Mamata Banerjee Sarkarnama
विश्लेषण

India Alliance Leadership: ढासळणाऱ्या वाड्याची डागडुजी लांबच,पण पाटीलकीसाठी हेवेदावे सुरू!

Mamata Banerjee Claim India Alliance Leadership : इंडिया आघाडीच्या नेतृत्वावरून वाद सुरू झाला आहे. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत. काँग्रेस गावागावांत पोहोचलेला पक्ष आहे. त्यामुळे आघाडीच्या केंद्रस्थानी काँग्रेस असून, नेतृत्व राहुल गांधीकडेच येण्याची शक्यता आहे. अशातच आता नेतृत्वासाठी ममता बॅनर्जी यांचे नाव समोर आले आहे.

अय्यूब कादरी

New Delhi News: इंडिया आघाडीचे नेतृत्व कोण करणार, यावरून आता वाद सुरू झाला. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या काँग्रेसच्या पीछेहाटीची त्याला पार्श्वभूमी आहे. तिकडे, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही तृणमूल काँग्रेसने भाजपला धूळ चारली आहे. त्यामुळेच इंडिया आघाडीच्या नेतृत्वासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव पुढे केले जात आहे. अशी चर्चा सुरू झाल्यामुळे इंडिया आघाडी एकजूट राहील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजप केंद्रात सलग तिसऱ्यांदा सत्तेत आला आहे, मात्र यावेळी भाजपला स्वबळावर बहुमत मिळालेले नाही. एनडीएतील पक्षांचा टेकू भाजपला घ्यावा लागला आहे. त्यातच हरियाणा, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला अनपेक्षित असे यश मिळाले. त्यामुळे केंद्र सरकारचा आत्मविश्वास वाढणे साहजिक आहे. तिकडे भाजप आणि एनडीए मजबूत होत असताना इकडे इंडिया आघाडीत नेतृत्व कोण करणार यावरून धुसफूस सुरू झाली आहे. इंडिया आघाडी ढासळायला लागली आहे. त्याची दुरुस्ती करण्याऐवजी पाटीलकी कोण करणार, यावरून वाद सुरू झाला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी काढलेल्या भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रांचा मोठा गाजावाजा झाला. या यात्रांमुळे त्यांचे मेकओव्हर झाले, प्रतिमा कमालीची सुधारली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 100 जागा मिळाल्या.

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे. जागा वाढल्यामुळे राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनले. अभ्यासपूर्ण मांडणीद्वारे त्यांनी अनेकवेळा सरकारची अडचण केली आहे. खरेतर, आघाडीसाठी ही सकारात्मक बाब ठरायला हवी होती, मात्र तसे झाल्याचे दिसत नाही.

ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. त्यांचे नेतृत्व आक्रमक आहे. पश्चिम बंगालमध्ये त्या भाजपला जशास तसे उत्तर देतात. त्यामुळे त्यांना टीकेलाही सामोरे जावे लागते. इंडिया आघाडीतही त्या अशीच आक्रमकता दाखवत आहेत. महाराष्ट्राच्या निवडणुकीत काँग्रेसची पीछेहाट झालेली असली तरी देशातील प्रत्येक गावात पोहोचलेला काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे.

काँग्रेस इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे नेतृत्व काँग्रेसकडेच राहणार, हे स्वाभाविक मानले जात होते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि वादाला सुरुवात झाली. त्यानंतरच नितीशकुमार आघाडीतून बाहेर पडले होते.

असे असताना आता ममता बॅनर्जी यांचे नाव समोर येऊ लागले आहे. राष्ट्रीय जनता दलाने नेते, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी बॅनर्जी यांचे नाव समोर केले आहे. बिहारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दला सोबत आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये अत्यंत सामंजस्याचे नाते आहे. असे असतानाही लालूप्रसाद यांच्याकडून ममता बॅनर्जी यांचे नाव पुढे केले जाणे आश्चर्यकारक मानले जात आहे. त्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे. आघाडी मजबूत, एकसंघ होण्याऐवजी त्याला तडे जाण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे.

काँग्रेस आणि डाव्या पक्षांमध्ये जवळीक आहेत. तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांत हाडवैर आहे. ममता बॅनर्जी यांचे नाव पुढे येण्याचे हेही एक कारण मानले जात आहे. नेतृत्व ममता बॅनर्जी यांनी केले काय आणि राहुल गांधी यांनी किंवा अन्य कुणीही केले तरी एका दिवसात चमत्कार होणार नाही. या नेतृत्वाला देश पिंजून काढावा लागणार आहेत.

केंद्र सरकारच्या कारभारातील त्रुटी लोकांसमोर मांडाव्या लागणार आहेत. कोणाला आवडो किंवा न आवडो, भाजपचे नेतृत्व मजबूत स्थितीत आहे, संघटनही मजबूत आहे. भाजपसमोर पाय रोवून उभे राहण्यासाठी काय करावे लागेल, हा इंडिया आघाडीसमोरचा प्रश्न असायला हवा.

त्यादृष्टीने इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी कधी विचार केलेला आहे का, असा प्रश्न आहे. प्रचंड शक्तिशाली असलेल्या भाजपला तोंड देणे तितके सोपे नाही, हे लक्षात घेऊनच त्यांना तयारी करावी लागणार आहे, मात्र चित्र तसे दिसत नाही.

एखाद्या निवडणुकीत चांगले प्रदर्शन करणाऱ्या इंडिया आघाडीची कामगिरी नंतरच्या अनेक निवडणुकांमध्ये खालावत जाते. हे असे का होते, यावरही विचारविनिमय झाल्याचे दिसत नाही. अपवाद वगळता आघाडीतील घटक पक्ष आपापले बालेकिल्ले शाबूत राखण्यातही यशस्वी ठरलेले नाहीत. अशा परिस्थितीत नेतृत्वावरून सुरू झालेला वाद अनाठायी असाच म्हणावा लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT