव्हा सगळ्यांनी खैरे यांच्या नावाला पसंती दर्शवली होती. पक्षात फूट पडलेली असताना खैरे उद्धव ठाकरे यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले. वीस वर्ष लोकसभेत संभाजीनगरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खैरे यांचा दांडगा जनसंपर्क असल्यामुळे त्यांनाच उमेदवारी द्यावी, असा आग्रह संभाजीनगर जिल्ह्यातील स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला होता.
शिवसेनेचे दुसरे नेते अंबादास दानवे यांनी उमेदवारीवर दावा सांगितलेला असताना उद्धव ठाकरे यांनी मात्र खैरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. परंतु सहाव्यांदा लोकसभेची उमेदवारी मिळाली असताना खैरे यांचा मात्र शिवसेनेतून बाहेर पडलेल्या संदिपान भुमरे यांच्याकडूनच पराभव झाला. सध्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा एकही खासदार आमदार नाही, शिवाय आहे ते स्थानिक पदाधिकारी पक्ष सोडून जात आहेत. अशावेळी खैरे यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपाकडून आपल्याला ऑफर होती, असा दावा करत शिवसेनेतील आपले स्थान अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.