Sangli News : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर लोकसभा असो किंवा विधानसभा उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सांगलीत घुसता आले नाही. विधानसभेच्या तोंडावर त्यांना माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या रूपाने चेहरा मिळाला होता. पण शरद पवार यांच्या नवख्या रोहित पाटील यांनी त्यांना राजकारणाच्या आखाड्यात चितपट केलं होतं. यामुळे सांगलीच्या राजकाणात अजित पवर गटाचा प्रवेश म्हणावा तसा दणक्यात झाला नाही. पण मंगळवारी राष्ट्रवादीला सांगलीत एंन्ट्री देण्यासह भाजप, शिवसेना आणि महाविकास आघाडीला चिंतेत टाकणारी मोठी घटना मुंबईत घडली. येथे सांगलीतील चार माजी आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी अजितदादांनी त्यांना दिलेल्या कानमंत्रची आता चर्चा सुरू झाली आहे.
मंगळवारी (ता.22) मुंबईतील नरिमन पॉईंट येथील क्रिकेट क्लबमध्ये राष्ट्रवादीच्या मजबुतीला कारणीभूत ठरणारी घटना घडली. येथे सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार राजेंद्र देशमुख, मुन्ना कुरणे, जतचे युवा नेते तम्मनगौडा रविपाटील, नीलेश येसुगडे यांच्यासह त्यांच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच संग्राम जगताप, रणधीर नाईक, अभिजित नाईक, अनिल पाटील, निवृत्ती शिंदे, भाऊसाहेब गायकवाड, श्रीरंग कदम, संभाजी यमगर, नरेंद्र दीक्षित, बापूराव पाटील, उदय लाड यांच्यासह खानापूर, आटपाडी, पलूस, जत, शिराळा तालुक्यांतील कार्यकर्त्यांचे प्रवेश झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, नेते प्रफुल्ल पटेल, आमदार इंद्रीस नायकवडी, प्रदेश उपाध्यक्ष दिग्वीजय सूर्यवंशी, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, जिल्हाध्यक्ष प्रतापशेठ पाटील उपस्थित होते.
याचकार्यक्रमात अजितदादांनी केलेल्या वक्तव्याची आता चर्चा सुरू झाली असून दादांनी या चार आमदारांना असा काय कानमंत्र दिला की येथे राष्ट्रवादी पक्ष वाढणार आहे? याची उत्सुकता आता जिल्ह्यात लागली आहे. सांगलीतील विविध प्रश्नांची सोडवणूक व विकासासाठी नव्या, जुन्यांची मोट बांधून बांधली जाईल. नवा, जुना असा भेदभाव होणार नाही. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. पक्षाच्या वाढीसाठी ताकद देऊ, असे आश्वासन दिले आहे. पण यावेळी त्यांनी फक्त पक्षात प्रवेश केलेल्या लोकांनी पक्ष वाढवावा असे आवाहन केले आहे. मात्र आता त्यांच्या आवाहनाकडे चार माजी आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते कसे बघतात हे पाहावं लागणार आहे.
तसेच अजित पवार यांनी, ‘यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील या दिग्गजांनी सांगलीचा विकास केला. सध्या सांगलीचे वातावरण तसे राहिले नाही. विकासाचे वातावरण पूर्वपदावर आणण्यासाठी नव्या लोकांनी संधी द्यावयाची आहे. त्यासाठी जुन्यांनी आशिर्वाद द्यावेत असे म्हटलं आहे. यामुळे नव्याने राष्ट्रवादीत सहभागी झालेल्या चार आमदारांना फक्त आशिर्वाद देण्याचीच भूमिका पार पाडावी लागणार आहे.
याआधी देखील अजित पवार यांनी जेष्ठ नेत्यांच्या आशिर्वादाचा मुद्द्या उपस्थित करताना आता जेष्ठांनी आशिर्वाद द्यावेत, असे म्हणत जेष्ठांना आता पद मिळणार नाही असे संकेत दिले होते. पण सांगलीत प्रवेश केलेल्या चार माजी आमदारांच्या अनुभवांचा पक्ष वाढीसाठी तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी मदत मिळणार आहे.
यावेळी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी देखील पक्षात आलेल्या सर्वांचे स्वागत करताना, संवेदनशील आणि जागृत जिल्ह्यातील नेते आणि सर्व कार्यकर्ते आज पक्षात प्रवेश करत आहेत. सर्वांची तळमळ फक्त प्रश्न सोडवण्याची आणि विकासासाठी आहे. यामध्ये प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत. यामुळे विकासाचे मुद्दे यापुढेही कायम ठेवण्याचे आवाहन केलं आहे.
तर शिवाजीराव नाईक यांनी, ‘सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही धाडसी नेत्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या कामाची दखल घेतली आहे. यापुढे पक्षवाढीसाठीचे काम तेवढ्याच ताकदीने करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी खानापूर विधानसभेत नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या होत्या. येथे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी भाजपची साथ ऐनवेळी सोडली होती. यामुळे या पट्ट्यात भाजपला खिंडार पडल्याचे मानले गेले होते. तर निवडणुकीच्या तोंडवर आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार गटाला ताकद मिळाली होती. पण तेथेही त्यांना न्याय मिळाला नाही. यामुळे ते नाराज होते. पण त्यांनी अपक्ष लढत दिली होती. मात्र पराभवामुळे त्यांच्या गटाच्या राजकीय वाटचालीवर शंका उपस्थित केली जात होती.
पण पुन्हा एकदा राष्ट्रवादीत जाऊन आटपाडीच्या देशमुख वाड्याकडे राजकारणाची वाट फिरली आहे. तर सत्तेत असणाऱ्या अजितदादांमुळे देशमुखांसह त्यांच्या गटाला पाठबळ मिळेल अशी चर्चा सध्या भागात सुरू आहे. पण या चार आमदारांचं आणि त्यांच्या गटाचे राजकीय भवितव्य काय असणार हे येणारा काळच ठरवणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.