
Kolhapur News: लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरची जागा सोडल्यामुळे आणि हातकणंगलेतील निसटत्या पराभवामुळे कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेची पिछेहाट झाली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत सुफडासाफ झाल्यानंतर जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहेत.
केवळ महाविकास आघाडीतील इतर नेत्यांच्या सोबत केलेल्या वाटाघाटीमुळेच आता ठाकरेंची शिवसेना जिल्ह्यात अडचणीत सापडली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला कोणी लीडर देता का लीडर? अशी म्हणण्याची वेळ आली आहे. निष्ठावंत शिवसैनिक देखील जिल्ह्याच्या नेतृत्वावर खासगीत उघड उघडपणे आरोपासह नाराजी व्यक्त करताना दिसतात.
एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार, दोन खासदार दिल्याने सेनेला चांगले दिवस पाहायला मिळाले. मात्र शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर जिल्ह्यात निष्ठावंत शिवसैनिकांनी शिंदेंच्या शिवसेना नेत्यांवर आगपाखड केली.
गद्दार म्हणून हिणवत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. निष्ठावंत म्हणून घेणाऱ्या शिवसैनिक नेत्यांनाच जनतेने जागा दाखवून दिली. लोकसभा विधानसभा निवडणुकीत अपयश मिळाल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला जिल्हास्तरावर नेतृत्व नाही.
जे नेतृत्व आहे त्यांच्यावर निष्ठावंत शिवसैनिक आरोपांसह खाजगीत नाराजी व्यक्त करून दाखवतात. केवळ आंदोलनापुरतेच जिल्ह्यातील नेते शिवसैनिक आहेत, अशी भावना ही निष्ठावंत शिवसैनिकांची आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला ठाकरेंच्या शिवसेनेसाठी शिवसैनिकांना बळ देणारा लीडर देण्याची गरज आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत असताना शिवसेनेने जागेवरील ताबा सोडल्यानंतर विधानसभा निवडणुकीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली. मात्र काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली. अशावेळी ठाकरे यांच्या शिवसेनेला ही जागा दिली असती, तर महापालिकेला पूरक वातावरण निर्माण झाले असते.
आघाडीधर्म म्हणून ठाकरेंच्या शिवसेना नेतृत्वाने जिल्ह्यातील उमेदवारांच्या स्टेजवर भाषणे ठोकली. पण निष्ठावंत शिवसैनिकाला सोबत घेता आले नाही. नेतृत्व समजल्या जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर उत्तर जागा मागणी संदर्भात बळ दिले असते तर आजचे चित्र वेगळे असते. मात्र वाटाघाटीमुळे कोल्हापूर उत्तर ची जागा ही निसटली.
आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील नेतृत्वावर निष्ठावंत शिवसैनिकांचा भरोसा राहिलेला नाही. उरले सुरलेले निष्ठावंत शिवसैनिक इतर पक्षातील नेत्यांच्या धावणीला बांधले जाईल ही भीती निष्ठावंत शिवसैनिकांना आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला खमक्या लीडरची गरज सध्या तरी कोल्हापूर जिल्ह्यात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.