sharad mohol Sarkarnama
विश्लेषण

Sharad Mohol : गँगस्टार... भाजप कनेक्शन... घात अन् राजकीय एन्ट्रीचं अधुरं राहिलेलं स्वप्न!

सरकारनामा ब्युरो

Pune News : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी काही दिवसांपूर्वीच प्रमुख नेत्याच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यावर अनेकांनी सडकून टीका केली होती.

गुंडगिरी करीत असतानाच शरद मोहोळला राजकारणात एन्ट्री करायची होती. प्रवेशासाठी त्याने आपली प्रतिमानिर्मिती करण्यासाठी सामाजिक कार्यक्रमसुद्धा राबवले होते. मात्र, राजकारणात चंचूप्रवेश होण्यापूर्वीच त्याचा दिवसाढवळ्या गेम झाल्याने त्याच्या महत्त्वाकांक्षेवर पाणी फेरले आहे.

पुण्यातील आणि मुळशी खोऱ्यातील गुन्हेगारीजगताची ओळख झाली ती 'मुळशी पॅटर्न' चित्रपटाने. त्याच मुळशी तालुक्यातील शरद मोहोळ होता. गुंड संदीप मोहोळचा ड्रायव्हर म्हणून शरद मोहोळ काम करीत होता. मात्र, याच संदीप मोहोळची हत्या झाल्यानंतर तो गुन्हेगार म्हणून नावारुपास आला. शरदचे आई-वडील शेतकरी असून बेताच्या परिस्थितीत मोठा होऊनही तो गुन्हेगारीकडे वळला होता.

शरद मोहोळ याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे नोंद आहेत. विरोधी टोळीतील पिंटू मारणे याच्या हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. या खटल्यात तो जामिनावर बाहेर आला आणि दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केले. त्यामुळे त्याला पुन्हा अटक करण्यात आली. या कालावधीत येरवडा कारागृहात त्याने आणि आलोक भालेराव या दोघांनी मिळून दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या कातिल सिद्दीकीचा खून केला. या प्रकरणात मागील वर्षी शरद मोहोळला जामीन मिळाला.

कारागृहात असतानाच शरद मोहोळ त्याची प्रतिमा सुधारत होता. गुन्हेगारी पार्श्वभूमी सौम्य करीत त्याने विविध गुन्ह्यांच्या आरोपाखाली अटक असताना जामीन मिळवला. त्यानंतर कारागृहातून बाहेर पडल्यानंतर त्याने वेगळी सुरुवात केली. विशेषतः सामाजिक उपक्रमात सहभाग वाढवला होता. त्याशिवाय विविध कार्यक्रमांत पुढाकार घेत त्याने सार्वजनिक उपक्रमात सहभाग नोंदवत. त्यामुळे काही स्वरूपात गुन्हेगारी पार्श्वभूमीचा डाग पुसत चालला होता. विशेषतः सामाजिक कार्यक्रमात व राजकीय मंडळींच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दिसत होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कारागृहातून बाहेर आल्यानंतर शरदने प्रतिमा सुधारत असतानाच वेगवेगळ्या पक्षातील नेतेमंडळींशी संपर्क वाढवला होता. त्यासोबतच राजकीय मंडळींशी जवळीकता साधत त्याने कोथरुड परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवले. त्या माध्यमातून त्याने विविध सामाजिक संघटनांशी संपर्क साधत विविध कार्यक्रम आयोजिले होते. त्यासोबतच कार्यक्रमाच्यानिमित्ताने का होईना राजकीय नेत्यांसोबतचा शरद मोहोळचा वावर चांगलाच वाढला होता. त्यामुळे त्याची राजकारणातील प्रवेश करण्याची सुप्त इच्छा मात्र लपून राहिली नव्हती.

पुण्यातील कोथरुड परिसरात शरद मोहोळ (Sharad Mohol) आणि त्याच्या टोळीचे वर्चस्व होते. त्यामुळे येत्या काळात राज्यात सर्वत्र निवडणुका होत असल्याने शरद मोहोळची नेत्यांना गरज भासू शकते. या कारणामुळे राजकारणातील प्रवेशासाठी तो प्रयत्नशील होता. त्यामुळेच काही दिवसांपूर्वीच प्रमुख नेत्याच्या उपस्थितीत शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ (swati mohol) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशानंतर कुख्यात गुंड शरद मोहोळ याची चांगलीच चर्चा रंगली होती. या प्रवेशानंतर मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाले. त्या माध्यमातून शरद मोहोळने राजकारणातील प्रवेशाची सर्व तयारी केली होती.

शुक्रवारी त्याच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे जवळचे नातेवाईक व मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. त्याच्या कार्यालयात मोठ्या संख्येने नागरिक शुभेच्छा देण्यासाठी आले होते. आलेल्या नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारून शरद मोहोळ दुपारच्यावेळी देवदर्शनाला जाण्यासाठी कार्यालयाच्या बाहेर पडले. यावेळी याच गर्दीतून आलेल्या चार जणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली.

R...

SCROLL FOR NEXT