Mumbai News : अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पाडून एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार पाडले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर पुन्हा त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल, असे वाटत असतानाच त्यांच्या जागी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवडणुकीनंतर डिमोशन झाले. त्यांना राजकारणातील जुळवाजुळवीत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे त्यांचा करिष्मा कायम आहे का ? त्याची चर्चा जोरात सुरु आहे.
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने एक हाती विजय मिळवला. त्यानंतर राज्यात 5 डिसेंबरला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. मात्र, सरकार स्थापन करण्यापासून ते आतापर्यंत महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे दिसत नाही. भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये या-ना त्या कारणावरून नाराजी असल्याचे पुढे येत आहे.
महायुतीची सत्ता राज्यात आल्यापासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची नाराजी लपून राहिलेली नाही. महायुतीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर शिंदे यांनी ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रीपदाबाबतचा दावा सोडत या वादावर पडदा टाकला होता. त्यानंतर खातेवाटपावरून नाराजी दर्शवली होती.
शपथविधीच्या काही तास अगोदरपर्यंत भाजप-सेनेतील चर्चा सुरु होती. त्यानंतर महायुतीत पालकमंत्रीपद वाटपाबाबतही दुजाभाव झाल्याची भावना काही शिवसैनिकांकडून व्यक्त केली. रायगडमध्ये तर मोठा वाद उफाळून आलेला बघायला मिळाला. त्यामुळे या सगळ्या घडामोडींमधूनच एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा जोरात रंगली आहे.
गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्याकडे नागरिकांचा ओढा कायम होता. मंत्रालयात त्यांना भेटण्यासाठी गर्दी होत होती. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या बंगल्यावर बैठकांचा सिलसिला कायम राहत होता. त्यामुळे हा सर्व राबता दोन महिन्यापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कमी झाला आहे का? असा प्रश्न सतावत आहे.
त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांचा ओघ कमी झालेला नाही. त्यातच आता त्यांच्याकडे देण्यासारखे काही नाही. देण्यासारखे फार काही नसल्याने त्यांच्याकडे पूर्वीप्रमाणे माणसांची गर्दी जमणार नाही, असे काही जणांना वाटत होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नावाचा करिष्मा कायम असल्याचे दाखवून दिले आहे.
एकनाथ शिंदे गेल्या दोन महिन्यांपासून मुख्यमंत्री पदात अजूनही अडकून का पडले आहेत ? हे एक न उलगडणारे कोडे आहे. मध्यंतरीच्या काळात नाराज असल्याने ते मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आले नाहीत म्हणून काही माध्यमांमध्ये नाराज असल्याच्या बातम्या झळकल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहिले नाहीत.
या बैठकीस ते व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात शिंदे नाराज असल्याच्या चर्चां जोरात रंगल्या आहेत. काही कामामुळे ते कदाचित आले नसावेत अथवा काही बोललेही नसावेत, असे दिसते. मात्र, ते नाराज नाहीत असे नंतर स्पष्ट करण्यात आले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या काळात इतर कारणांमध्ये फारसे अडकून न पडता आता कामाला लागण्याची गरज आहे. त्यांनी मंत्रालयात बसून त्यांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची कामे मार्गी लावण्याची गरज आहे. मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे नसले तरी फारसे नाराज होण्याची गरज नाही. त्यांनी जनतेची कामे पूर्ण केली पाहिजेत.
त्यांच्याकडे देण्यासारखं फारसे राहिले नाही याचा विचार न करता हातात आहे त्याच्यावर काम केले पाहिजे. पूर्वीप्रमाणेच ठाकरे सेना व महाविकास आघाडीतील नाराज नेते त्यांच्या पक्षाकडे येतच राहणार आहेत. मात्र, त्यासाठी एकनाथ शिंदे यांना येत्या काळात सक्रियपणे काम करावे लागणार आहे
येत्या काळात ते सक्रिय न राहिल्यास येणाऱ्या इतर पक्षातील नेतेमंडळींचा ओघ महायुतीमधील इतर पक्षांकडे सुरू राहणार आहे. त्याचा फायदा इतरांना होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतरही एकनाथ शिंदे यांचा करिष्मा कायम असल्याने त्यांनी येत्या काळात अंग झटकून कामाला लागावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.