Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संपूर्ण घडामोडींवर बारकाईने लक्ष असून त्यांनी मंत्र्यांना कामाला लावले आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मदतीने विशेष विमानांचे नियोजन करत पर्यटकांना महाराष्ट्रात आणले जात आहे. तर राज्यातील फडणवीसांचे सर्वात विश्वासू मंत्री गिरीश महाजन हेही श्रीनगरमध्ये समन्वयाचे काम पाहत आहेत. पण या घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा श्रीनगर दौरा चर्चेचा ठरला आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी फडणवीस यांनी तातडीने महाजनांना दोन दिवसांपूर्वी दिल्लीला पाठवले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली होती. त्याचप्रमाणे काही मंत्र्यांना पुणे, मुंबई विमानतळावर उपस्थित राहण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. त्यानंतर काही वेळात बातमी धडकली की, उपमुख्यमंत्री शिंदेही श्रीनगरला जाणार आहेत. एवढंच नाही तर त्यांच्याकडूनही आपल्या मंत्र्यांना ठिकठिकाणची जबाबदारी सोपविण्यात आले. तसेच हल्ला घडल्यानंतरही त्यांची एक टीम आधीच श्रीनगरमध्ये पोहचलीही होती.
महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजन श्रीनगरला जात असताना शिंदे कशासाठी गेले, असा सवाल यानिमित्ताने विचारला जाऊ लागला. शिंदे यांनी आपण एक सामान्य कार्यकर्ता असून एक शिवसैनिक म्हणून श्रीनगरमध्ये आल्याचे सांगितले होते. असे असले तरी ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, हे विसरून चालणार नाही. त्यांच्याच सरकारचा एक प्रतिनिधी श्रीनगरमध्ये जाणार असताना त्यांचे जाणे अनेकांना खटकले. कदाचित त्यात मुख्यमंत्री फडणवीस हेही असावेत.
श्रीनगरमध्ये गेल्यानंतर शिंदे यांनी पर्यटकांना भेटल्याचे, त्यांना विमानतळावर निरोप देतानाचे, जखमींना भेटल्याचे, जम्मू आणि काश्मीरच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटल्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केले. दुसरीकडे महाजन आणि फडणवीस यांच्याकडूनही रोजच्या घडामोडींची माहिती सोशल मीडियातून दिली जात होती. आजही ती दिली जातेय. पण ना शिंदेंनी, ना फडणवीसांनी एकमेकांच्या पोस्टवर किंवा कृतीवर भाष्य केले. फडणवीसांनी तर आपल्या सोशल मीडियावर शिंदे यांच्या श्रीनगर दौऱ्याचा उल्लेख करणेही टाळले आहे. त्यांच्याकडून केवळ गिरीश महाजन यांचे नाव घेतले जात आहे. त्यांच्याकडून आलेली माहितीच ते पोस्ट करताना दिसले.
फडणवीसांनी शिंदेंचा एकाही उल्लेख सोशल मीडियात केल्याचे आढळून आले नाही. इतरवेळी सरकारमध्ये समन्वय असल्याचे, तिन्ही पक्ष, नेते समन्वयातून, संवाद साधत काम करत असल्याचे सांगितले जाते. पण श्रीनगरमध्ये एवढी मोठी घटना घडलेली असताना आणि शिंदे तिथे उपस्थित असतानाही फडणवीस यांनी त्यांचा एकदाही उल्लेख न करणे, ही त्यांची नाराजी समजायची का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. शिंदे यांची नाराजी यापूर्वी लपून राहिलेली नाही. आता फडणवीसांनीही आपली नाराजी अनुल्लेखातून दाखवून दिलीय का?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.