Maharashtra Politics Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Politics: नव्या राजकीय भूकंपामुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची झाली गोची; कट्टर शत्रू होणार मित्र?

Pune News: कोल्हे-आढळराव, आढळराव-मोहिते, शेळके-भेगडेंना कुस्ती नाही, तर आता दोस्ती करावी लागणार

उत्तम कुटे

पिंपरी : रविवारी (ता.२) महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूंकप झाला.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या समर्थकांसह शिंदे शिवसेना-भाजपच्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरण एकदम उलटे झाले आहे.

नव्या राजकीय नांदीमुळे पुणे जिल्ह्यातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या अनेक कट्टर राजकीय वैरी असलेल्या नेत्यांवर समझोता करण्याची वेळ आली आहे. त्यांना आता एकमेकांशी कुस्ती नाही, तर दोस्ती करावी लागणार आहे.

एवढेच नाही, तर त्यातून काहींच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ते पणास लागणार आहे वा त्यासाठी तडजोड करावी लागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे या कट्टर शत्रूंना एकमेकांशी कुस्ती खेळावी लागणार नाही, तर दोस्तीसाठी हात पुढे करावा लागणार आहे.

गेले वर्षभर भाजप आणि शिंदे शिवसेना राज्यात सत्तेत, तर राष्ट्रवादी विरोधी बाकावर होती. त्यामुळे त्यांच्यात कट्टर राजकीय वैमनस्य होते. आता मात्र, ते तिन्ही एकत्र आले आहेत. त्यामुळे राज्यात आता दोन नाही, तर तीन राजकीय पक्षांचे सरकार असणार आहे. दुसरीकडे आतापर्यंत ते एकमेकांचे विरोधक होते. त्यातून तिन्ही राजकीय पक्षांच्या अनेक नेत्यांनी त एकमेकांशी पंगा घेतलेला होता.

एकमेकांवर सडकून टीका केलेली होती. आता, मात्र हे तिन्ही राजकीय पक्ष एक झाल्याने पंगा घेतलेल्या स्थानिक पातळीवरील त्यांच्या नेत्यांची आता मोठी गोची झाली आहे. त्याला पुणे जिल्हा अपवाद नाही. शिवसेनेचे शिरूरचे सलग तीनवेळचे खासदार शिवाजीराव आढळऱाव-पाटील यांचा गतवेळी नेते झालेले अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी पराभव केला.

तो आढळरावांच्या जिव्हारी लागला. त्यातून या दोघांत कट्टर राजकीय वैमनस्य निर्माण झाले. हे दोघेही आगामी लोकसभेसाठी शिरूरमधून तीव्र इच्छूक आहेत. तशी तयारीही त्यांनी सुरु केली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकमेकांशी कुस्ती खेळणाऱ्या या दोघा आजी, माजी खासदारांना आता दोस्ती करावी लागणार आहे. तसेच २०२४ च्या लोकसभेला एकाचा पत्ता कट होणार आहे.

शिरूरच्या आजी, माजी खासदारांची जशी जानी दुश्मनी होती म्हणजे आहे, त्याप्रमाणे या मतदारसंघातील खेडचे आमदार दिलीप वळसे-पाटील आणि आढळराव यांचेही सख्य नाही. एकमेकांवर टीका करायची एकही संधी हे दोघे कधी सोडत नाहीत. सोडलीही नाही.

एवढेच नाही, तर खेडमधील या दोघांच्या पदाधिकाऱ्यांतूनही विस्तव जात नाही, अशी परिस्थिती आहे. ते बाजार समिती, जिल्हा बॅंक ते थेट आमदार आणि खासदारकीच्या निवडणुकीत अनेकदा दिसून आले आहे. आता, मात्र ते त्यांना झाकावे लागणार आहे.

अशीच स्थिती मावळात आहे. तेथे दोनवेळचे भाजपचे आमदार आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा गतवेळी २०१९ च्या विधानसभेला सुनील शेळके यांनी दणदणीत पराभव केला. त्यानंतर या दोघांत वैमनस्य निर्माणच झाले नाही, तर ते वाढलेही. एकमेकांवर टीका करायची संधी ते ही सोडत नाहीत.

विकासकामांच्या श्रेयावरून त्यांच्यात तू,तू,मैं,मैं,अनेकदा झालेली आहे. २०२४ च्या विधानसभेला ते पुन्हा एकमेकांशी भिडण्याची शक्य़ता होती. आता राज्यातील सत्तेत या दोघांचे पक्ष एकत्र आल्याने त्यांना आता मांडवली करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. तसेच परस्परांवरील टीकाही नाईलाजाने का होईना त्यांना थांबवावी लागणार आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT