Maharashtra Budget 2024, Rain lack of electricity
Maharashtra Budget 2024, Rain lack of electricity Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Budget : विधिमंडळात घोषणांचा धो-धो पाऊस सुरू होता, इकडे गावेच्या गावे अंधारात बुडत होती...

अय्यूब कादरी

Maharashtra Rain News : वीज वितरण कंपनीचा कारभार अनाकलनीय आहे. शहरी भागांतील नागरिकांना याचा कधीतरी अनुभव येत असावा, मात्र ग्रामीण भागातील नागरिकांच्या तो पाचवीलाच पूजलेला आहे. काल राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

तिकडे घोषणांचा धो धो पाऊस सुरू होता आणि इकडे ग्रामीण भागात एकेक गावे अंधारात बुडत होती. विधिमंडळात लाडकी बहीण योजना सादर होत असताना इकडे सरकारच्या लाडक्या बहिणी अंधाराशी दोन हात करत होत्या.

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील नागरिकांसाठी विजेचा लपंडाव नवा नाही. राज्यभरात ग्रामीण भागात कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. वीज वितरण कंपनीला जणू पावसाळा (Rain) सुरू होण्याचे निमित्तच लागते. पावसाचे दोन थेंब पडले रे पडले की वीज गायब झालीच समजायचे. मोठा पाऊस झाला तर वीज दोन-दोन दिवस गायब असते. (Maharashtra State Electricity Distribution)

वीज का गेली, ती परत कधी येणार? याची माहिती नागरिकांना मिळत नाही. कार्यालयात फोन लावला तर तिकडून प्रतिसाद मिळत नाही, असा नागरिकांचा अनुभव आहे. राज्याचा अर्थसंकल्प (State Budget) सादर व्हायच्या आधीच म्हणजे 28 जूनच्या भल्या पहाटेपासूनच उमरगा शहर आणि परिसरातील 15 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला.

उमरगा शहरातील 132 केव्ही वीज उपकेंद्रातील मुख्य ट्रान्स्फॉर्मरमध्ये अचानक बिघाड झाला. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. तोपर्यंत अन्य उपकेंद्रातून तात्पुरता वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे, असा मेसेज महावितरणतर्फे समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आला. आवश्यक तितकीच उपकरणे वापरा, गैरसोयीबद्दल क्षमस्व, असेही त्यात म्हटले होते.

अन्य केंद्रावरून वीजपुरठा सुरू केला आहे, या महावितरणच्या म्हणण्यात तथ्य नव्हते, कारण संपूर्ण उमरगा शहरात वीज नव्हती. काही भागांत वीजपुरवठा सुरू होता, तोही कमी दाबाने. ही झाली उमरगा शहराती स्थिती. ग्रामीण भाग महावितरणच्या खिजगणतीतही नसतो. तसा तो या अडचणीच्या काळातही नव्हता.

ग्रामीण भागातील म्हणजे उमरगा तालुक्यातील 15 गावांचा वीजपुरवठा 30 तासांनंतरही सुरळीत झाला नव्हता. मुख्य ट्रान्स्फॉर्मरमध्ये अचानक बिघाड झाला, असे महावितरणने व्हायरल केलेल्या संदेशात म्हटले आहे. कोणताही बिघाड सांगून होत नसतो. बिघाड झाला तर तो दुरुस्त कसा करायचा किंवा पर्याय काय उपलब्ध करायचा, याचा 'प्लॅन बी' तयार असला पाहिजे.

महावितरणची सध्याची अवस्था पाहता इतकी तत्परता आणि कल्पकता एखाद्या अधिकाऱ्यामध्ये असेल, असे वाटत नाही. सलग 30 तास वीज नसणे, याचा अर्थ काय असतो, त्याचे परिणाम काय असतात, त्यामुळे नागरिकांना किती अडचणी येतात? याची जाणीव महावितरणला आणि घोषणांचा धो धो पाऊस पाडणाऱ्या नेत्यांना नसेल का? असा प्रश्न निर्माण होतो.

लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. वीजपुरठ्याशी संबंधित पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी केंद्राच्या एका योजनेतून जवळपास 1200 कोटी रुपये निधी आणल्याचे त्यांनी प्रचारादरम्यान वारंवार सांगितले होते. उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनीही तालुक्यासाठी मोठा निधी आणला आहे. त्यात वीजपुरवठ्याशी संबंधित निधीही आहे. त्यातून तालुक्यात काही ठिकाणी नव्या उपकेंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.

पण वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार काहीकेल्या बंद होत नाहीत. महावितरणकडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे, असे सांगितले जाते. खांब उभारणीची कामे कंत्राटदारांकरवी केली जातात. खांबांची उभारणी काळजीपूर्वक केली जात नाही आणि अधिकारी त्यावर व्यवस्थित लक्ष ठेवत नाहीत. परिणामी, पाऊस पडला, वादळी वारे सुटले की असे खांब पडतात आणि वीज गायब होते. या संकटातून ग्रामीण भागातील नागरिकांची सुटका कधी होईल, याचे उत्तर सध्या तरी कोणाकडेही नाही.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT