India-Pakistan Simla Agreement : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर आणि आक्रमक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा कॅबिनेट समितीची (CCS) बैठक पार पडली.
या बैठकीत भारताने पाकिस्तानची राजनैतिक कोंडी करणारे पाच मोठे निर्णय घेतले. यामध्ये सिंधू पाणी करार स्थगित करण्यासह पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडून जाण्याचे आदेश भारत सरकारने दिले. भारताच्या या निर्णयानंतर संतापलेल्या पाकिस्तानने थेट सिमला करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
तसंच भारतीय विमानांसाठी पाकिस्तानी हवाई हद्द बंदी, वाघा सीमा बंद करण्यासह भारताशी सर्व प्रकारच्या व्यापार बंदीचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. पकिस्तानच्या या निर्णयानंतर सध्या 'सिमला करार' सर्वाधिक चर्चेत आहे. तर हा करार नेमका काय आहे आणि तो रद्द केल्यास त्याचे दोन्ही देशांवर काय परिणाम होऊ शकतात याबाबतची माहिती जाणून घेऊया.
1971 साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धानंतर 2 जुलै 1972 रोजी दोन्ही देशांमध्ये सिमला करार झाला. या करारावर भारताकडून इंदिरा गांधी आणि पाकिस्तानकडून झुल्फिकार अली भुट्टो यांनी स्वाक्षरी केली. या करारानंतर तब्बल 90 हजारांहून अधिक पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय लष्करापुढे शरणागती पत्करली होती.
त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता अबाधित ठेवण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध चांगले ठेवण्यासाठी हा करार करण्यात आला होता. या करारात भारत आणि पाकिस्तानमधील लोक सहज ये-जा करू शकतील, द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करू शकतील. यासह आपापसातील संघर्ष आणि वाद संपवण्याचा प्रयत्न करतील आणि उपखंडात कायम मैत्रीसाठी काम करू असं आश्वासन दोन्ही देशांनी एकमेकांना दिलं होतं.
तसंच पूर्वीचे जे वाद असतील किंवा समस्यांवर शांततापूर्ण निर्णय घेण्याबाबत थेट चर्चा केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत एकतर्फी कारवाई केली जाणार नाही, असंही या करारात ठरलं होतं. शिवाय दोन्ही देश एकमेकांविरूद्ध बळाचा वापर करणार नाहीत, एकमेकांच्या राजकीय स्वातंत्र्यात हस्तक्षेप करणार नाहीत, असा ठराव 1972 च्या सिमला करारात करण्यात आला होता.
दरम्यान, आता पाकिस्तानने या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाचे कायदेशीर आणि भू-राजकीय परिणाम होऊ शकतात. शिवाय दोन्ही देशांतील राजनैतिक संबंध बिघडू शकतात. दोन्ही देशांनी ठरवलेल्या नियंत्रण रेषेचे पालन करण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊन बॉर्डरवर तणाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिणामी बॉर्डरवर चकमकी होऊन युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.
तर दुसरीकडे सिमला करार पाकिस्तानने रद्द केल्यास भारत आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानविरुद्ध कारवाईची मागणी करू शकतो. भारत पाकिस्तानविरोधात भूमिका घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडत त्या देशाची मोठी राजनैतिक कोंडी करू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.