Emergency : महाराष्ट्रात 1978 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष ठरला तो जनता पक्ष. त्यांचे 105 आमदार होते. अर्थात जनता पक्षाचे चिन्ह नांगरधारी शेतकरी हे समान असले, तरी पक्षामध्ये तीन विचारधारा होत्या. एक विचारधारा लोकशाही समाजवाद ही विचारसरणी मानणाऱ्या समाजवाद्यांची. दुसरी विचारधारा होती माजी जनसंघाची म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या कार्यकर्त्यांची. तिसरी धारा होती काँग्रेसमधून जनता पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांची.
जनता पक्षाला एकूण मतदान वाढले होते. सारेच आणीबाणीत जेलमध्ये गेलेले. त्यामुळे सहानुभूतीची लाट त्यांच्या पाठीशी होती. परंतु संघाचे लोक पूर्वी कधीच निवडून यायचे नाहीत. ते आता जनता पक्षाच्या बुरख्याखाली निवडून येऊ लागले. त्यांची विचारसरणी जनतेने पूर्वी नाकारलेली होती. त्यामुळे नव्या कालखंडात ते जनताभिमुख बनतील. मुस्लिमांचा आणि दलितांचा द्वेष सोडून देतील, अशी अपेक्षा होती. दुर्दैवाने तसे घडले नाही.
नगर जिल्ह्यात लोकसभा ते विधानसभा या मधल्या कालखंडात मी नगर जिल्ह्यात खूप फिरलो होतो. स्वाभाविकपणे मी जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून निवडून आलो. कोणतीही विचारसरणी तेव्हाच प्रवाही राहते की जेव्हा जनता ती स्वीकारू लागते. पूर्वी नाकारलेले लोक जनता पक्षाच्या नावावर निवडून आले. त्यांच्यात आत्मपरिक्षणाचा अभाव असल्याने आता आपल्याला जनता का पाठिंबा देत आहे? पूर्वी हीच जनता आपल्याला पाठिंबा का देत नव्हती? आपल्यात काय सुधारणा केली पाहिजे? असा विचार तिन्ही विचारधारांच्या लोकांनी केला नाही. त्यामुळे दोन वर्षांत त्यांचा पक्ष फुटला.
हुकूमशाहीला विरोध करणारे म्हणून सामान्य जनतेने जनता पक्षाला उचलून धरले. त्यामुळे एकाच व्यासपीठावरून समाजवादी, माजी काँग्रेसवाले व जनसंघीय यांची भाषणे होत. तेव्हा परस्परभिन्न अशी मते जनतेला ऐकवली जात. एका सभेत मी सांगितले, की ‘महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषा वेगळी असली तरी त्यांची आधुनिक भारताची दृष्टी एकच होती. म्हणून दलितांच्या मुक्तीला जनता पक्षाचा पाठिंबा आहे. म्हणून सर्व दलित समूहात काम करणाऱ्या सर्व गटातटांनी व कार्यकर्त्यांनी जनता पक्षात सामील व्हावे.’ श्रोत्यांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला.
माझ्या भाषणामुळे व्यासपीठावर बसलले जुन्या जनसंघाचे एकांडे शिलेदार ॲड. राजाभाऊ झरकर अस्वस्थ झाले. माझ्या भाषणानंतर त्यांचे भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात दलितांच्या पक्षप्रवेशावर आक्षेपार्ह युक्तिवाद केला. त्यांच्या या वाक्यांवर जिल्ह्यात वादळ उठले. प्रभाकर रूपवते नामक जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा जनता पक्षाच्या कचेरीवर आला. ‘जनता पक्षात लपलेल्या मनुवाद्यांनो बाहेर या. आम्ही तुमच्या तोंडाला काळे फासणार आहोत,’ असे आव्हान त्यांनी दिले. राजाभाऊ झरकर त्यादिवशी शहरातून गायब झाले होते. मी रस्त्यावर त्या मोर्चाला सामोरे गेलो. पुरीच्या शंकराचार्याबरोबर झालेला वाद सर्व दलितांच्या लक्षात होता. मोर्चेवाले म्हणाले, ‘तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण तुम्ही तुमच्या मागे लपलेल्या मनुवाद्यांची ढाल का बनता?’
हा केवळ किस्सा नाही. देशभर सर्वत्र जनता पक्षाच्या अंतर्गत तीन भिन्न विचारसरणींमध्ये स्पर्धा चालू होती. भूतकाळाचे ओझे एवढे होते की पक्ष कार्यकर्ते जनता पक्षाचा गणवेश घालायला तयार नव्हते. बिहारमध्ये कर्पुरी ठाकूर हे लोकप्रिय नेते जनता पक्षाचे मुख्यमंत्री होते. ते पूर्वीपासून पिछड्या समाजाच्या प्रश्नांवर मोर्चे काढायचे, चळवळी करायचे. जयप्रकाशजींच्या आंदोलनाच्या काळात ते समाजवादी पक्षातर्फे बिहारचे मुख्यमंत्री झाले. जनता पक्षाच्या पोटातील माजी जनसंघीय गटाला कर्पुरी ठाकूरांना मुख्यमंत्री पदावरून हटवायचे होते. दुर्गा पूजेच्या काळात दुर्गा मातेच्या मिरवणुका मुस्लिम वस्तीतून नेण्याचा त्यांनी आग्रह धरला. कर्पुरी ठाकूरांनी मुस्लिम वस्तीत या मिरवणुका नेण्यास परवानगी दिली नाही. त्यावेळी जनता पक्षाच्याच आमदाराने बिहारच्या विधानसभेत ‘नथुराम जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. कालांतराने कर्पुरी ठाकुरांना राजीनामा द्यावा लागला.
जुन्या काँग्रेसवाल्याच्या गटांचे नेते होते पंतप्रधान मोरारजी देसाई. त्यांच्यात आणि जनसंघीय गटात गुप्त करार झाला होता. कोणत्याही परिस्थितीत समाजवादी विचाराच्या नेत्यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचे नाही. माजी काँग्रेस व माजी जनसंघीय यांनी विविध राज्यांची मुख्यमंत्रिपदे आपसांत वाटून घेतली. त्याचबरोबर सर्व ठिकाणी मोरारजी भाईंवर व्यक्तिगत निष्ठा असलेले राज्यपाल नेमण्यात आले. सामान्य जनतेला संविधान, लोकशाही समाजवाद, धर्मनिरपेक्षता यांची गोडी लागत होती.
पुढील वाटचालीसाठी हा मोठा धोका आहे, असे रा. स्व. संघाच्या लॉबीला वाटले. मग त्यांनी धर्माचा आधार घेऊन लोकांची वरील मूल्यांना असलेली मान्यता कमी करण्याचा निर्णय घेतला. हिंदू हा एकसंध समाज नसल्याने त्यांनी जातीयवादालाही खतपाणी घातले. एका बाजूला धर्मद्वेष वाढवायचा आणि दुसऱ्या बाजूला इतर पक्षांना पाठिंबा देणाऱ्या जातीसमूहांचा द्वेष इतर जातींमध्ये वाढवायचा. महाराष्ट्रामध्ये मराठा जाती समूहात जनसंघ किंवा भाजप यांना कधी पाठिंबा देत नाही. म्हणून मराठा जातीचा द्वेष करण्याची त्यांनी मोहीम काढली. त्याचे नेतृत्व माळी, धनगर, वंजारी या तीन जातींच्या समूहाकडे दिले. त्यासाठी त्यांनी अन्य जातींच्या अस्मिता तीव्र केल्या. त्याची फळे आज आपण भोगत आहोत.
इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली नसती, तर भिन्न विचारधारांचे लोक एकत्र तुरूंगात राहिले नसते. १९ महिने तुरुंगात एकत्र राहिलेल्या लोकांचा जनता पक्ष लोकांना प्रिय झाला. लोकशाही पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी त्याची ऐतिहासिक गरजही होती. आणीबाणीची घटना घडली नसती तर इतिहासाच्या प्रवाहात जनता पक्ष निर्माण झाला नसता. त्याचबरोबर जनता पक्ष नसता, तर संघीय विचारसरणीच्या लोकांना जनतेने कधीच स्पर्श केला नसता. लोकांना धर्माची नशा देण्यात भाजप यशस्वी झाला. म्हणून तो आज सत्तेवर आहे. या गुंगीतून जेव्हा समाज बाहेर येईल तेव्हा भाजप सत्ता गमावेल. भारतीय लोकांची एकत्र राहण्याची इच्छा फार चिवट व प्राचीन आहे. धर्मद्वेषाची त्यांची परंपरा अवघ्या १०-२० वर्षांची आहे. हे तत्कालिक आहे. ते अविनाशी गोष्टींच्या पुढे पराभूत होतेय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.