Eknath Shinde News Sarkarnama
विश्लेषण

Eknath Shinde News : ना देवा 'भाऊ', ना अजित 'दादा'; महायुतीत शिंदेच एक(टा)नाथ!

अय्यूब कादरी

Eknath Shinde Political News : एकनाथ शिंदे 40 आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले त्यावेळी त्यांच्या क्षमेतविषयी शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी डावलून भाजपश्रेष्ठींनी शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवले. त्यामुळे भाजपमध्ये नाराजी निर्माण झाली होती.

उपमुख्यमंत्रिपद स्वीकारताना फडणवीस यांनाही नाराजी लपवता आली नव्हती. हा निर्णय आम्ही छातीवर दगड ठेवून स्वीकारला, अशी प्रतिक्रिया चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासमोर व्यक्त केली होती.

महायुतीत भाजपचे संख्याबळ सर्वाधिक असल्यामुळे शिंदे यांना फडणवीस यांच्या दबावाखाली काम काम करावे लागेल, अशी परिस्थिती होती. सुरुवातीचे काही दिवस तसे झालेही. देवेंद्र फडणवीस यांनी 'ओके' केल्यानंतरच सर्व फायली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे जातात, अशी चर्चा मध्यंतरी झाली होती. अविभाजित शिवसेनेत शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी मोकळीक दिली होती.

शिवसेनेतील मातब्बर मराठा चेहरा अशी शिंदे यांची ओळख. उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर शिंदे यांचा नेतृत्वगुणांच्या बाबतीत पडता काळ सुरू होईल, असे अनेकांना वाटत होते, मात्र शिंदे यांनी ते खोटे ठरवले. विधानसभेची निवडणूक जवळ येईल तशी महायुतीत एकनाथ शिंदे हेच सर्वाधिक शक्तिशाली आहेत, असे चित्र निर्माण होत आहे.

उद्धव ठाकरे यांना सोडून आपल्या सोबत आलेल्या सर्वांनाच मंत्रीपद देणे, हे शिंदे यांच्यासाठी केवळ अशक्य होते. त्यातच अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा महायुतीत प्रवेश झाल्यानंतर तर परिस्थिती आणखी बिकट झाली. शिंदे गटाच्या वाट्याला जाऊ शकणारी काही मंत्रिपदे अजितदादांच्या आमदारांना मिळाली. मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शिंदे गटातील काही आमदारांमध्ये त्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली होती. मंत्रिमंडळाचा विस्तार होतच नसल्यामुळे ही अस्वस्थता टोकाला गेली होती. अशा अस्वस्थ आमदारांना आता शिंदे यांनी महामंडळांचे अध्यक्षपद देऊ केले आहे.

आनंदराव आडसूळ, संजय शिरसाट, हेमंत पाटील आणि आता भरत गोगावले यांची विविध महामंडळांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या नाराज, अस्वस्थ नेत्यांचा विषय येथे संपला असे गृहीत धरले तरी येथून आणखी एक नवा विषय सुरू झालेला असतो, वादाला तोंड फुटलेले असते.

सरकार महायुतीचे (Mahayuti) आहे. महायुतीत तीन पक्ष सहभागी आहेत. मग महामंडळे एकाच पक्षाला कशी मिळू शकतात, असा पश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अजितदादा पवार यांच्या पक्षात नाराजी पसरली आहे. महायुतीतील सर्वात मोठा पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष महामंडळांवरील नियुक्त्यांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या खिजगणतीतही दिसून आले नाही

एकनाथ शिंदे हे कुशल संघटक आहेत. आपल्याला साथ देणाऱ्यांना ते वाऱ्यावर सोडत नाहीत. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसाठी सदैव उपलब्ध असतात, असे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सांगत असतात. सलग पाचवेळा निवडून आलेल्या खासदार भावना गवळी यांची उमेदवारी भाजपच्या दबाबामुळे शिंदे यांना कापावी लागली होती.

हेमंत पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी त्यांना रद्द करावी लागली होती. शिंदे यांनी भावना गवळी यांना विधान परिषेदवर घेतले आहे. हेमंत पाटील, मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले संजय शिरसाट, भरत गोगावले, जागा भाजपची असल्यामुळे उमेदवारी मिळू न शकलेले आनंदराव आडसूळ यांनाही त्यांनी न्याय दिला आहे. नेते जोडून ठेवण्याची हे कसब शिंदे यांच्याकडे आहे, हे त्यांच्या विरोधकांनाही मान्य करावे लागेल.

अजितदादा पवार यांचा महायुतीत प्रवेश झाल्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता पसरली होती. त्यानंतर झालेल्या पालकमंत्रिपदांच्या वाटपात अजितदादांनी बाजी मारली होती. शिंदे यांना शह देण्यासाठी अजितदादांना महायुतीत ओढण्यात आले, अशी चर्चा सुरू झाली होती.

दरम्यानच्या काळात शिंदे यांची भाजपच्या केंद्रातील नेत्यांसोबत निर्माण झालेली जवळीक फडणवीस यांच्यासाठी एक प्रकारची डोकेदुखीच होती. शिंदे यांनी आपले कसब पणाला लावत केंद्रातील भाजप नेत्यांसोबतची जवळीक आणखी वाढवली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असते.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा आत्मविश्वास वाढला आहे, त्यांची देहबोली बदलली आहे. शिंदे गटाने लोकसभेच्या 15 जागा लढवल्या आणि सात जागी त्यांचे उमेदवार विजयी झाले. 'स्ट्राइक रेट'च्या अंगाने पाहिले तर महायुतीत शिंदेच सर्वाधिक यशस्वी ठरले. त्यामुळे ते आता मित्रपक्षांची पर्वा करत नाहीत, असे चित्र आहे.

सुरुवातीच्या काळाच फडणवीस यांच्या दबावाखाली काम करणारे शिंदे यांनी कार्यकाळ संपत असताना महायुतीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्याच्या बळावरच महामंडळ अध्यक्ष निवडीत त्यांनी फडणवीस आणि अजितदादांनाही मात दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT