राहुल गडकर :
Kolhapur News: कागलला राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. आतापासूनच कागलमध्ये आगामी निवडणुकीच्या 'जोडण्या' पाहायला मिळत आहेत. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा पराभव करण्याचा विडाच उचलला आहे.
पण मुश्रीफांसोबतच त्यांना घाटगे यांचाही सामना करावा लागणार आहे. मुश्रीफांनी गेल्या आठवड्यात केलेल्या वक्तव्यामुळे समरजित घाटगेंचा पराभव करण्यासाठी 'संजय घाटगे' नावाचं अस्त्र मुश्रीफ यांनी तयार ठेवल्याचे दाखवून दिले.
व्हनाळी येथील अन्नपूर्णा जॅगरी प्रकल्पाचा गळीत हंगाम हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीचं 'मास्टर प्लॅनिंग' मुश्रीफांनी केल्याचे दिसून येते. विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत मुश्रीफ यांच्या विरोधात शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे आणि मुश्रीफांच्या विजयात वाटा असणारे संजयबाबा घाटगे आपल्यासोबतच असतील, असे त्यांनी जाहीरपणे सांगून टाकले.
राज्याच्या राजकारणातच नाही तर देशाच्या राजकारणातही उलथापालथी झाल्या तरी माजी आमदार संजय घाटगे आणि आपण एकत्रच राहणार असल्याचे मुश्रीफ यांनी जाहीर केले. मुश्रीफ यांच्या या वक्तव्याने मात्र विधानसभेच्या 'जोडण्या' आतापासूनच सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
मागील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती करून निवडणूक लढवली होती. भाजपच्या मदतीने समरजित सिंह घाटगे विरुद्ध राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ असा सामना रंगणार होता. त्यावेळी घाटगेंचा विजय निश्चित मानला जात होता.
मात्र, ऐनवेळी मुश्रीफांनी 'सारीपाटा फासे' फिरवत पडद्यामागून हालचाली केल्या. शिवसेनेकडून संजयबाबा घाटगे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे तिरंगी लढत झाल्याने मत विभाजनाचा फटका समरजित घाटगे यांना बसला आणि मुश्रीफ त्या ठिकाणी विजयी झाले.
राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर कागलच्या राजकारणात फारसा परिणाम पडलेला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे समरजित घाटगे हे बंडखोरी करून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. याबाबत त्यांनी वारंवार तसे संकेतही दिले आहेत.
राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतर घाटगे हे नाराज होते. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे माझे राजकीय गुरू आहेत. आम्ही खुर्द आहोत, बुद्रुकसाठी भाजप का सोडू ? मुश्रीफ यांचा पराभव अटळ आहे, असे घाटगे यांनी जाहीर सभेत सांगितले.
दुसरीकडे घाटगे यांनी शाहू ग्रुपच्या माध्यमातून वाढवलेला जनसंपर्क, भाजपची मदत आणि राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांची साथ मिळण्याची शक्यता आहे, तर 'गोकुळ'च्या निवडणुकीत खासदार पुत्र वीरेंद्र मंडलिक यांना पराभव स्वीकारावा लागल्याने तेही अधूनमधून समरजित घाटगे यांच्यासोबत दिसतात.
खासदार संजय मंडलिक सध्या मुश्रीफ यांच्या बाजूने असले तरी पडद्यामागून बऱ्याच घडामोडी सुरू असतात. नुकतेच मंडलिक यांचे कार्यकर्ते राजेखान जमादार यांनी मुश्रीफ यांच्यावर आरोप केला. त्यावेळी मंडलिक यांनी जमादार यांना रोखले नाही. एकूणच पाहता कागलच्या राजकारणात समरजित घाटगे यांना विजयी व्हायचे असेल, तर मंत्री मुश्रीफांपेक्षा संजय घाटगे यांचे आव्हान पहिल्यांदा स्वीकारावे लागणार आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.