MVA - Mahayuti Sarkarnama
विश्लेषण

Hingoli Assembly Election : हिंगोली विधानसभा निवडणुकीत काय होणार? उत्सुकता शिगेला...

Sachin Waghmare

Hingoli News : हिंगोली जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 रोजी झाली. परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोली जिल्हा अस्तित्वात आला. या जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी व वसमत हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. हिंगोली जिल्हा सुरुवातीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता.

अलिकडच्या काळात राजकारणाचा कूस बदलला आहे. नुकत्याच झालेल्या फोडाफोडीत या जिल्ह्यातील दोन आमदार नव्या गटासोबत गेले आहेत. त्यामुळे येथील राजकीय समीकरण बदलली आहेत. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Ncp) फूट पडल्यानंतर राज्याचे वातावरण चांगलेच तापल्याचं पाहायला मिळते.

या मतदारसंघात साधारण 40 टक्के लोक शहरी व निमशहरी भागात राहतात तर 60 टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. या मतदारसंघांत आदिवासी आणि बंजारा समाजाचे निर्णायक मतदान आहे.

दुसरीकडे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या नागेश पाटील आष्टीकर यांनी विजय संपादित केल्याने ठाकरे गटाचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. त्यांनी शिंदे गटाचे उमेदवार बाबुराव कदम यांचा पराभव केला. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत काय होणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

पक्षीय बलाबल

हिंगोली जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी वसमतमध्ये अजित पवार गटाचे आमदार आहेत. हिंगोलीत भाजपचे आमदार आहेत. तर कळमनुरीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गट एक, भाजप एक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एक असे पक्षीय बलाबल आहे.

हिंगोली जिल्ह्यातील आमदार

हिंगोली : तानाजी मुटकुळे (भाजप)

वसमत : चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)

कळमनुरी : संतोष बांगर ( शिवसेना एकनाथ शिंदे गट )

हिंगोली मतदारसंघ :

2019 च्या विधानसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघातून भाजपचे तानाजी मुटकुळे दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या भाऊराव पाटील यांचा चार हजार मताने पराभव केला होता. या वेळेस पुन्हा भाजपचे तानाजी मुटकुळे उमेदवार असणार आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये जागा कोणत्या पक्षाला सुटणार यावरून उमेदवार ठरणार आहे.

कळमनुरी मतदारसंघ :

कळमनुरीत एकनाथ शिंदे गटाचे संतोष बांगर आमदार आहेत. त्यांच्या विरोधात महविकास आघाडीचा कोण उमेदवार असणार याची उत्सुकता सर्वाना लागली आहे. 2009 काँग्रेसचे राजीव सातव आमदार होते तर 2014 मध्ये काँग्रेसचे संतोष टारफे विजयी झाले होते.

माजी मंत्री व काँग्रेस नेत्या रजनी सातव यांचा हा पुर्वश्रमीचा मतदारसंघ आहे. सध्या दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या विधानपरिषदेच्या आमदार आहेत. या जागेवर काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. त्यामुळे ही जागा कोणाला सुटणार यावरून उमेदवार ठरणार आहे.

वसमत मतदारसंघ :

वसमतमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादीमधील फोडाफोडीनंतर अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. यावेळेस तेच निवडणूक रिंगणात राहणार आहेत.

त्यांच्या विरोधातील आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजेच माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर विरुद्ध आमदार नवघरे अशी लढत रंगणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. माजी मंत्री दांडेगावकर यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची घोषणा करून त्यांनी निवडणुकीची तुतारी फुंकली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT