NCP Ajit Pawar Politics : Sharad Pawar
NCP Ajit Pawar Politics : Sharad Pawar  Sarkarnama
विश्लेषण

NCP Ajit Pawar Politics : निवडणूक आयोग ठरवणार खरा राष्ट्रवादी पक्ष कोण? शिवसेनेच्या मार्गाचीच पुनरुक्ती..

मृणालिनी नानिववडेकर

Mumbai News : महाराष्ट्रातील सत्ताकारणाचे ऑपरेशन लोटस फुटणारा पक्ष शिवसेना (Shivsena) असो किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस, एकाच मार्गाने जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या उभ्या फुटीनंतर खरा पक्ष कोण हे ठरवण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना शिवसेना प्रकरणातील दाव्याप्रमाणेच निवडणूक आयोगाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Latest Marathi News)

शिवसेनेचा वाद हाताळताना सुभाष देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेवर खरा राजकीय पक्ष कोण हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे खरा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा की अजित पवारांचा याचा निर्णय निवडणूक आयोगाला घ्यावा लागणार आहे.

सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन वेगवेगळ्या गटांनी आपापला प्रदेशाध्यक्ष नेमला आहे.पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नेमलेला प्रदेशाध्यक्ष हटवायचा अधिकार कुणालाही नाही, बंडखोर गटही पवारांनाच अध्यक्ष मानत असल्याने वाद कुठे असा प्रश्न प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला असला, तरी पक्षाच्या घटनेत कार्याध्यक्ष पदावर नेमलेला नेता विधीमंडळ पक्षाचा प्रमुख नेमू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेत तशी तरतूद असल्याचा दावा केला जातो आहे. बंडखोर गटाच्या एका नेत्याने ही माहिती दिली.तसे असेल तर नव्याने नेमले गेलेले प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेच विधिमंडळ पक्षनेता नेमू शकतात असेही सांगितले जाते आहे.मात्र खरा पक्ष कोणता हे मात्र निवडणूक आयोगाला ठरवावे लागणार आहे.

विरोधी पक्षनेता नेमण्याचा अधिकार कुणाचा हे ठरवण्यासाठी पक्षाचा प्रतोद कोण हे ठरवावे लागेल. सुभाष देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष वेगळे आहेत अन प्रतोद नेमायचा अधिकार राजकीय पक्षाला असल्याचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रतोद राजकीय पक्षातर्फे नेमला जाणार हे निश्चित आहे. मात्र पक्ष कोण अन प्रदेशाध्यक्ष कोण हे ठरवायचे अधिकार निवडणूक आयोगाकडे असल्याने आता विधानसभा अध्यक्षांना आयोग काय म्हणणार याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असलेला राष्ट्रवादी पक्ष खरा की सुनील तटकरेंचा खरा हे आयोग ठरवेल. या पूर्वी महाराष्ट्रात सभागृहातील पक्षनेता हाच विधीमंडळ पक्षाचा नेता असे. मात्र उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेंव्हा कोणत्याही सभागृहाचे नेते नव्हते, त्यामुळे विधीमंडळ पक्ष नेता हा पक्षनेत्यापेक्षा वेगळा ठरला. शिवसेनेने विधीमंडळ पक्षाची घटनाच तयार केली नव्हती, त्यामुळे त्यांचा वाद सोडवण्यास आधार नव्हता, असे विधानसभेतील एका ज्येष्ठ नेत्याने नमूद केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसची विधीमंडळ पक्ष घटना तयार आहे त्यामुळे आयोगाच्या निर्णयानंतर खरेखोटेपणाचा वाद सोडवणे तुलनेने सोपे जाणार आहे.

पटेल - तटकरेंना काढण्याचे अधिकार पवारसाहेबांना नाहीत ? त्यासाठी बोलवावे लागेल राष्ट्रीय अधिवेशन -

दरम्यान प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची कार्याध्यक्षपदी झालेली नियुक्ती राष्ट्रीय अधिवेशनात ठरावाव्दारे झाली आहे.त्यामुळे त्यांना पदच्युत करण्याचा अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी शरद पवारांना नाही, असे बंडखोरातील एका ज्येष्ठ नेत्याने नमूद केले. त्यांना काढायचे असेल तर पक्षाला पुन्हा एकदा राष्ट्रीय अधिवेशन बोलवावे लागेल, असेही या नेत्याचे म्हणणे आहे.

शरद पवारांचे ट्वीट त्यामुळे कायद्यात बसत नाही, असेही सांगण्यात आले. बंडखोर गटाचे प्रवक्ते तटकरे यांनी कार्याध्यक्ष या नात्याने प्रफुल्ल पटेल यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून जयंत पाटील यांना पदावरून हटवण्याचा अधिकार आहे असे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT