245 Independent MLAs in Maharashtra in 57 years Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Independent MLA : सत्तेचा सोपान,अपक्ष 'किंगमेकर'! 57 वर्षांच्या इतिहासात 'एवढ्या' अपक्षांनी गाठलं विधानभवन...

Independent MLAs in Maharashtra in 57 years : 1962 पासून 16,549 अपक्षांनी लढवली विधानसभा. गेल्या 57 वर्षांत किती अपक्ष बनले आमदार ? जाणून घेऊयात अपक्षांच्या राजकीय लढाईचा इतिहास...

Sandeep Chavan

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या राजकीय पक्षांची जशी कमतरता नाही तशी अपक्ष उमेदवारांचीही वानवा नाही. 2019 मध्ये सर्वाधिक म्हणजे 125 पक्षांनी निवडणूक लढवली तर 1995 मध्ये सर्वाधिक म्हणजे 3196 अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली. गेल्या 57 वर्षांत किती अपक्ष बनले आमदार ? जाणून घेऊयात अपक्षांच्या राजकीय लढाईचा इतिहास...

पक्षांचं फुटलं पेव, अपक्षांचं वाढलं पीक!

महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेळ अशी आली की, पक्षांचं पेव फुटलं आणि अपक्षांचं पीक आलं. 2019 च्या निवडणुकीत राजकीय पक्षांची संख्या वाढून ती 125 च्या घरात गेली तर 1995 च्या निवडणुकीत अपक्षांच्या संख्येनं तब्बल 3196 पर्यंत मजल मारली. 1962 पासून 2019 पर्यंतच्या 13 निवडणुकांमध्ये आतापर्यंत 245 अपक्ष उमेदवारांनी विधानसभेची पायरी चढली त्यात 03 महिला उमेदवारांचाही समावेश आहे.

पहिल्याच निवडणुकीत 15 अपक्ष बनले आमदार!

1962 : संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्रात 1962 मध्ये विधानसभा निवडणूक लागली. 1161 उमेदवारांनी ही निवडणूक लढवली. 10 राजकीय पक्षांचे एकूण 724 उमेदवार तर 437 अपक्ष रिंगणात उतरले. 264 जागांसाठी झालेल्या या पहिल्याच निवडणुकीत 15 अपक्ष उमेदवार आमदार झाले.

463 पैकी 16 अपक्ष पोचले विधानसभेत!

1967 : 1242 उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढवली. 09 राजकीय पक्षांचे 779 उमेदवार तर 463 अपक्ष रिंगणात उतरले. 270 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत 16 अपक्ष उमेदवार आमदार झाले. म्हणजे 1962 च्या तुलनेत निवडून आलेल्या अपक्ष आमदारांची संख्या या निवडणुकीत 01 नं वाढली.

23 अपक्ष उमेदवारांनी जिंकली निवडणूक

1972 : या वर्षी 1196 उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढवली. 15 राजकीय पक्षांचे एकूण 853 तर 343 अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले. 270 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत 23 अपक्ष उमेदवार आमदार झाले. म्हणजे 1967 च्या तुलनेत निवडून आलेल्या अपक्ष आमदारांची संख्या या निवडणुकीत 07 नं वाढली.

28 अपक्ष उमेदवार बनले आमदार

1978 : या वर्षी 1819 उमेदवारांनी विधानसभा निवडणूक(Vidhansabha Election) लढवली. 12 राजकीय पक्षांचे एकूण 925 तर 894 अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले. 288 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत 28 अपक्ष उमेदवार आमदार झाले. म्हणजे 1972 च्या तुलनेत निवडून आलेल्या अपक्ष आमदारांची संख्या या निवडणुकीत 05 नं वाढली. या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांच्या एकूण उमेदवारांपैकी अपक्षांची संख्या फक्त 29 नं कमी होती.

1978 च्या तुलनेत अपक्ष आमदारांची संख्या घटून 10 वर

1980 : या वर्षी 1537 उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढवली. 13 राजकीय पक्षांचे एकूण 925 तर 612 अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले. 288 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत 10 अपक्ष उमेदवार आमदार झाले. म्हणजे 1978 च्या तुलनेत निवडून आलेल्या अपक्ष आमदारांची संख्या या निवडणुकीत 18 नं घटली.

विनिता सामंत ठरल्या पहिल्या महिला अपक्ष आमदार!

1985 : या वर्षी 2230 उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढवली. त्यात 83 महिला उमेदवार होत्या. 11 राजकीय पक्षांचे एकूण 724 तर 1506 अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले. 288 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत 20 अपक्ष उमेदवार आमदार झाले. म्हणजे 1980 च्या तुलनेत निवडून आलेल्या अपक्ष आमदारांची संख्या या निवडणुकीत 10 नं वाढली. या निवडणुकीची दोन वैशिष्ट्यं... पहिलं म्हणजे अपक्षांची एकूण संख्या ही राजकीय पक्षांच्या एकूण उमेदवारांपेक्षा 782 नं जास्त होती. म्हणजेच अपक्षांची संख्या जास्त आणि राजकीय पक्षांच्या उमेदवारांची संख्या कमी! दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीत पहिल्यांदाच एक महिला अपक्ष उमेदवार आमदार बनल्या. त्या म्हणजे कामगार संघटनेचे नेते डॉ. दत्ता सामंत यांच्या पत्नी विनिता सामंत. त्या वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या. या निवडणुकीत त्यांच्यासह एकूण 16 महिला उमेदवार आमदार बनल्या.

1985 च्या तुलनेत अपक्ष आमदारांची संख्या घटून 13 वर

1990 : या वर्षी 3764 उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढवली. 35 राजकीय पक्षांचे एकूण 1478 तर 2286 अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले. 288 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत 13 अपक्ष उमेदवार आमदार झाले. म्हणजे 1985 च्या तुलनेत निवडून आलेल्या अपक्ष आमदारांची संख्या या निवडणुकीत 07 नं घटली.

सर्वाधिक अपक्ष निवडून येण्याचा विक्रम, 45 आमदार!

1995 : या वर्षी 4727 उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढवली. 36 राजकीय पक्षांचे एकूण 1531 तर 3196 अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले. 288 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत तब्बल 45 अपक्ष उमेदवार आमदार झाले. म्हणजे 1990 च्या तुलनेत निवडून आलेल्या अपक्ष आमदारांची संख्या या निवडणुकीत 22 नं वाढली. या निवडणुकीची दोन वैशिष्ट्यं... पहिलं म्हणजे अपक्षांची एकूण संख्या ही राजकीय पक्षांच्या एकूण उमेदवारांपेक्षा 1665 नं जास्त होती. म्हणजेच अपक्षांची संख्या जास्त आणि राजकीय पक्षांच्या उमेदवारांची संख्या कमी! 1985 मध्येही अपक्षांची संख्या राजकीय पक्षांच्या एकूण उमेदवारांहून जास्त होती. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकींपेक्षा या निवडणुकीत सर्वांत जास्त अपक्ष उमेदवार निवडून येऊन आमदार बनले.

1995 च्या तुलनेत अपक्ष आमदार 45 वरून 12 वर

1999 : या वर्षी 2006 उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढवली. 39 राजकीय पक्षांचे एकूण 1169 तर 837 अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले. 288 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत 12 अपक्ष उमेदवार आमदार झाले. म्हणजे 1995 च्या तुलनेत निवडून आलेल्या अपक्ष आमदारांची संख्या या निवडणुकीत 33 नं घटली.

1999 च्या तुलनेत 07 जण वाढले; 19 आमदार

2004 : या वर्षी 2678 उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढवली. 57 राजकीय पक्षांचे एकूण 1595 तर 1083 अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले. 288 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत 19 अपक्ष उमेदवार आमदार झाले. म्हणजे 1999 च्या तुलनेत निवडून आलेल्या अपक्ष आमदारांची संख्या या निवडणुकीत 07 नं वाढली.

2004 च्या तुलनेत 05 जण वाढले; 24 आमदार

2009 : या वर्षी 3559 उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढवली. 77 राजकीय पक्षांचे एकूण 1739 तर 1820 अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले. 288 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत 24 अपक्ष उमेदवार आमदार झाले. म्हणजे 2004 च्या तुलनेत निवडून आलेल्या अपक्ष आमदारांची संख्या या निवडणुकीत 05 नं वाढली.

2009 च्या तुलनेत घट; अपक्ष आमदार 24 वरून 07 वर

2014 : या वर्षी 4407 उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढवली. 90 राजकीय पक्षांचे एकूण 2708 तर 1699 अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले. 288 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत 07 अपक्ष उमेदवार आमदार झाले. म्हणजे 2009 च्या तुलनेत निवडून आलेल्या अपक्ष आमदारांची संख्या या निवडणुकीत 17 नं घटली.

02 महिला अपक्ष उमेदवार झाल्या आमदार!

2019 : या वर्षी 3244 उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढवली. 125 राजकीय पक्षांचे एकूण 1844 तर 1400 अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले. 288 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत 13 अपक्ष उमेदवार आमदार झाले. म्हणजे 2014 च्या तुलनेत निवडून आलेल्या अपक्ष आमदारांची संख्या या निवडणुकीत 06 नं वाढली. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे 02 महिला अपक्ष उमेदवार आमदार झाल्या. साक्री मतदारसंघातून मंजुळा गावित तर मीरा - भाईंदरमधून गीता जैन निवडून आल्या. यापूर्वी 1985 मध्ये विनिता सामंत या पहिल्या महिला अपक्ष उमेदवार आमदार बनल्या होत्या.

काही अपक्ष पुढं जाऊन बनले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री!

सर्वांत आधी अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले आणि नंतर काँग्रेसवासी झालेले शंकरराव चव्हाण, ए. आर. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. शंकरराव चव्हाण तर दोनदा मुख्यमंत्री झाले. विशेष म्हणजे ते राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद आणि विधानसभा या चारही सभागृहांचे सदस्य राहिले. विजयसिंह मोहिते-पाटील उपमुख्यमंत्री बनले. हर्षवर्धन पाटील सहकारमंत्री बनले. अपक्ष म्हणून निवडून आलेले बच्चू कडू, सुनील केदार, बबनराव पाचपुते, बबनराव घोलप आदी किती तरी राजकारणी पुढं मंत्री, राज्यमंत्री बनले.

1962 पासून 2019 पर्यंत एकूण 33,570 उमेदवारांनी निवडणूक लढवली. त्यापैकी अपक्ष उमेदवारांची संख्या होती 16,549. एकूणच काय तर सत्तेचा सोपान गाठण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी या अपक्षांचा वेळोवेळी आधार घेतला. महाराष्ट्राच्या राजकारणात अपक्षांना अढळ स्थान आहे हे यामुळं अधोरेखित तर झालंच शिवाय या अपक्षांमुळं सत्तेचा समतोल राखण्यास मदतही झाली हे नक्की!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT