Assembly Election 2024 : पुन्हा संविधान...! विधानसभेलाही भाजपसह महायुतीची झोप उडणार

Mahavikas Aghadi Vs Mahayuti : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फेक नरेटिव्ह तयार केले, त्यामुळे त्यांना लोकसभेत यश मिळाले, असे महायुतीच्या नेत्यांनी कितीही सांगितले तरी त्यात तथ्य नाही. राज्यघटनेत बदल करण्यासाठी भाजपला 400 पेक्षा अधिक जागा हव्या आहेत, अशी विधाने भाजपच्या नेत्यांनीच केली होती.
Mahayuti
MahayutiSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत काही नरेटिव्हमुळे महाराष्ट्रात भाजप (BJP) आणि महायुतीची कोंडी झाली होती. ती कोंडी महायुतीला अखेरपर्यंत फोडता आली नाही.

आता महायुतीचे नेते महाविकास आघाडीनेच फेक नरेटिव्ह तयार करून ते मतदारांत पसरवले, असे म्हणत असले तरी त्याची सुरुवात भाजप नेत्यांनीच सुरू केली होती. भाजपने लोकसभा निवडणुकीत 'अब की बार चारसौ पार' अशी घोषणा केली होती. ती भाजपच्या अंगलट आली.

केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी 272 जागांची आवश्यकता असते. एखाद्या पक्षाला 272 जागा मिळाल्या की बहुमत त्याच्या पारड्यात पडते. असे असतानाही भाजपला 400 पेक्षा अधिक जागा कशासाठी हव्या आहेत? असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला होता. त्याचे उत्तर भाजपच्या काही नेत्यांनी देऊन ठेवले होते.

भाजपचे (BJP) कर्नाटकमधील नेते अनंत हेगडे यांच्या एका विधानाने देशभरात वाद सुरू झाला. राज्यघटना बदलण्यासाठी भाजपला चारशेपेक्षा अधिक जागा हव्या आहेत, असे विधान त्यांनी केले आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वादाने निवडणूक संपेपर्यंत भाजपचा पिच्छा सोडला नाही. भाजपने हेगडे यांच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर केले, ती भाजपची भूमिका नाही, असे स्पष्टीकरण दिले, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. याच मुद्द्यावरून विधानसभेच्या निवडणुकीतही भाजप आणि महायुतीची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपच्या अन्य काही नेत्यांनीही हेगडे यांच्यासारखी वक्तव्ये केली होती. त्यामुळे भाजप अडकत गेला. लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपचे तेलंगणातील वादग्रस्त आमदार टी. राजासिंह एका कार्यक्रमानिमित्त मुंबईत आले होते. तेथे त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.

Mahayuti
Manoj Jarange Patil : आंदोलन खूप झाली, आता सत्तेत जाऊनच आरक्षण घेऊ..

भाजपला चारशेपेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या तर भारत हिंदुराष्ट्र झाला असता, असे ते म्हणून गेले. त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते महाविकास आघाडीवर फेक नरेटिव्ह तयार केल्याचा जो आरोप करतात, त्याला अर्थ नाही, कारण भाजपचे नेतेच राज्यघटनेबाबत उलटसुलट विधाने करत आहेत. याचा महायुतीच्या नेत्यांना विसर पडतो आहे.

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी याबाबत महायुतीच्या नेत्यांची कानउघाडणी केली आहे. भाजपच्या उत्तरप्रदेशातील एका उमेदवाराने राज्यघटना बदलाबाबत विधान केले होते, असे राज ठाकरे यांनी भाजप नेत्यांना सुनावले आहे. आता संविधान (Constitution) पुन्हा एकदा भाजप आणि महायुतीची झोप उडवणार, अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.

Mahayuti
Eknath Shinde : CM शिंदेंची मजबुरी कोणती? भाजप नेत्यांवर टीका झाली की आठवतेय महाराष्ट्राची संस्कृती

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत पुण्यातील बालगंधर्वमध्ये 'संविधान सन्मान सभा' आयोजित करण्यात आली आहे. येत्या 24 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम होणार आहे. पुण्यातील तरुणांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीतही संविधानाचा मुद्दा जिवंत ठेवणार असल्याचे संकेत याद्वारे मिळाले आहे. त्यामुळे भाजप आणि महायुतीला निश्चितपणे धडकी भरलेली असणार. भाजप आणि महायुती जे विसरण्याचा प्रयत्न करत आहेत, नेमका तोच मुद्दा संविधान सन्मान सभेच्या रूपाने त्यांच्या समोर येत आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला महाराष्ट्रात अपयश का आले, याबाबत तिन्ही पक्षांनी व्यवस्थित चिंतन केलेले दिसत नाही. त्यामुळेच ते आपल्या पराभवाचे खापर महाविकास आघाडीच्या नेत्यांवर फोडत आहेत. गेल्या पाच वर्षांत भाजपने महाराष्ट्रात ज्या पद्धतीचे राजकारण केले, त्याचा सर्वाधिक फटका महायुतीला बसला. बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष भाजपने फोडला, असा संदेश मतदारांत गेला होता.

त्यापाठोपाठ भाजपने शरद पवार यांचाही पक्ष फोडला. मी दोन पक्ष फोडून परत आलो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जाहीरपणे म्हणाले होते. फडणवीस यांच्या निकटवर्तीय नेत्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर मर्यादा सोडून टीका सुरू केली होती. ती आजही सुरूच आहे. महायुतीचे नुकसान होण्यात या बाबी कारणीभूत होत्या. भाजपला हे माहिती नाही, असे म्हणता येणार नाही, मात्र कार्यकर्ते आणि आपल्या पारंपरिक मतदारांना बांधून ठेवण्यासाठी भाजपने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर खापर फोडणे सुरू ठेवले आहे.

Mahayuti
NCP Ajit Pawar Vs BJP : मावळ, इंदापूर अन् माढ्यात अजितदादांना भाजपसह राष्ट्रवादीतूनच चॅलेंज; नेमकं काय सुरू?

महाविकास आघाडी सरकारचा सर्वाधिक काळ कोरोना महामारीच्या साथीतच गेला. भाजपशासित अन्य राज्यांच्या तुलनेत कोरोनाकाळात महाराष्ट्राची स्थिती तशी बरी होती. असे असतानाही भाजप नेत्यांनी त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. देशात कोरोनाचा फैलाव झाला, यासाठी एका विशिष्ट समुदायाला जबाबदार धरत भाजपच्या आयटी सेलने दुष्प्रचार सुरू केला होता.

महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनी अशी परिस्थिती उद्भवू दिली नव्हती. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. महाराष्ट्राचे कुटुंबप्रमख अशी त्यांची ओळख बनली. हे सर्व सुरू असताना एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेले. त्यामुळे त्यांना प्रचंड सहानुभूती मिळाली. ती आजही टिकून आहे, असे म्हणता येईल. भाजपने या बाबींचा विचार केलेला दिसत नाही. राज्यघटनेबाबत भाजप नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे समाजात निर्माण झालेली धग कमी होऊ द्यायची नाही, असा महाविकास आघाडीचा प्रयत्न दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com