Nana Patole-Uddhav Thackeray-Sharad Pawar Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Politic's : मुख्यमंत्रिपदावरून निवडणुकीपूर्वीच रंगला ‘सामना’!

Chief Minister Post : राऊत यांच्या इशाऱ्यामध्ये एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे ‘तर भविष्यात चित्र वेगळे दिसेल’ याचा अर्थ कोणताही काढता येतो. यापूर्वीच्या एका लेखात म्हटले होते, की शिवसेना कधीही रंग बदलू शकते. आजपर्यंत त्यांनी अनेक वेळा रंग बदलले आहेत. हा पक्ष कोणाबरोबरही जाऊ शकतो.

प्रकाश पाटील - Prakash Patil

Mahavikas Aghadi News : शिवसेनेला वाटते की मुंबईसह विदर्भ, कोकण, मराठवाड्यात अधिक जागा जिंकून पुन्हा मुख्यमंत्रिपद स्वपक्षाकडे यावे. महायुती आणि आघाडीत दोन डझन तरी असे नेते आहेत की ते मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यांच्यात राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. मात्र आजच्या अस्थिर राजकारणात मुख्यमंत्रिपदाची ‘लॉटरी’ कोणाला लागेल, हे काही सांगता येत नाही. मुख्यमंत्रिपदासाठी नशीबच लागते, असे म्हणावे लागेल.

ग्रामपंचायत सदस्य झाला की त्याला उपसरपंच व्हावे वाटते. उपसरपंचाला सरपंच. पुढे, पंचायत समिती सदस्याला सभापती, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, आमदार, मंत्री पुढे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न राजकारणात येणारा प्रत्येक कार्यकर्ता पाहत असतो. पण, मुख्यमंत्रिपद हे एकच असल्याने ते सहजासहजी मिळत नाही.

आजपर्यंत कितीजणांचे मुख्यमंत्री (Chief Minister) होण्याचे स्वप्न भंगले असेल, याची यादी करायची तर ती खूप लांबत जाईल. पहा ना आपले दादा! गेली अनेक वर्षे मुख्यमंत्रिपद मिळेल म्हणून प्रतीक्षा करीत आहेत. २०१९ मध्ये कोणाला तरी वाटले होते का की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील म्हणून. ते कॉंग्रेसबरोबर युती करतील म्हणून. पण ते घडले. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, ते का उगाच म्हणत नाही.

नगरमधील दोन राजकीय घराणी अशी आहेत की त्यांनाही हे मुख्यमंत्रिपद हुलकावणी देत आहे. क्षमता असूनही संधी मिळत नाही. या सर्वांच्या पेक्षा खऱ्या अर्थानं नशीबवान ठरले ते बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे.

महाआघाडीत कलगीतुरा!

राज्यात आज घडीला जे काही महत्त्वाचे पक्ष आहेत, त्यात भाजप, काँग्रेस, दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी. त्यानंतर छोटे-मोठे. बिचाऱ्यांचे त्यांचे नशीब कधी उजाडेल देव जाणो. तरीही स्वप्न पाहायला काय हरकत आहे. स्वप्न काय, कोणीही पाहू शकतो. कोणता पक्ष बहुमताजवळ जाऊ शकतो. कोणाशी आघाडी किंवा युती करतो, ही त्या त्या वेळची समीकरणे असतील. निवडणूक लागायची आहे. तोपर्यंत प्रत्येक पक्षाला मुख्यमंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत. आमचाच मुख्यमंत्री होणार. मीच मुख्यमंत्री होणार, असे दावे केले जात आहे. मुख्यमंत्रिपदावरून महाआघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीमध्ये कलगीतुरा रंगला आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखविला. आमच्या खासदारांची संख्या वाढली, त्यामुळे आगामी निवडणुकीतही काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना वाटते. तेच नाना पटोलेही सांगत आहेत.

वास्तविक आमच्या जागा अधिक निवडून आल्या आहेत. पुढे येतील आणि मुख्यमंत्रीही होईल असा दावा करण्यात गैर काहीच नाही. तसा दावा शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसही करू शकते. मात्र, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ते सहन होत नाही. या पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना असे वाटते, की काँग्रेसच्या विजयात शिवसेनेचा मोठा वाटा आहे. तसे पाहायला गेले, तर सर्वांत मोठा वाटा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आहे, याचा विसर काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांना का पडतो आहे?

या तीनही पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढविली. महायुतीविरोधात वज्रमूठ केली हे खरचं आहे. येथे दुसरी गोष्टही लक्षात घेतली पाहिजे की राज्यातील जनता भाजप विशेष: केंद्रातील मोदी सरकारवर नाराज होती. फोडाफोडीचे राजकारण, भ्रष्ट नेत्यांची पाठराखण, दूध आणि कांद्याचा प्रश्‍नही महायुतीला भोवला. त्याचा राग मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केला होता. म्हणजेच सरकार कोणतेही असो जर का एकदा जनतेने ठरविले की एखाद्याला धडा शिकवायचा तर जनता ती करून दाखवते.

या लोकसभा निवडणूकही तेच चित्र पाहाण्यास मिळाले. म्हणून कॉंग्रेस असो की शिवसेना त्यांनी आपल्या पक्षाची ताकद आहे म्हणून आम्हाला यश मिळाले, असा दावा करण्यात काही तथ्य नाही. सत्ताधाऱ्यांविरोधात एकीने लढले त्याचा फायदा महाआघाडीला झाला, असे म्हणावे लागेल. विधानसभेला या तीनही पक्षांची अशीच एकजूट राहिली, तरच महाआघाडीला यश खेचून आणणे सोपे जाईल.

काँग्रेस, शिवसेनेत ‘भाऊबंदकी!’

कॉंग्रेसच्या दाव्यानंतर संजय राऊत यांनी म्हटले आहे, की महाविकास आघाडीमध्ये आम्ही तीनही पक्ष एकत्र निवडणूक लढवू. ‘लहान भाऊ’, ‘मोठा भाऊ’, ‘मधला भाऊ’, ‘धाकटा भाऊ’ असे म्हणण्याची कोणाला एवढीच खुमखुमी असेल तर महाराष्ट्रातील चित्र भविष्यात वेगळे दिसेल. कॉंग्रेसच्या जास्त जागा जिंकून येण्यामागे शिवसेनेचेही योगदान असल्याची आठवण त्यांनी कॉंग्रेस नेत्यांना करून दिली.

राऊत यांच्या इशाऱ्यामध्ये एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे ‘तर भविष्यात चित्र वेगळे दिसेल’ याचा अर्थ कोणताही काढता येतो. यापूर्वीच्या एका लेखात म्हटले होते, की शिवसेना कधीही रंग बदलू शकते. आजपर्यंत त्यांनी अनेक वेळा रंग बदलले आहेत. हा पक्ष कोणाबरोबरही जाऊ शकतो. त्यांना काहीच वावडे नसते. हे जरी खरे असले तरी आघाडीच्या राजकारणातही शहकाटशह देत स्वपक्षाच्या अधिक जागा कशा जिंकूता येतील याचा विचारही प्रत्येक पक्ष करीत असतो. ते प्रत्येक निवडणुकीत सुरूच असते.

शिवसेनेला वाटते की मुंबईसह विदर्भ, कोकण, मराठवाड्यात अधिक जागा जिंकून पुन्हा मुख्यमंत्रिपद स्वपक्षाकडे यावे. काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय प्रत्येकाचाच मुख्यमंत्रिपदावर डोळा आहे. या महायुती आणि आघाडीमध्ये दोन डझन तरी असे नेते आहेत की ते मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यांच्यामध्ये राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. मात्र, आजच्या अस्थिर राजकारणात मुख्यमंत्रिपदाची ‘लॉटरी’ कोणाला लागेल हे काही सांगता येत नाही. मुख्यमंत्रिपदासाठीही नशीबच लागते असे म्हणावे लागेल.

अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क : ९८८१५९८८१५

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT