Shivsena Politics : सातारा जिल्ह्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे.जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी संघटन विस्ताराचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
सातारा, जावळी, महाबळेश्वर, वाई आणि खंडाळा या पाच तालुक्यांत पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी २०० हून अधिक जिवंत शाखा स्थापन करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. प्रत्येक शाखेला जनतेसाठी लढणारे सक्रिय केंद्र बनवण्याचा 'मास्टरप्लॅन' आखला आहे. हे पाचही तालुके भाजपचे आमदार आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री मकरंद पाटील यांचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात.
उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्याचा संकल्प जिल्हाप्रमुख भोसले यांनी केला आहे. त्यानुसार तालुकानिहाय बैठकांचे सत्र राबवून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संघटन विस्ताराची दिशा देण्यात आली. या मोहिमेत आतापर्यंत सुमारे १२ हजार सभासदांची नोंदणी करण्यात आली असून, त्यापैकी तीन हजार सक्रिय सभासदांची फळी तयार झाली आहे. त्यामुळे संघटनेला संख्यात्मक बळ मिळण्यासोबतच गावागावांत काम करणाऱ्या कार्यकत्यांची फळी तयार करण्याच्या दृष्टीने पायाभरणी झाली आहे.
आता यापुढील टप्पा अधिक व्यापक असून, पाच तालुक्यांत गावनिहाय नियोजन केले जाणार आहे. तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, महिला आघाडी आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन शाखा विस्ताराची मोहीम राबवण्यात येणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संपर्कप्रमुख शेखर गोरे यांच्या समन्वयातून या मोहिमेला गती देण्याचे नियोजन आहे. केवळ शाखा स्थापन करणे म्हणजे केवळ फलक लावणे किंवा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणे नव्हे, तर प्रत्येक शाखा वर्षभर कार्यरत राहिली पाहिजे, अशी भूमिका जिल्हाप्रमुख भोसले यांनी घेतली आहे.
ग्रामीण भागातील युवकांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करण्याचे उद्दिष्टही या मोहिमेत ठेवण्यात आले आहे. महिला आघाडी आणि युवासेनेचे संघटन अधिक सक्षम करून गावपातळीवर नव्या नेतृत्वाला संधी दिली जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.