pravin mane harswardan patil Dattatray Bharne  sarkarnama
विश्लेषण

Sharad pawar Politics : शरद पवार इंदापूरमध्ये मानेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून हर्षवर्धन पाटील अन् भरणेमामांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?

Roshan More

Sharad pawar Politics : लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती इंदापूर तालुक्याची.उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजकीय शत्रुत्व विसरत हर्षवर्धन पाटील यांच्याशी हातमिळवणी केली.खुद्द देवेंद्र फडणवीसांना यासाठी मध्यस्थी करावी लागली.त्यामुळे इंदापूरची विधानसभेची जागा अजित पवार हर्षवर्धन यांना सोडणार,याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र,देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीने दोघांमध्ये नेमके काय ठरले, हे जाहीर झाले नाही.लोकसभेत सुनेत्रा पवारांचा पराभव झाला.खुद्द हर्षवर्धन पाटील यांचे गाव असणाऱ्या बावड्यातून सुप्रिया सुळे यांना लीड मिळाले.

इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे हे अजित पवारांचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार ही जाग सोडतील, याची शक्यता जवळपास नाही. हेच ओळखून हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी जुनीच अपक्ष लढण्याची हाक दिली आहे. तर, हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी 'काहीही झालं तरी यावेळी हर्षवर्धन पाटील हे निवडणूक लढवणारच, ती कशी लढायची, यावर आताच काही बोलणार नाही. मात्र, निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत.', असे सांगत हर्षवर्धन पाटील निवडणुकीच्या रिंगणात असतील याचे संकेत दिले आहेत.

विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या खास मर्जीतील. महाविकास आघाडीचे सरकार आले त्यावेळी भरणे यांना मंत्रि‍पदाची लॉटरी लागली सोबत सोलापूरचे पालकमंत्रिपद देखील मिळाले. भरणे यांनी लोकसभेला सुनेत्रा पवारांना लीड देण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, लोकसभेचे वारे महाविकास आघाडीच्या बाजुने होते. महायुतीमध्ये विद्यमान आमदार असलेल्या जागा त्याच पक्षाकडे राहतील, असे सूत्र ठरते आहे. त्यामुळे इंदापूरची जागा अजित पवार यांच्याकडे राहणार आणि दत्तात्रय भरणे यांना अजित पवार यांच्याकडून पुन्हा संधी मिळणार हे निश्चित.

हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्या पुन्हा लढत होण्याची शक्यता असताना शरद पवार गटाने देखील मोठी खेळी केली आहे. अजित पवार गटात असलेले जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांना शरद पवार गटात प्रवेश दिला आहे. ते लवकरच पक्षप्रवेश करतील. विधानसभेसाठी प्रवीण माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. त्यामुळे इंदापूरमध्ये तिरंगी लढत अटळ मानली जात आहे.

अपक्ष पाटील भारी

पहिल्यांदा अपक्ष नंतर काँग्रेस आणि शेवटी भाजपमध्ये प्रवेश अशी राजकीय कारकीर्द असणारे हर्षवर्धन पाटील यांचा राजकीय इतिहास मोठा रंजक आहे. अपक्ष म्हणून आमदारकीची हॅटट्रीक हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. 1995, 1999 आणि 2004 असे सलग तीन वेळा हर्षवर्धन पाटील अपक्ष म्हणून विजयी झाले. 2009 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करत काँग्रेसच्या तिकीटावर पाटील पुन्हा आमदार झाले. 2014 मध्ये आघाडी तुटली त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढले. त्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा 14 हजार मतांनी पराभव केला.

2019 मध्ये पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत घरोबा केला. मात्र, विधानसभा निवडणुकीत पाटील यांना भरणे यांच्याकडून तीन हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. अपक्ष म्हणून सलग तीन वेळा विजय मिळवणारे पाटील हे अपक्ष म्हणून लढले तर पुन्हा यश मिळवतील, याचा आत्मविश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. म्हणूनच पोस्टरबाजी करत पुन्हा अपक्ष लढण्याची साद ते पाटील यांना घालत आहेत.

प्रवीण मानेंना मोठी संधी

इंदापूरचे राजकारण प्रामुख्याने दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या भोवती फिरते. मात्र या राजकारणात प्रवीण मानेंच्या शरद पवार गटातील एन्ट्रीने तालुक्यातील राजकीय समीकरणेच बदलली आहेत. मानेंची ताकद माहिती असल्यानेच लोकसभा निवडणुकीच्या आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण माने यांची घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर सुप्रिया सुळेंच्या प्रचारात दिसणारे माने यांनी ते अजित पवार गटासोबत असल्याचे जाहीर केले.

मात्र, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर प्रवीण माने अजित पवार गटाची साथ सोडून शरद पवार गटात सामील होत आहेत. 'सोनाई' परिवाराच्या माध्यमातून माने यांची मोठी ताकद आहे. लोकसभेनंतर महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. शरद पवार यांच्याविषयी तालुक्यात सहानुभूती आहे. त्यामध्ये विधानसभेला भरणे आणि पाटील यांच्यापेक्षा वेगळा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात असेल तर इंदापूरची जनता नक्कीच वेगळा विचार करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

दत्तात्रय भरणेंचा कस लागणार

छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक ते मंत्री असा राजकीय प्रवास असणाऱ्या अजित पवारांचे विश्वासू दत्तात्रय भरणे यांच्यासाठी विधानसभा निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. 2019 मध्ये भरणे यांनी अवघ्या तीन हजार मतांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. यंदा अजित पवार गटाकडून तेच निवडणुकीच्या रिंगणात असतील. मात्र, यावेळी त्यांच्यासमोर दोन उमेदवार असण्याची शक्यता आहे.

जातीय समीकरण भरणे यांच्यासाठी फारसे अनुकूल नसताना त्यांनी दोन वेळा विजय खेचून आणला. त्यामुळे अटीतटीची लढत ही भरणेंसाठी नवीन नाही. 2009 मध्ये पहिल्यांदा बंडखोरी करून निवडणूक लढणारे भरणे यांना ओबीसी मतदारांचा मोठा पाठींबा आहे. माने आणि पाटील यांच्यासोबत लढत होत असताना मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार यावरच भरणे यांचे गणित अवलंबून असेल.

जातीय समीकरण काय?

इंदापूर तालुक्यात मराठा, धनगर, माळी या जातींचे प्राबल्य आहे. 1992 पासून हर्षवर्धन पाटील यांच्यापाठी सर्व सामाजिक घटक उभे राहिल्याचे दिसते. मात्र, भरणे यांच्या एन्ट्रीने ओबीसी विरुद्ध मराठा असे सुरुवातीला चित्रे निर्माण झाले होते. मात्र, पुढे मराठा समाजातून देखील भरणे यांना पाठींबा मिळाल्याचे दिसते. धनगर आणि मराठा जाती जरी तुल्यबल असल्या तरी उघडपणे इंदापूरची निवडणूक कधीच जातीवर गेलेली नाही. छोट्या जाती ज्या उमेदवाराच्या पारड्यात मतं टाकतील त्याचे पारडे जड होते. त्यामुळे आपला सामजिक आधार कायम ठेवून जो उमेदवार इतर जात समुहांची मतं खेचून आणेल त्याच्या विजयाची शक्यता आणखी वाढेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT