जयंत पाटील यांनी 7 वर्षांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर इस्लामपूर आणि सांगलीवर लक्ष केंद्रित केले आहे.
ते विरोधकांवर बसून कार्यक्रम लावण्याची तयारी करत आहेत.
राजीनाम्यानंतरही त्यांची रणनीती आक्रमक राहणार आहे.
Sangli Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील काहीसे रिलॅक्स झाले आहेत. मागच्या 7 वर्षांपासूनची खांद्यावरील जबाबदारी हलकी झाल्यानंतर रिलॅक्स होणे सहाजिक आहे. पण हा निवांतपणा ते आता इस्लामपूर मतदारसंघात आणि सांगली जिल्ह्यात वापरत आहेत. विरोधकांचा बसून कार्यक्रम लावण्याचे नियोजन करत आहेत. तसा इशाराच त्यांनी दिला आहे. (Jayant Patil relaxed after resigning from NCP presidency but warns opposition of political action in Sangli and Islampur)
जयंत पाटील मागील 7 वर्षांपासून प्रदेशाध्यक्षपदावर होते. या काळात राज्यभराची जबाबदारी असल्याने त्यांना इस्लामपूर मतदारसंघात लक्ष देण्यास फार वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे इस्लामपूरमधील त्यांच्या संस्था, दूध संघ, कारखान्यातीलही लक्ष कमी झाले. त्यातून ओढावलेल्या नाराजीचा परिणाम त्यांच्या मताधिक्यावर झाला. निशिकांत पाटील यांनी त्यांना कडवी टक्कर दिली.
एरव्ही आरामात निवडून येणाऱ्या पाटील यांना यावेळी प्रचंड संघर्ष करावा लागला. गोळी अगदी त्यांच्या कानावरून गेली. ही संधी साधून महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी एकाच तालुक्यातून जिल्हाध्यक्ष दिले. यामुळे जयंत पाटील यांची कोंडी झाल्याचे बोलले जात होते. पण आता राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील इस्लामपूरमध्ये अधिक लक्ष घालताना, मतदारसंघाची पुनर्बांधणी करताना दिसून येत आहे.
महायुतीच्या आक्रमकपणामुळे गिअर बदलला?
विधानसभेनंतर माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह काही नेते, जयंत पाटील यांचे समर्थक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले आहेत. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे त्यांच्या दोन्ही मुलांसह भाजपमध्ये गेले आहेत. महायुतीकडून वाढलेल्या हल्ल्यांना जयंत पाटील यांनीही आक्रमक प्रत्युत्तर दिले. त्यात स्वकियांनाही इशारा दिला. तसेच जयंतरावांनी मुख्यमंत्र्याकडे मोर्चा वळवत खोचक टीका देखील केली.
पक्षप्रवेशांवर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले, विरोधकांकडून ऑफर येत असतात, जे फुटणार ते फुटत राहतात. पण पक्षासह माझ्याबरोबर ज्यांना थांबायचे आहे ते थांबतील, बाकीचे जातील. मात्र, माझा एक प्रॉब्लेम आहे, समोरून विरोध होत नाही, तोपर्यंत मी शांत असतो. जेव्हा विरोध सुरू होतो, त्यावेळी माझ्यातला ‘ओरिजनल’ माणूस जागा होतो. त्यामुळे ‘थोडं थांबा आणि बघा पुढे काय होतंय ते’, असं म्हणत त्यांनी पक्ष फोडणाऱ्यांनाही इशारा दिला.
तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ज्यांनी महायुतीचा रस्ता धरला आहे किंवा जे मार्गावर आहेत. त्यांना देखील त्यांनी, ज्यांना जायचे त्यांनी आताच पक्ष सोडून जावे. मी आता मोकळाच आहे. महापालिका निवडणुकीवेळी जर कोणी पक्ष सोडला तर त्यांचा कार्यक्रम करणार. ऐनवेळी जाऊन कोंडी करायचा प्रयत्न करायचा नाही. अन्यथा मी आता मोकळाच आहे. बसून कार्यक्रम लावीन, असा दम पाटील यांनी कार्यकर्त्यांना भरला होता.
पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनाही सोडलं नाही. आपल्या भाजप प्रवेशावर सतत वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांना आणि देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच सुनावले होते. "प्रवेशासाठी त्यांच्याकडे मुळात अर्जच कोणी केला आहे? त्यांचे आता 238 आमदार झाले असून त्यांनी पक्ष प्रवेशापेक्षा जरा राज्याकडे लक्ष द्यावं. ते चालवण्याकडे लक्ष द्यावं.
सध्या सत्ता असेल तिकडे जाण्याची प्रथाच पडली असून सत्तेतील तिन्ही पक्ष विरोधकांना गळ टाकत बसले आहेत. तसाच प्रकार जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे मी एकटाच असा नाही, जिल्ह्यामध्ये बरेच मोठे नेते आहेत. त्यामुळे ते नेमके कोणाला भाजपमध्ये घेणार, हे तुम्हीच मुख्यमंत्र्यांना विचारा. मात्र मी काही त्यांच्याकडे अर्ज केलेला नाही, असा टोला लगावला होता. सध्या जयंत पाटील यांचा बदलेला रोख आणि त्यांचा इशारा, त्यांनी थोपाटले दंड पाहता आगामी विरोधकांसाठी म्हणावी तितकी सोपी नसणार हे नक्की.
प्र.१: जयंत पाटील यांनी कोणत्या पदाचा राजीनामा दिला?
उ: त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
प्र.२: राजीनाम्यानंतर ते काय करत आहेत?
उ: ते इस्लामपूर आणि सांगली जिल्ह्यातील विरोधकांवर लक्ष केंद्रित करत आहेत.
प्र.३: पाटील यांनी विरोधकांना कोणता इशारा दिला?
उ: त्यांनी विरोधकांचा बसून कार्यक्रम लावण्याचा इशारा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.