Raosaheb danve, Abdul sattar Sarkarnama
विश्लेषण

Marathwada News: अब्दुल सत्तार-रावसाहेब दानवे यांच्यात खरेच वाद आहे का? जाणकारांना वेगळेच वाटते !

Abdul Sattar Vs Raosaheb Danve: शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार आणि भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे या मराठवाड्यातील दोन बड्या नेत्यांमध्ये वाद पेटला आहे.

अय्यूब कादरी

Maharashtra Vidhan Sabha Election: शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार आणि भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे या मराठवाड्यातील दोन बड्या नेत्यांमध्ये वाद पेटला आहे. वरकरणी हा वाद वाटत असला तरी ते केवळ नाटक आहे, आपलेच वर्चस्व कायम राहावे, तिसऱ्याने कुणी येऊ नये, असे या दोघांचीही रणनिती असल्याचे राजकीय क्षेत्रातील जाणकारांना वाटत आहे.

राज्याचे मंत्री, शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यात सुरू असलेला वादामुळे राजकीय क्षेत्रातील जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तोंडावर या दोन नेत्यांमध्ये उघड वाद सुरू असतानाही महायुतीचे वरिष्ठ नेते गप्प का बसलेले आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तसे पाहिले तर सत्तार आणि दानवे पूर्वश्रमीचे मित्र आहेत. सत्तार हे काँग्रेसमध्ये असतानाही त्यांची दानवे यांच्याशी मैत्री होती. रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे जालना लोकसभा मतदारसंघातून पाचवेळा विजयी झाले आहेत. या निवडणुकांमध्ये सत्तार यांनी त्यांना नेहमी मदतच केल्याचे सांगितले जाते.

दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे भोकरदन मतदारसंघाचे आमदार आहे. सत्तार यांचा सिल्लोड विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे हे दोन्ही नेते एकमेकांना मदतच करत आले आहेत.

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांचा पराभव केला. महायुतीत असलेले सत्तार यांनी या निवडणुकीत डॉ. काळे यांना मदत केल्याचे जाहिरपणे सांगितले. त्यानंतर या दोन नेत्यांमध्ये वाद सुरू झाला. विधानसभेचे मतदान तोंडावर आलेले असतानाही हा वाद थांबायचे नाव घेत नाही.

वादाच्या बातम्या होत आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे महायुतीबाबात चुकीचा संदेश जात आहे, असे सर्वसाधारण मत बनले आहे. मात्र, असे मत तयार करणे थोडे घाईचे ठरणार आहे.

सत्तार आणि दानवे यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे दिसत आहेत. दोघांच्या समर्थकांनी एकमेकांच्या विरोधात मोर्चे काढले आहेत. बंदची हाकही देण्यात आली होती. तरीही पक्षश्रेष्ठींनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. सत्तार आणि दानवे यांच्यातील वाद हा वरवरचा, दाखवण्यासाठीचा आहे. ते आतून एकच आहेत, असे राजकीय विश्लेषक प्रा. जयदेव डोळे सांगतात.

सत्तार काँग्रेसमध्ये होते त्यावेळेसपासूनच त्यांचा दानवे यांना फार विरोध नव्हता. उलट सत्तार हे रावसाहेब दानवे यांना मदत करायचे. अन्यथा सलग पाचवेळेस निवडून येणे दानवेंना शक्य झाले नसते. काँग्रेसचे काही स्थानिक कार्यकर्ते रावसाहेब दानवेंचा विरोध करायचे. दानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, खासदार होते, केंद्रात मंत्री होते. त्यामुळे त्यांचा विरोध करणे सत्तार यांना परवडणारे नव्हते, असे प्रा. डोळे यांचे मत आहे.

सत्तार यांच्या शिक्षणसंस्था आहेत. त्या संस्थांमध्ये सर्वकाही आलबेल आहे, असे म्हणता येणार नाही. सत्तार आणि दानवे यांच्यात खरेच संघर्ष असता तर ईडीने सत्तार यांच्या संस्थावर कारवाई केली असती, असेही प्रा. डोळे यांना वाटते. दानवे यांनीही ईडी चौकशीची मागणीही केलेली नाही. कामे अडतात, त्यामुळे सत्तार यांना दानवे यांच्यासमोर शरण जावेच लागते. ही भांडणे, वाद वरवरची असतात. आतून ते एकमेकांना मदत करतच असतात.

रावसाहेब दानवे हे थेट भाजपमध्ये आलेले आहेत. त्यामुळे सामाजिक सलोख्याला नख लागेल, अशी भाषा ते वापरत नाहीत, धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी विधाने त्यांनी केल्याचे मला तरी आठवत नाही. हे एक असे मराठा नेते आहेत जे इतरांना आश्रय देतात, त्यांची मदत घेतात आणि मदत करतातही, असे प्रा. डोळे सांगतात.

वाद निर्माण करण्याचा एक फायदा असा असतो की येथे आम्ही दोघेच आहोत, तिसऱ्याने कुणी येथे यायचे काम नाही, असे वातावरण निर्माण करता येते. सत्तार आणि दानवे यांनी नेमकी अशीच परिस्थिती निर्माण केली आहे. डॉ. कल्याण काळे हे आमदार होते, खासदार आहेत, मात्र ते प्रभावी नेते नाहीत.

दानवे आणि सत्तार यांचाच प्रभाव आहे. ते एकमेकांना धक्का लावत नाहीत, एकमेकांना उखडून टाकण्याचे प्रयत्न करत नाहीत. अर्जुन खोतकर, कैलास गोरंट्यालही जालना जिल्ह्यात आहेत, मात्र वर्चस्व दानवे आणि सत्तार यांचेच आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे त्यांच्यातील वाद हे नाटक आहे. अन्यथा त्यांच्या पक्षांच्या वरिष्ठांनी त्यांच्यावर कारवाई केलीच असती, असेही प्रा. डोळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT