eknath khadse  sarkarnama
विश्लेषण

Eknath Khadse : एकेकाळी भाजपमध्ये वजन असलेले खडसे त्याच पक्षातल्या विरोधकांमुळे बेजार

अय्यूब कादरी

भाजपचे ज्येष्ठ नेते, एकेकाळचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा कोंडीत सापडले आहेत. भाजपमध्ये जाणार, असे त्यांनी जाहीर केले होते, मात्र प्रवेशाचे अद्यापही भिजतघोंगडेच आहे. त्यामुळे खडसे यांच्या संयमाचा कडेलोट झाला असून, त्यातूनच त्यांनी आपण पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ शकतो, अशा इशारा देऊन टाकला आहे. आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत असलेल्या खडसे यांना त्यांच्या भाजपमधील विरोधकांनी हतबल करून टाकले आहे.

एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) हे विरोधी पक्षनेते होते. राज्यात 2014 मध्ये शिवसेना-भाजपची सत्ता आली. आपल्याला मुख्यमंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा खडसे यांना होती, मात्र ती फोल ठरली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. खडसे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. काही काळानंतर खडसे यांचे नाव भूखंड घोटाळ्यात आले. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या अनेक सहकाऱ्यांची नावे विविध घोटाळ्यांत आली होती. त्या सर्वांना फडणवीस यांनी क्लीन चिट दिली, मात्र खडसे यांच्या बाबतीत तसे झाले नाही. त्यांची चौकशी सुरू झाली आणि त्यामुळे खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर खडसे यांचा भाजपमधील वाईट काळ सुरू झाला. पक्षाने, विशेषतः काही नेत्यांनी खडसे यांच्याकडे दुरल्क्ष केले. पक्षाच्या उभारणीत खडसे यांचे मोठे योगदान असतानाही त्यांना वाळीत टाकण्यात आले. त्यामुळे खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी खडसे यांना विधान परिषदेवर संधी दिली. राष्ट्रवादीत आल्यानंतर खडसे यांनी देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यावर अनेकवेळा टीका केली, फडणवीस यांनी आपले राजकारण संपवण्याचा डाव आखला होता, असा आरोपही त्यांनी केला होता.

खडसे यांच्यासह त्यांचे जावई आणि अन्य कुटुंबीयांवर सहा खटले सुरू आहेत. या सर्व प्रकरणांची चौकशी सुरू आहे. खडसे यांच्या प्रकृतीबाबत अनेक समस्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचे जाहीर केले होते. विनोद तावडे यांच्या माध्यमातून दिल्लीत जाऊन त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही त्यांनी भेट घेतली होती. त्यावर राज्यातील भाजपच्या काही नेत्यांनी तिरकस टीका केली होती. खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या या नेत्यांनी उडवून लावल्या होत्या. आपल्याला त्याबाबत काही कल्पना नाही, असे सांगत या नेत्यांनी खडसे यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. अर्थातच, या नेत्यांचा खडसे यांच्या भाजप प्रवेशाला विरोध आहे, हे स्पष्ट झाले आहे.

खडसे यांच्या सून रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाल्या आहेत. निवडणुकीत खडसे यांनी सूनबाईंना मदत केली होती. खडसे यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचे जाहीर केले असले तरी त्यांच्या कन्या रोहिणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात राहण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव, रावेर आणि अन्य काही मतदारसंघांत खडसे यांची भाजप उमेदवारांना मदत झाली, असे सांगितले जाते. असे असतानाही त्यांचा भाजपप्रवेश अजूनही रखडलेलाच आहे. फडणवीस, महाजन यांचा त्यांच्या भाजप प्रवेशाला विरोध आहे, हे एव्हाना उघड झाले आहे.

आता खडसे यांच्या संयमाचा कडेलोट झाला आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा परत जाऊ शकतो, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यालाही भाजपमधील त्यांच्या विरोधकांनी फारसे गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. उलट, मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्यावर टीका केली आहे. आमदार पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे त्यांच्या टीकेला महत्व आहे. आमदार पाटील यांच्या आडून फडणवीस, महाजन हेच बोलत आहेत, याची खडसे यांना कल्पना आहे. फडणवीस, महाजन यांना कंटाळूनच खडसे यांनी भाजप सोडला होता. आता त्यांच्या घरवापसीलाही या दोघांकडूनच विरोध होत असल्याचे चित्र आहे. तसे नसते तर खडसे यांचा आतापर्यंत भाजपमध्ये प्रवेश झाला असता. फडणवीस, महाजन यांच्यामुळे खडसे यांची पुन्हा कोंडी झाली आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT