Hariyana Election  Sarkarnama
विश्लेषण

Hariyana Vidhansabha Election : हरियाणात घराणेशाहीची गाडी सुसाट; बड्या राजकीय घराण्यांत संघर्ष पेटणार

Political News : हरियाणाच्या राजकारणात घराणेशाही नवीन नाही. 1967 मध्ये झालेल्या विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत घराणेशाही सुरू झाली.

अय्यूब कादरी

Election News : हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत राजकीय घराणेशाहीला उधान आले आहे. काँग्रेससह भाजपही यात मागे राहिलेला नाही. हरियाणातील प्रसिद्ध राजकीय कुटंबातील व्यक्ती वेगवेगळ्या पक्षांकडून एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उतरले आहेत.

राजकारणातील घराणेशाहीवर राजकीय पक्षांकडून वेळोवेळी आरोप-प्रत्यारोप केले जातात. काँग्रेसमधील घराणेशाही सर्वपरिचित आहे. देशासह विविध राज्यांत काँग्रेसची दीर्घकाळ सत्ता होती, त्यामुळे पक्षात घराणेशाहीची लागण झाली. काँग्रेसवर (Congress) घराणेशाहीचा आरोप करणारा भाजप (Bjp) आणि अन्य पक्षही आता मागे राहिलेले नाहीत हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी देताना घराणेशाही जपण्यात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. भाजपही यात मागे राहिलेला नाही. राजकीय घराणेही आपसात भिडत आहेत.

हरियाणात विधानसभेसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत घराणेशाहीचा बोलबाला सुरू झाला आहे. काँग्रेसने राजकीय घराण्यांतील 24 जणांना उमेदवारी दिली आहे. यापाठोपाठ भाजपने 11 उमेदवार राजकीय घराण्यांतील दिले आहेत. इंडियन नॅशनल लोकदलने असे 5 उमेदवार दिले आहेत. हरियाणाच्या राजकारणात घराणेशाही नवीन नाही. 1967 मध्ये झालेल्या विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत घराणेशाही सुरू झाली. त्यावेळी राव तुलाराम यांचे वंशज राव वीरेंद्र सिंह अहिरवाल आणि काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांचे वडील रणबीर सिंह हुड्डा हे देसवाली पट्ट्यात सक्रिय होते.

शेतकरी नेते सर छोटूराम यांचे जावई चौधरी नेकी राम हे अविभाजित पंजाबमध्ये मंत्री होते. हरियाणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते बांगर भागात सक्रिय राहिले. चौधरी देवीलाला आणि त्यांचे कुटुंबिय हरियाणासह देशाच्या राजकारणात सक्रिय होते. या निवडणुकीतही हरियाणात घराणेशाहीचे राजकारण सुसाट आहे.

काँग्रेसने 24 आणि भाजपने 11 उमेदवार राजकीय घराण्यांतून दिले आहेत. या निवडणुकीत राजकीय कुटुंबांमध्येही राजकारण सुरू झाले आहे. तोशाममध्ये बंन्सीलाल कुटुंबीय आमने-सामने असून, डबवालीमध्ये चौटाला कुटुंबीयांतील चार उमेदवार मैदानात उतरले आहेत. बाहदूरगड मतदारसंघात काँग्रेसचे राजेंद्र जून यांना त्यांच्या पुतण्याने आव्हान दिले आहे.

चौटाला कुटुंबातील सदस्य आमनेसामने

या निवडणुकीत माजी उपपंतप्रधान देवीलाल यांच्या कुटुंबातील आठजण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. हे सर्व उमेदवार दुसऱ्या, चौथ्या पिढीतील आहेत. देवीलाल यांचे पुत्र, माजी मंत्री रणजित चौटाला हे राणियां मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहेत. त्यांच्या समोर त्यांचे मोठे बंधू आणि माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे नातू अर्जुन हे इंडियन नॅशनल लोकदलच्या उमेदवारीवर मैदानात उतरले आहेत.

ओमप्रकाश चौटाला यांचे लहान पुत्र अभय हे एलानाबाद मातदारसंघात इंडियन नॅशनल लोकदलचे उमेदवार आहेत. अभय यांचे मोठे बंधू अजय चौटाला यांचे पुत्र आणि माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला हे जेजेपीचे जिंद जिल्ह्यातील उचाना मतदारसंघाचे उमेदवार आहेत. अजय यांचे दुसरे पुत्र दिग्विजय हे डबवाली मतदारसंघातून लढत आहेत. या मतदारसंघातून त्यांचे काका आदित्य चौटाला इंडियन नॅशनल लोकदलचे उमेदवार आहेत. चौटाला कुटुंबातील अन्य सदस्य अमित सिहाग हे डबवालीतू काँग्रेसचे, देवीलाल यांचे नातू रवी प्रताप चौटाला यांच्या पत्नी सुनयना या फतेहाबाद येथून इंडिय नॅशनल लोकदलच्या उमेदवार आहेत.

बन्सीलाल कुटुंबात राजकीय वारशासाठी बहीण-भावात संघर्ष

बन्सीलाल यांचा राजकीय वारसा कोणाला मिळणार, यासाठी त्यांच्या कुटुंबात या निवडणुकीच्या निमित्ताने संघर्ष सुरू झाला आहे. भिवानी जिल्ह्यातील तोशाम मतदारसंघातून भाजपने राज्यसभा सदस्य किरण चौधरी यांच्या कन्या श्रुती यांना मैदानात उतरवले आहे. बन्सीलाल यांच्या नात श्रुती या खासदार होत्या. दुसरीकडे, काँग्रेसने येथून बन्सीलाल यांचे ज्येष्ठ पुत्र रणबीर महेंद्रा यांचे पुत्र अनिरुद्ध चौधरी यांना उमेदवारी दिली आहे.

हुड्डा कुटुंबाची दुसरी, तिसरी पिढी सक्रिय

रणबीर सिंह हुड्डा हे रोहतकचे खासदार होते. त्यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री भूपेंदर सिंह हुड्डा यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. हुड्डा हे सलग दोनवेळा हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते. आता त्यांचा राजकीय वारसा सांभळण्यासाठी खासदार दीपेंद्र हुड्डा सज्ज झाले आहेत. खासदार असलेले दीपेंद्र हुड्डा हे गढी सांपला किलोई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

भजनलाल कुटुंबः काका काँग्रेस, पुतण्या भाजपकडून मैदानात

माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे नातू भव्य बिष्णोई यांना भाजपने आदमपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. भव्य यांचे वडील कुलदीप बिष्णोई हे काँग्रसचे माजी खासदार आहेत. आता ते भाजपमध्ये आहेत. भजनलाल यांचे पुत्र आणि माजी उपमुख्यमंत्री चंद्रमोहन यांना काँग्रेसने पंचकुला मतदारसंघातून रिंगणात उतरवले आहे. चंद्रमोहन हे यापूर्वी चारवेळा निवडून आले होते. भजनलाल यांचे बंधू दुडाराम हे फतेहाबाद मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.

भाजपने तीन, काँग्रेसने सहा माजीमंत्र्यांच्या नातवेईकांना दिली उमेदवारी

भाजपने माजीमंत्री विनोद शर्मा यांच्या पत्नी शक्तीराणी यांना कालका, सतपाल सांगवान यांचे पुत्र सुनील यांना चरखी दादरी आणि करतार भडाना यांचे पुत्र मनमोहन यांना समालखा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, काँग्रेसने माजीमंत्री हरमोहिंद्रसिंह चट्ठा यांचे पुत्र मनजित यांना पिहोवा, महेंद्र प्रताप यांचे पुत्र विजय प्रताप यांना बडखल, गयालाल यांचे पुत्र उदयभान यांना होडल, पंडित शिवचरण लाल शर्मा यांचे पुत्र नीरज यांना फरिदाबाद एनआयटी, हरपाल सिंह यांचे पुत्र परमवीर यांना टोहाना आणि आनंद सिंह डांगी यांचे पुत्र बलराम यांना महम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसकडून तीन खासदारांच्या नातेवाईंकांचे लाँचिंग

विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रसेने तीन खासदारांच्या नातावेईकांचे लाँचिंग केले आहे. यात राज्यसभेचे खासदार रणदीपसिंह सूरजेवाला यांचे पुत्र अदित्य सूरजेवाला यांना कैथस, लोकसभेचे खासदार वरुण चौधरी यांच्या पत्नी पूजा यांना मुलाना आणि हिसारचे खासदार जयप्रकाश जेपी यांचे पुत्र विकास सहारण यांना कलायत मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT