Nilesh Ghaiwal passport Sarkarnama
विश्लेषण

Nilesh Ghaiwal: फरार घायवळनं तात्काळ पासपोर्टचा घेतला गैरफायदा! पोलिसांची भूमिकाही संशयास्पद? नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Nilesh Ghaiwal: अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या घायवळ यानं तात्काळ पासपोर्ट सुविधेचा गैरफायदा घेतल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर यामध्ये पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

सरकारनामा ब्युरो

Nilesh Ghaiwal: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ हा लंडनला फरार झाल्याच्या वृत्तानं सध्या राज्यात खळबळ उडाली आहे. अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या घायवळ यानं तात्काळ पासपोर्ट सुविधेचा गैरफायदा घेतल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर यामध्ये पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद असल्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण तात्काळ पासपोर्टच्या नियमातून पोलिसांच्या हलगर्जीपणामुळं हा प्रकार घडल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत असल्याचं बोललं जात आहे.

तात्काळ पासपोर्टची प्रक्रिया काय?

एखाद्या व्यक्तीला अर्जंट कामासाठी परदेशात जायचं असेल तर तात्काळ पासपोर्टची सेवा उपलब्ध असते. यामध्ये वैद्यकीय कारणासाठी, कलाकारांना सांस्कृतीक कार्यक्रमांसाठी किंवा इतर आपत्कालीन कारण यांचा समावेश होतो. त्यामुळं तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज करताना त्याचं कारणंही अर्जामध्ये नमूद करावं लागतं. विशेष म्हणजे तात्काळ पासपोर्ट काढण्यासाठी सर्वसाधारण प्रक्रियेपेक्षा तिप्पट फी आकारली जाते. या तात्काळ पासपोर्टसाठी अगदी एकाच दिवसात अपॉईंटमेंट उपलब्ध करुन दिली जाते. त्यामुळं अर्ज केल्यापासून दुसऱ्या दिवशी पासपोर्ट कार्यालयात जाऊन सर्व कागदपत्रे सादर करुन डेटा एन्ट्री आणि फोटोची प्रक्रिया पार पाडली जाते. तात्काळ पासपोर्टच्या व्यक्तींसाठी इथली प्रक्रिया वेगवान पद्धतीनं राबवलेली असते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ तिसऱ्या किंवा चौथ्याच दिवशी पासपोस्ट हा स्पीडपोटनं नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवला जातो. या मधल्या काळात पोलीस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया केली जात नाही. पण असं असलं तरी पासपोर्ट धारकाला पोलीस व्हेरिफिकेशन करुन घेणं बंधनकारक असतं कारण ते झाल्याशिवाय जर तो एअरपोर्टवर गेला आणि व्हेरिफिकेशन झालेलं नसल्याचं समोर आलं तर त्याचा पासपोर्ट तात्काळ जप्त केला जातो.

Tatkal Passport rule

दरम्यान, पासपोर्ट कार्यालयाकडून ज्या क्षणी पासपोर्ट उमेदवाराच्या पत्त्यावर डिस्पॅच केला जातो त्याचवेळी त्याचा संपूर्ण डेटा हा त्याच्या पत्त्याच्या कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनला पाठवला जातो. त्यानंतर पोलिसांकडूनच पासपोर्ट धारकाला फोनद्वारे किंवा मेसेजद्वारे पोलीस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ दिली जाते. या प्रक्रियेत बऱ्याचदा पोलीस पोलीस स्टेशनमध्येच तयार करण्यात आलेल्या पासपोर्ट कक्षात संबंधित तात्काळ पासपोर्टधारकाला बोलावून त्याची आवश्यक ती सर्व ओरिजिनल कागदपत्रे तपासून घेतात, त्यानंतरच त्याचं अॅप्रुव्हल पासपोर्ट कार्यालयाकडं पाठवलं जातं. बऱ्याचदा या प्रक्रियेत पोलीस थेट पासपोर्टधारकाच्या घरी जाणं टाळतात. त्यामुळं संबंधित व्यक्ती ही खरोखरच त्या पत्त्यावर राहते का? हे तपासलं जात नाही.

निलेश घायवळनं कसा घेतला गैरफायदा?

गुंड निलेश घायवळ यानं तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर वर दिलेल्या प्रक्रियेप्रमाणं १६ जानेवारी २०२० रोजी पासपोर्ट मंजूर झाला होता. या अर्जात त्यानं आपलं आडनाव घायवळ असं न लिहिता गायवळ असं लिहिलं होतं. तसंच त्यानं अहिल्यानगरच्या माळीवाडा भागातील पत्ता दिला होता. या ठिकाणी तो भाड्यानं राहत असल्याचं त्यानं अर्जात नमूद केलं होतं, त्यासाठी त्यानं भाडेकराराची प्रतही सादर केली होती. नाव आणि फोटो आयडीसाठी त्यानं आधारकार्ड दिलं होतं त्यातही त्याचं आडनाव गायवळ असंच होत, असं अहिल्यानगरच्या कोतवाली पोलिसांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर पत्त्यावर प्रत्यक्षात पोलिसांनी भेट दिल्यानंतर निलेश गायवळ नावाची कोणी व्यक्ती तिथं राहत नसल्याचं त्यांना आढळून आलं. त्यामुळं पोलिसांनी त्याच्या व्हिरिफिकेशन फाईलवर 'नॉट अव्हेलेबल' असा रिमार्क करुन ते पुढे पाठवलं, असा पोलिसांचा दावा आहे. म्हणजेच निलेश घायवळ हा व्हेरिफिकेशनसाठी प्रत्यक्ष पोलिसांच्या समोर आलाच नाही किंवा त्याची आणि पोलिसांची भेटच झाली नाही.

पण तात्काळ पासपोर्टच्या नियमानुसार, घायवळला आधी घरपोच पासपोर्ट मिळाला हा पासपोर्ट ताब्यात आल्यानंतर त्यानं पोलीस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण केली नाही. पण पोलिसांनी 'नॉट अव्हेलेबल' हा रिमार्क टाकलेला असतानाही निलेश घायवळचा पासपोर्ट हा पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये क्लिअर झाला. त्यामुळं परदेशात प्रवास करण्यासाठी त्याला विमानतळावर कुठलीही आडकाठी आली नाही आणि तो सहजरित्या भारताच्याबाहेर निघून गेला. म्हणून यामध्ये पोलिसांनीच त्याचा पासपोर्ट क्लिअर केला की, पासपोर्ट कार्यालयातूनच त्याला पासपोर्ट क्लिअर करण्यास कोणीतरी मदत केली? असा संशय व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT