D. K. Shivkumar News : कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसमधील सर्वात श्रीमंत नेते म्हणून ओळखले जातात. काँग्रेस पक्षाला ज्यावेळेस निधीची गरज भासते, त्यावेळेस शिवकुमार हे पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्याशिवाय ज्यावेळेस काँग्रेसचे आमदार, खासदार फुटीचे संकट येते. त्यावेळी ते पक्षाच्या मदतीला धावून आल्याने त्यामुळे संकटमोचक ठरले आहेत.
आता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या पाचही राज्यांचा निकाल येत्या रविवारी जाहीर होणार आहेत, पण त्याआधी 'एक्झिट पोल' समोर आले आहेत. यामध्ये काँग्रेसने मुसंडी मारली. काही राज्यांत सत्तास्थापनेसाठी काँग्रेसला प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे ऐनवेळी घोडेबाजार झाल्यास काँग्रेससाठी पुन्हा संकटमोचक म्हणून मदत करण्याची तयारी डी. के. शिवकुमार यांनी दर्शविली आहे.
कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला. त्यानंतरच्या त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची 'सेमी फायनल' म्हणून पाहिले जात असलेल्या पाच राज्यांतील राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम निवडणुकीची तयारी सुरू केली होती. त्याची जबाबदारी काँग्रेसने कर्नाटकातील विजयाचे शिल्पकार ठरलेल्या उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. k. Shivkumar) यांच्यावर सोपवली होती. त्यांनी ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत, या पाच राज्यांत काँग्रेसला निर्विवाद यश मिळवून देण्यासाठी रणनीती आखली.
कौशल्याचे, राजकीय व्यवस्थापन तसेच संकटमोचक म्हणून असलेली प्रतिमा कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून डी. के. शिवकुमार यांनी सिद्ध केली आहे. काँग्रेस पक्षावर जेव्हा संकट येते तेव्हा धावत जात शिवकुमार यांनी आलेल्या संकटाचा सामना केला आहे. त्यामुळे येत्या काळात पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर जर खऱ्या अर्थाने काँग्रेसला अडचणी आल्या, तर त्यांनी स्वतः पक्षाच्या मदतीला धावून येण्याची जबाबदारी घेतल्याने काँग्रेसने पण आता सर्वच दृष्टीने सक्षम असल्याचा इशाराच या माध्यमातून दिला असल्याची चर्चा रंगली आहे.
कोण आहेत डी. के. शिवकुमार
शिवकुमार यांचा जन्म १५ मे १९६२ रोजी म्हैसूर म्हणजे सध्याचे कर्नाटक राज्यातील कनकापुरामध्ये झाला. एचडी देवेगौडा यांच्यानंतर वोक्कालिग या प्रभावशाली समाजाचे नेते म्हणून शिवकुमार यांच्याकडे पाहिले जाते. शिवकुमार यांनी १९८९ मध्ये सथानूरमधून एचडी देवेगौडा यांना पराभूत करत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सात वेळा आमदार राहिलेले डी.के. शिवकुमार यांनी कर्नाटकात मंत्रिपद भूषवलेले.
डी. के. शिवकुमार यांना कर्नाटकच्या राजकारणातला चाणक्य मानले जाते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ते पारंपरिक मतदारसंघ असलेल्या कनकपुरातून रिंगणात होते. त्यांनी सलग आठव्यांदा विजय मिळवला. त्यांनी भाजप सरकारमधील महसूलमंत्री आर. अशोक यांचा पराभव केला होता.
सध्या ते कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या जवळच्या नेत्यांपैकी ते एक आहेत. याशिवाय देशातील सर्वात श्रीमंत राजकारणांपैकी एक असून, त्यांनी १,४१३.७८ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख २००२ मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावेळी देशमुखांनी डी. के. शिवकुमार यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा डी. के. शिवकुमार यांनी मतदानाच्या तारखेपर्यंत एक आठवडा महाराष्ट्रातील आमदारांना बंगळुरू बाहेरील भागात असलेल्या त्यांच्या रिसॉर्टमध्ये ठेवले होते. त्यामुळे त्यावेळी भाजप- शिवसेना युतीच्या नेत्यांना काहीच हालचाल करता आली नाही. या रिसॉर्टवर त्यांनी कडक पहारा ठेवला होता. त्यामुळे त्याकाळी विलासराव देशमुख यांचे सरकार वाचले होते. त्यावेळी त्यांची मोठी मदत झाली होती.
डी. के. शिवकुमार यांनी 2017 मध्ये राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एकदा मदत केली होती. त्यावेळी गुजरातमधील 42 काँग्रेस आमदारांना बंगळुरूमधील त्यांच्या रिसॉर्टमध्ये हलवण्यास मदत केली. त्यावेळी भाजपकडून घोडेबाजार होऊ नये, यासाठी काळजी घेतली होती. त्यामुळे अहमद पटेल यांना निवडणूक जिंकण्यास मदत झाली होती.
(Edited by Sachin Waghmare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.