
पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी प्रथमच नागपूरला येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयास भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी दीक्षाभूमीला दुसऱ्यांदा भेट दिली. दीक्षाभूमी, संघभूमी या दोन्ही स्थळांना भेट देत मोदींनी वैचारिकतेचे सम्यक संतुलन साधण्याचे काम नेमकेपणाने केले. या दोन्ही विचारांना सोबत घेत पुढे गेले पाहिजे, असा संदेशच जणू आपल्या या भेटीतून दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढी पाडव्याला नागपुरात आले. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयास दिलेली ही पहिलीच भेट असली तरी दीक्षाभूमीला त्यांनी दिलेली ही दुसरी भेट आहे. २०४७ मध्ये विकसित भारताचे स्वप्न पाहात असताना दोन्ही विचारांना सोबत घेत पुढे गेले पाहिजे, हाच संदेश त्यांनी जणू आपल्या या भेटीतून दिला.
पंतप्रधान असताना संघ मुख्यालयास भेट देणारे ते वाजपेयी यांच्यानंतर दुसरे पंतप्रधान ठरले. आपल्यातील एक स्वयंसेवक पंतप्रधानपदी विराजित झाला, ही भावना स्वयंसेवकांत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचे हे शताब्दी वर्ष आहे. त्यामुळेही पंतप्रधानांच्या या भेटीला विशेष महत्त्व आहे.
माधव नेत्रालयाचा ५१२ कोटींच्या विस्तारित प्रकल्पातून नेत्रोपचाराची मोठी सोय नागपुरात होणार आहे. मध्य भारतातील ‘मेडिकल हब’ या नागपूरच्या ओळखीत माधव नेत्रालयामुळे आणखी भर पडणार आहे. २०२८ च्या गुढी पाडव्याला हा प्रकल्प सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले.
‘बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती सोपवा,’ अशी गळ दीक्षाभूमी स्मारक समितीकडून घालण्यात आली. मोदींना ते करता आले तर दीक्षाभूमीची त्यांची ही दुसरी भेट आंबेडकरी अनुयायांसाठी महत्त्वाची अन् फलदायी ठरू शकते. शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणारा कोरटकर, नागपुरातील दोन धार्मिक समुदायांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर विदर्भात येऊन दीक्षाभूमी, संघभूमी या दोन्ही स्थळांना भेट देत मोदींनी वैचारिकतेचे सम्यक संतुलन साधण्याचे काम नेमकेपणाने केले. त्यांची ही भेट राजकीय नसल्याने त्यांच्या भाषणात कोणतेही राजकीय मुद्दे नव्हते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या फरार प्रशांत कोरटकरला महिनाभरानंतर कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून अटक केली. परंतु कोरटकर नागपूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कसा फरार झाला? तो नागपूरपासून अवघ्या १५० किलोमीटरवर असलेल्या चंद्रपूर शहरात दलालाच्या आश्रयाने कसा राहिला? त्याला तेलंगणापर्यंत सोडण्यासाठी कुणी कुणी मदत केली? यावरून राजकारण चांगलेच तापले आहे.
कोरटकर स्वतःला पत्रकार म्हणवून घेत असे. बड्या पोलिस अधिकाऱ्यांसोबत मैत्रीचा दावा करून समाजमाध्यमांवर पोस्ट टाकायचा. त्याच्या घराला पोलिसांनी वेढा दिला असताना तो फरार झाला. यावरून नागपूर पोलिसांवर संशय निर्माण झाला आहे. नागपूरला दोन समुदायांत तणाव निर्माण होताच एकेका आरोपीला तातडीने शोधणारे पोलिस एकट्या प्रशांत कोरटकरला का पकडू शकत नाही, या अनुत्तरित प्रश्नामुळे नागपूर पोलिसांची प्रतिमा चांगली डागाळली. कोल्हापूर पोलिसांनी मात्र या प्रकरणी बाजी मारली. बरोबर सुगावा घेत त्यांनी कोरटकरचा छडा लावला. त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या घरावर बुलडोझर चालणार का, हा खरा प्रश्न आहे.
कायम यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील दाभडी येथे पंतप्रधान मोदींची २० मार्च २०१४ रोजी देशातील पहिली ‘चाय पे चर्चा’ झाली होती. या घटनेला ११ वर्षे पूर्ण झाली. पंतप्रधानांनी भेट दिल्यावर आणि विविध आश्वासाने दिल्यावर दाभडी गावाचा मोठा कायापालट होणे अपेक्षित होते. परंतु स्थानिक जिल्हा प्रशासनाने थातूरमातूर योजनांची अंमलबजावणीचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतु, या गावाचा समग्र आणि शाश्वत विकास प्रशासनाला करता आला नाही. ज्या गावात दस्तुरखुद्द पंतप्रधान येतात, त्या एका गावालाही आदर्श गाव म्हणून निर्माण करणे प्रशासनाला जमत नसेल, तर विविध विभागांचे शेकडो अधिकारी-कर्मचारी करतात तरी काय? असा प्रश्न निर्माण होतो.
दाभडी गाव शेतकरी आत्महत्येने पिळवटून निघाले. येथील नदी अरूंद होती. पावसाळ्यात पाणी थेट दोन्ही किनाऱ्यावरील शेतात शिरायचे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान व्हायचे. ‘सकाळ’ने लोकसहभागातून नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण करून दिले. त्यामुळे ही समस्या दूर करता आली. ‘सकाळ’ने ‘स्वयंसिद्धा’ अभियानातून येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना शिवणयंत्र आणि सौर कुंपणाचे वाटप केले. परंतु हे काम प्रतिकात्मक होते.
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने त्यातून बोध घेणे अपेक्षित होते. दाभडी गाव शेतकरी आत्महत्यांनी पिळवटून निघालेल्या विदर्भातील एक प्रातिनिधिक गाव आहे. अशी असंख्य गावे विदर्भात आहेत. विशेषतः अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा हे सर्वाधिक आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत. किमान दाभडी या गावाच्या वेदना समजून घेतल्या तरी त्यातून योग्य तोडगा निघू शकतो.
मोदी नागपुरात आले असताना विदर्भवादी नेते काळे झेंडे दाखविण्यासाठी सज्ज झाले होते. त्यामुळे सकाळीच काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. स्वतंत्र विदर्भ राज्याची चळवळ थंडावली आहे, असे वाटत असतानाच पुन्हा नव्याने या चळवळीची धग जाणवत आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी नुकतेच अधिवेशन घेऊन पुन्हा राज्य निर्मितीसाठी एल्गार पुकारला. स्वतंत्र विदर्भाला आता केंद्र-राज्य सरकारही प्राधान्य देत नसताना स्वतंत्र विदर्भाच्या मागणीची चळवळ १२० वर्षांपासून सुरू आहे, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही.
ऐन पीक भरात आले. उत्पादन चांगले येण्यासाठी ओलिताची गरज असताना साहेबराव करपे यांच्या शेतातील विहिरीवरील वीज तोडली. अथक कष्ट आणि श्रमातून फुलविलेले पीक आता नष्ट होणार. घेतलेले कर्ज फेडता नाही येणार. चक्रवाढव्याजाने पुरते कंबरडे मोडणार. दारातील वसुलीचा व्यवहार बेइज्जत करून जाणार, या भीतीने यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी पत्नी आणि चार अपत्यांसह १९ मार्च १९८६ रोजी वर्धा जिल्ह्यातील पवनार-दत्तपूर येथे आत्महत्या केली. विदर्भातील ही पहिलीच सामूहिक शेतकरी आत्महत्या समजण्यात येते. सरकारच्या नावाने पत्र लिहित साहेबराव करपे यांनी संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली.
या घटनेची आठवण म्हणून दरवर्षी सहवेदना दिन पाळण्यात येतो. ३९ वर्षांनंतरही शेतीची उपेक्षा थांबली नाही. पुन्हा एका शेतकऱ्याने सरकारला उद्देशून पत्र लिहून आत्महत्या केली. त्या शेतकऱ्याचे नाव कैलास नागरे. बुलडाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी अरमाळ येथील तो रहिवासी. पंचक्रोशीतील १४ गावांना खडकपूर्णा प्रकल्पातील पाणी नवीन हंगाम येण्यापूर्वी मिळावे, यासाठी त्यांनी नाना प्रयत्न करून पाहिले.
कार्यालयाचे उंबरठे झिजवले. निवेदनांतून आर्जव केले. उपोषणही केले; परंतु प्रशासनाला पाझर फुटला नाही. अखेर हताश होत सरकारच्या नावाने पत्र लिहून कैलास नागरे याने आपली इहलोकीची यात्रा संपविली. करपे आणि नागरे या दोघांनीही लिहिलेली पत्रे सरकारचे बेमुर्वत धोरण आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणाची लक्तरे वेशीवर टांगणारी आहेत. आता राज्याच्या अर्थमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफी शक्यच नाही म्हणत आधी तुमच्याकडील कर्जफेड करा, असाही दम दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे.
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रात उफाळलेला नागपूरला हिरवी चादर जाळल्याचे तत्कालिक निमित्त झाले. पोलिस प्रशासन बेफिकीर राहिले. कडेकोट बंदोबस्त लावला नाही. त्यामुळे व्हायचे नको, तेच झाले. दगडफेक-वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ झाली. नागपूरच्या महाल परिसरात दोन समुदायांत प्रचंड तणाव निर्माण झाला. तक्रारीची दखल न घेणाऱ्या पोलिसांवर आधीच रोष होता. सुमारे ५० पोलिस जखमी झाले. यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता.
३५ लाख लोकसंख्येच्या नागपूर शहरातील केवळ महाल भागात तणाव निर्माण झाला. परंतु, ‘नागपूर पेटले’ अशा बेजबाबदार बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या. नागपूरमध्ये बहुतेक झोपडपट्ट्या, वस्त्या, नगर आणि उपनगरात मिश्र जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. ही घटना या नात्याला धक्का पोहोचविणार की काय, अशी भीती निर्माण झाली. राजकीय पातळीवरही एक पक्ष एका समुदायाला दोषी ठरवणारा, तर दुसरा पक्ष दुसऱ्या समुदायाला दोषी ठरवणारा. विधिमंडळातही नागपूरची आग भडकली. परंतु, संवेदनशील नागपूरकरांनी हा वणवा ‘महाल’च्या पलीकडे भडकू दिला नाही.
नागरिकांनीच समन्यायी भूमिका स्वीकारली. दोन्ही गटांना संबंधित धर्मातील नागरिकांनी मुळीच पाठिंबा न देता धार्मिक सहिष्णुता दाखवली. हा तणाव राजकीय हेतूने प्रेरित होता, नियोजबद्ध होता असे आरोप झाले. परंतु सामान्य माणूस न अडकल्याने तणाव मिटला. यातील एका संशयित आरोपीच्या घरावर ‘बुलडोझर’ चालविण्याचा आततायीपणा स्थानिक प्रशासनाने केला. परंतु न्यायालयाने प्रशासनाला चांगलेच फटकारले. आता शहर शांत असले तरी ‘बुलडोझर’वरून पडलेली ठिणगी राजकीय हेतूने प्रेरित असल्याची चर्चा अशांततेचे कारण ठरेल का, ही भीती आहेच.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.