Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यात सध्या टोकाचा वाद सुरू आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्ते प्रवेश करत असताना त्यांच्यामुळे संकटाच्या काळात साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा दावा जंजाळ यांनी केला. याशिवाय पालकमंत्री संजय शिरसाट विश्वासात न घेता पक्ष चालवत आहेत. त्यांच्याऐवजी मुलगा आणि मुलगी पक्षाच्या बैठका घेतात, असा आरोप करत जंजाळ यांनी थेट पंगा घेतला.
शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत हा वाद पोहोचल्यानंतर तो सोडवण्याची जबाबदारी त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवली. राज्यातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी काल मतदान झाल्यानंतर दुसरा टप्पा २० डिसेंबर रोजी होणार आहे.
या निवडणुकीचा निकाल 21 रोजी जाहीर झाल्यानंतर संभाजीनगर शिवसेनेतील वादावर तोडगा काढण्यासाठी श्रीकांत शिंदे हे बैठक घेणार असल्याचे बोलले जाते. दरम्यान राजेंद्र जंजाळ यांच्या भाजप नेत्यांशी वाढलेल्या गाठीभेटी आणि उठबस पाहता ते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिरसाट-शिंदे यांना तूर्तास सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात एकनाथ शिंदे यांच्यासोबत हे दोघे वावरले, व्यासपीठावर सोबतही दिसले. परंतु त्यांच्यातील अबोला कायम आहे. पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्याशी अबोला आणि भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्याशी दोन दोन तास गप्पा , असे काहीसे सध्या राजेंद्र जंजाळ यांचे सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी शहरात झालेल्या एका लग्न समारंभात राजेंद्र जंजाळ हे भाजपचे मंत्री अतुल सावे, खासदार डॉ.भागवत कराड, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारताना दिसले. यावरून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, जंजाळ यांच्या पक्षप्रवेशाने भाजपला महापालिका निवडणुकीत किती फायदा होईल? याची चाचपणी घेतली जात असल्याची माहिती आहे. राजू शिंदे यांच्या घरवापसीनंतर राजेंद्र जंजाळ यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने या पक्षातही दोन गट असल्याचे दिसून आले आहे. जंजाळ यांच्याही पक्षप्रवेशाला भाजपातील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याचे समजते.
महापालिका निवडणुकीतील फायद्या तोट्याचे गणित लक्षात घेता मंत्री यातून सावे यांची यात महत्त्वाची भूमिका ठरणार आहे. स्वतः जंजाळ यांनी अडचणीच्या काळात काम करून विजय मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, पक्ष मजबूत आहे तिथे उद्धवसेनेतील लोकांना घेतल्याने गटबाजी निर्माण झाल्याचे म्हटले होते. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीतील निर्णयानंतर आपण पुढे काय करायचे ते ठरवणार असल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे पालकमंत्री संजय शिरसाठ यांची ताठर भूमिका ही कायम आहे. कुटुंबातील सदस्यांवर आरोप केल्यानंतर शिरसाट प्रचंड संतापले होते. यातूनच त्यांनी राजेंद्र जंजाळ यांना कुठे जायचे तिथे जा, असे म्हणत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. नव्याने राजेंद्र जंजाळ यांच्या भाजप नेत्यांची वाढत्या गाठीभेटी आणि चर्चांवर प्रतिक्रिया देताना शिरसाट यांनी आमच्या वादावर पक्षाचे नेते एकनाथ शिंदे निर्णय घेणार आहेत. त्यामुळे सध्या यावर बोलणे योग्य नाही. कोण कुणाला भेटते? याची मला माहिती नाही, लग्नात भेटणे याचा अर्थ थेट पक्ष प्रवेशासाठी भेट आहे असे होत नाही, असे शिरसाठ म्हणाले.
एकूणच महापालिका निवडणुकीच्या आधीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये बंडाळी उफाळून आल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. शिवाय मोठ्या अपेक्षेने उद्धव ठाकरे यांचा पक्ष सोडून शिंदेंकडे आलेल्या आठ माजी महापौर आणि सोळा माजी नगरसेवकांची अवस्था 'ना घर का ना घाट का' अशी होते की काय? अशी चिंता त्यांना सतावू लागली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यावर किती लवकर तोडगा काढतात? त्यानंतरच ही बंडाळी थांबणार की महिला जिल्हाप्रमुखाप्रमाणेच राजेंद्र जंजाळही भाजपाची वाट धरतात? हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.