पाटणा : कोरोना (Corona) चाचण्या अन् लसीकरणामध्ये (Vaccination) देशात अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. बोगस लसीकरणासह बोगस चाचण्याही करण्यात आल्या आहेत. असाच प्रकार बिहारमधील अरवल या जिल्ह्यात घडला आहे. पण याठिकाणी लसीकरण व कोरोना चाचण्यांमध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आदींची नावे घुसवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
आरोग्य विभागाकडील यादीमध्ये या सर्वांची नावे असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या यादी आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अरवल जिल्ह्यातील करपी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या नावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या नावांसमोर मोबाईल क्रमांकही देण्यात आले आहे. या याद्यांमध्ये या केंद्रावर कोरोना चाचणीसाठी ज्यांचे नमुने घेण्यात आले आहेत त्यांची नावे तसेच लस घेतलेल्यांची नावे आहेत. या सरकारी यादीत बोगस नावे असल्याचे उघड झाले आहे.
दोन्ही यांद्यांमध्ये पंतप्रधान मोदी, शहा, सोनिया गांधी, प्रियांका चोप्रा आदींची नावे आहेत. या यादी पाहिल्यानंतर आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना धक्का बसला. बिहारमधील आरोग्य विभागाची पोलखोल करण्यासाठी ही यादी पुरेशी असल्याची टीका आता होऊ लागली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर आता यादीतील किती नावे खरी आहेत, किती जणांचे खरेच नमुने घेतले, किती जणांना लस दिली याबाबत साशंकता उपस्थित केली जाऊ लागली आहे.
यादी समोर आल्यानंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. राज्य आरोग्य समितीने आरोग्य विभागाला फटकारले आहे. आरोग्य विभागाने तातडीनो दोन डाटा ऑपरेटर्संना कामावरून निलंबित केले आहे. पण या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी वरिष्ठांच्या सांगण्यावरून या नावांचा समावेश केला आहे. आपल्याला नावेही दिली जात नव्हती. तशीच नावे टाकण्याची जबरदस्ती केली जात होती, असा दावा त्यांनी केला आहे.
आरोग्य विभागाकडून या प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पण विभागाचे अधिकारी यावर उघडपणे बोलण्यास तयार नाहीत. बिहारमध्ये यापूर्वीही कोरोना लसीकरण अभियानात झालेले गैरप्रकार समोर आले आहेत. जून महिन्यात छपरा येथे एका युवकाला परिचारिकेने केवळ लस दिल्याचे भासवले होते. पण इंजेक्शनमध्ये लसच भरली नव्हती. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.