Vidhan Parishad Election Result : सुमारे अडीच वर्षांपूर्वी टाकलेला डाव यशस्वी झाला आणि विधान परिषद, राज्यसभा निवडणुकीत तर लॉटरी लागलीच. पण, महाराष्ट्रासारख्या आर्थिकदृष्ट्या मोठ्या राज्याची सत्ता हाती आली. त्या वेळी विरोधात असूनही देवेंद्र फडणवीस यांनी बाजी पलटवली होती. आता तर राज्याची सत्ता हाती होती, त्यामुळे चार मते कमी असूनही त्यांनी ‘शेतकऱ्यांचा बुलंद आवाज’ सदाभाऊ खोत यांना तब्बल २६ मते मिळवून विधान परिषदेचे दरवाजे पुन्हा एकदा उघडे करून दिले. फडणवीसांनी टाकलेले डाव यशस्वी होत गेले आणि खोतांचा विजय सुकर होत गेला.
विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात उतरल्याने आज (ता. 12 जुलै) विधान परिषदेसाठी मतदान झाले. सत्ताधारी आणि विरोधी बाजूकडून विजयाचा दावा करण्यात येत होता. मात्र, काँग्रेसच्या बैठकीला चार आमदारांनी दांंडी मारल्याने महाविकास आघाडीत धाकधूक वाढली होती. इकडे महायुतीच्या गोटात निश्चिंतपणा दिसून आला. कारण, भाजपबरोबरच दोन्ही मित्रपक्षांनी विजयासाठी बेगमी केली हेाती.
भाजपकडून पंंकजा मुंडे, अमित गोरखे, योगेश टिळेकर, परिणय फुके आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. भाजपचे विधानसभेत 103 आमदार आहेत, तसेच आठ अपक्ष आमदारांचा त्यांना पाठिंबा होता. भाजपकडे एकूण 111 आमदारांचे पाठबळ होते. मात्र, पाच उमेदवार निवडून येण्यासाठी 115 आमदारांची गरज होती, त्यामुळे भाजपला आणखी 4 मतांची बेगमी करणे आवश्यक होते.
भाजपचे स्वतःचे चार उमेदवार सहज निवडून येत होते. मात्र, मित्रपक्ष असलेल्या शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. कारण, आपले स्वतःचे चार आमदार निवडून आणले. मात्र, मित्रपक्षाचा उमेदवाराला निवडून आणण्यासाठी भाजपकडून ठोस प्रयत्न झाले नाहीत, असा ठपका विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपवर बसला असता. त्यामुळे खोत यांना निवडून आणण्यासाठी भाजपने विशेषतः फडणवीस यांनी रणनीती आखली होती, ती यशस्वी झाली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेच्या जोरावर ती मते आपसूक मिळविली. त्यांनी पद्धतशीरपणे काँग्रेसच्या मताला सुरुंग लावला. तो कधी लावला, हे काँग्रेस पक्षालासुद्धा कळले नाही. त्यामुळे पाचवे सदाभाऊ खोत यांना निवडून आणणे भाजपला सोपे गेले. भाजपचे पाच आणि महायुतीचे नऊ उमेदवार निवडून आल्याने देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या नेत्यांची निवडणूक स्ट्रॅटेजी पुन्हा एकदा यशस्वी ठरली.
सदाभाऊ खोतांचा विजय का आवश्यक होता?
लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मोठा फटका भाजपला बसला आहे. विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीत तातडीने मराठा समाजातून येणारे सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेची उमेदवारी बहाल केली आहे. शिवाय, शेतकऱ्यांच्या नाराजीचाही फटका भाजपला लोकसभेत बसला होता. ती नाराजी खोत यांना उमेदवारी देऊन दूर करण्याचा प्रयत्न भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झाल्याचे दिसून येते. त्यामुळे मराठा आणि शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते.
पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, माढा, सांगली, कोल्हापूर या मतदारसंघात महायुतीला फटका बसला आहे. गेल्या वेळी यातील तीन जागा सोलापूर, माढा आणि सांगली ह्या भाजपकडे होत्या, तर कोल्हापूर ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे हेाती. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या जागा गमावाव्या लागल्या. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मुलुख मैदानी तोफ समजले जाणारे सदाभाऊ खोत यांना ताकद देण्याचा प्रयत्न फडणवीस यांच्याकडून झाल्याचे दिसून येते.
पवारांना शह देण्याचा प्रयत्न
पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा बस्तान बसविले आहे. लोकसभा निवडणुकीत त्याचा फटका थेट भाजपला बसला आहे. पाच जिल्ह्यांत महायुतीला दुय्यम भूमिकेत जावे लागले आहे. भाजपला तीन जागा गमावाव्या लागल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विरोधात बोलण्यासाठी आता गोपीचंद पडळकर यांच्या जोडीला पुन्हा सदाभाऊ खोत यांना भाजपकडून रिंगणात उतरविण्याचा प्रयत्न विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून झाल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.