Jharkhand Politics : सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने झारखंडमध्ये पूर्ण ताकद पणाला लावली. झारखंड मुक्ती मोर्चा या सत्ताधारी पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते व माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांना फोडले. इतर नेतेही गळाले लावले. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली. चंपई सोरेन यांच्या ताकदीवर हेमंत सोरेन यांच्या पराभवाची स्वप्न पाहणाऱ्या भाजपचा पराभव झाला. पण आता सत्ता सोडून भाजपमध्ये गेलेले चंपई सोरेन अडगळीत गेले आहेत.
झारखंड भाजपचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांची गुरूवारी विधिमंडळाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. आमदार चंपई सोरेनही यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या. आज आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्या. मरांडी हे झारखंडच्या राजकारणातील मोठे नेते आहेत. चारेळा खासदार, तीन वर्षे मुख्यमंत्री, केंद्रात मंत्री अशी त्यांची राजकीय वाटचाल राहिली आहे.
मरांडी यांच्यासमोर चंपई यांची जादू फिकी पडली आहे. मुख्यमंत्री पदावरून हटवल्याने नाराज झालेल्या चंपई सोरेन यांनी विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आदिवासी भागात त्यांची चांगली पकड आहे. त्यामुळे त्यांना कोल्हान टायगर म्हणूनही ओळखले जाते. या भागात अधिकाधिक जागा मिळवत सत्ता काबीज करण्याचा भाजपचा प्लॅन होता. पण त्याला अपय़श आले.
भाजपच्या पराभवापासूनच चंपई सोरेन यांचे पक्षातील राजकीय महत्वही कमी झाल्याचे मानले जाते. केवळ सत्ता मिळवण्यासाठीच चंपई सोरेन यांना भाजपने पक्षात आणले होते, हे उघड सत्य आहे. त्यासाठी त्यांना कोणते आश्वासन देण्यात आले होते, हे समोर आलेले नाही. पण सत्ता आल्यास सरकारमध्ये त्यांना मोठा सन्मान मिळाला असता, हे निश्चित.
सत्ता सोडून भाजपमध्ये आलेले चंपई सोरेन यांची अवस्था आता तेल गेले, तूप गेले, हाती आले धुपाटणे अशी झाली आहे. हेमंत सोरेन यांनी चमत्कार दाखवत राज्यात पुन्हा सत्ता काबीज केली आहे. चंपई सोरेन याच पक्षात राहिले असते तर पुन्हा मंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले असते. पण मुख्यमंत्रिपदावरून हटवल्याने त्यांचा स्वाभिमान दुखावला आणि ते भाजपमध्ये गेले.
राजकारणात अनेक नेत्यांवर अशी वेळ आली आहे, पुढेही येत राहील. पण राजकीय हवा कोणत्या दिशेला वाहत आहे, याचा अचूक अंदाज मोजक्याच नेत्यांना येतो. राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही, असे म्हणत अनेक नेते चुका पोटात घेऊन पुढे जातात. चंपई सोरेन यांनाही कदाचित सत्तेची फळे चाखता आली असती. पण आता ती वेळ निघून गेली आहे. तसे असेल तरी भविष्यात त्यांची घरवापसी झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.