Eknath Shinde: शिवसेनेची ताकद BJP करतेय कमी? म्हणून शिंदेंनी दिल्लीला जाणं टाळलं; महायुतीच्या बैठकीची इनसाईड स्टोरी
Mumbai News: विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले असले तरी मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेनेने गृह, महसूल, बांधकाम या महत्वाच्या खात्यावर दावा ठोकला आहे. पण ही खाती देण्यास भाजपने नकार दिला आहे. ही खाती जर शिवसेनेला मिळाली तर, महायुतीत शिवसेनेचे वजन भाजपपेक्षा वाढेल, या शक्यतेने भाजपही या खात्यावर ठाम आहे.
विधानसभेत तब्बल ५७ जागा निवडून आणून एकनाथ शिंदे यांचे महायुतीतील वजन वाढलं आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना शिंदेंच्या मराठा चेहऱ्याची भाजपला चांगली मदत होत आहे. त्यामुले शिवसेनेला टाळून राज्यात कारभार करणे, भाजपला जड जाणार हे स्पष्ट आहे.
महायुतीत शिवसेनेची ताकद कमी करण्याचे काम भाजप करीत असल्याचा आरोप शिवसेनेच्या काही नेत्यांनी केला आहे. त्यामुळे महत्वाची खाती शिवसेनेला न देण्याचा कल भाजपचा आहे. शिंदे सरकारमध्ये गृहखाते हे भाजपकडे (देवेंद्र फडणवीस) होते.
शिंदेंनी मुख्यमंत्रीपद सोडले पण गृहमंत्रिपदावर ते अडून बसले असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. आता शिंदे उपमु्ख्यमंत्री आहेत, त्यामुळे गेल्या सरकारमध्ये हे खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते, ते आता शिंदेंकडे असावे, अशी ठाम भूमिका शिवसेनेचे घेतली आहे.
काल (बुधवारी) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बैठकीत चर्चा झाली. पण या बैठकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवली. मंत्रिमंडळ विस्तारात अपेक्षीत खाते न मिळत असल्याने शिंदे नाराज असल्याचे बोलले जाते. त्यामुळे ते दिल्लीला गेले नाही, असे समजते.
फडणवीस, अजितदादा बुधवारी दिल्लीला गेले. फडणवीसांची भाजप नेत्यांसोबत तर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मंत्रिपदावर चर्चा केली. चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेही उपस्थित होते. फडणवीस आणि अजित पवार दिल्लीमध्ये असताना एकनाथ शिंदे मात्र ठाण्यातच होते. शिंदे दिल्लीला का गेले नाहीत? हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
राष्ट्रवादी आणि भाजप शिवसेनेची महायुतीतील ताकद कमी करण्यासाठी एकत्र काम करीत असल्याचा सूर शिवसेनेत आहे. मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर नगर विकास आणि महसूलपैकी एक खाते शिवसेनेने घ्यावे, असे भाजपने सूचवले आहे. पण या दोन्ही खात्यावर आपला अधिकार असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.
मंत्रिमंडळ विस्तार 14 किंवा 16 डिसेंबर होण्याची शक्यता आहे. 16 डिसेंबरपासून नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणे गरजेचे आहे. आज महायुतीच्या बैठकीत शिवसेनच्या पदरात काय पडेल, हे लवकरच समजेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.