Eknath Khadse News : खरं सांगा... नाथाभाऊ, तुमच्या मनातला नेमका पक्ष कोणता; भाजप की राष्ट्रवादी?

BJP Vs NCP Sharad Pawar Politics : आता लोकसभा निकालाला जवळपास तीन महिने उलटून गेले आहेत तरी अद्याप खडसेंचा भाजप प्रवेश रखडलाच आहे. तर फडणवीस टीमकडून खडसेंना डिवचण्याचं कामही जोरदारपणे सुरू आहे.त्यात मंत्री गिरीश महाजन आघाडीवर आहे. पण आता सगळ्या घडामोडीत खडसेंनी सोमवारी (ता.2) राज्याच्या राजकारणात मोठा दावा करुन खळबळ उडवून दिली.
Devendra Fadnavis  eknath Khadse  Sharad Pawar.jpg
Devendra Fadnavis eknath Khadse Sharad Pawar.jpgSarkarnama
Published on
Updated on

Eknath Khadse News : एकनाथ खडसे एकेकाळी महाराष्ट्र भाजपचा आक्रमक आणि प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर राज्याच्या राजकारणात 'देवेंद्र पर्वा'चा उदय झाला अन् त्यांनी भाजपवर पूर्ण पकडही मिळवली. तर दुसरीकडे फडणवीसांच्या मुत्सद्दी राजकारणात खडसे पूर्णत: झाकोळले गेले. तसा या दोन्ही नेत्यांमधला संघर्षही नंतर दिवसागणिक टोकाला गेला. शेवटी खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि विधान परिषदेची आमरकीही मिळवली.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) राष्ट्रवादीत रमले असे वाटत असतानाच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या स्वगृही परतण्याच्या चर्चाही सुरू झाल्या.एकेदिवशी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जे.पी.नड्डा यांच्यासोबतच्या दिल्ली भेटीचा सोशल मीडियावर टाकत आपल्या भाजप प्रवेशाचे जोरदार संकेत दिले आणि लवकरच स्वगृही परतण्याच्या कार्यक्रमही होणार असल्याचं म्हटलं.त्यानंतर खडसेंनी स्नुषा रक्षा खडसे यांच्या विजयासाठी रावेरमध्ये जोर लावला आणि निवडूनही आणले.

आता लोकसभा निकालाला जवळपास तीन महिने उलटून गेले आहेत तरी अद्याप खडसेंचा भाजप प्रवेश रखडलाच आहे. तर फडणवीस टीमकडून खडसेंना डिवचण्याचं कामही जोरदारपणे सुरू आहे.त्यात मंत्री गिरीश महाजन आघाडीवर आहे.पण आता सगळ्या घडामोडीत खडसेंनी सोमवारी(ता.2)राज्याच्या राजकारणात मोठा दावा करुन खळबळ उडवून दिली.

एकनाथ खडसे यांनी सोशल मीडियाशी संवाद साधताना, आपण भाजपमध्ये प्रवेश करणार अशी विनंती केली होती. मात्र, त्यावर पक्षश्रेष्ठींकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. अद्याप आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य आहोत असं विधान केलं आहे.

तसेच राष्ट्रवादीच्या सदस्यपदाचा राजीनामा शरद पवार (Sharad Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडे सोपवला आहे. पण त्यांनी अद्यापही तो स्वीकारलेला नाही. त्यामुळे अजूनही आपण राष्ट्रवादीचे आमदार आहोत. अशा स्थितीत सध्या मी आहे. मात्र, आणखी काही दिवस भाजपच्या प्रतिसादाची आपण वाट पाहणार आहोत. नाहीतर आपला पक्ष राष्ट्रवादी असून तो पुन्हा जॉईन करणार आहे असं वक्तव्य खडसे यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Devendra Fadnavis  eknath Khadse  Sharad Pawar.jpg
Jayant Patil : गद्दारांचा हिशोब करायचा आहे! जयंत पाटलांनी चंदगडात जाऊन कुणाला दिला इशारा

विधान परिषदेची आमदार एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती.तसेच आपला प्रवेश राज्यात नव्हे तर दिल्लीत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांनी आपली सून आणि भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावली. त्यामुळे रक्षा खडसे यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवताना खडसेंच्या राजकीय अनुभवाचा मोठा फायदा झाला.

लोकसभा निकालानंतर खडसेंचा भाजप प्रवेश कधी होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं.पण राज्यातील प्रमुख नेत्यांशी जुळवून घेण्यात त्यांना अजून म्हणावं तितकं यश आलेलं नाही.आणि राज्यातील नेत्यांनीही खडसेंना मनापासून स्विकारलेलं नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वजन पाहता इतक्या सहज खडसेंना पुन्हा भाजपात एन्ट्री मिळेल असं चित्र सध्यातरी दिसून येत नाही.

Devendra Fadnavis  eknath Khadse  Sharad Pawar.jpg
Mahesh Kothe : महेश कोठेंनी अखेर ‘सोलापूर शहर उत्तर’मधून फुंकली विधानसभेसाठी तुतारी!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीतील पक्षश्रेष्ठीही राज्यातील प्रमुख नेत्यांची नाराजी ओढवून घेण्याच्या मानसिकतेत नाही. पुन्हा खडसेंना प्रवेश दिला त्यांना कोणती मोठी जबाबदारी द्यावी लागणार,राज्यातील भाजप नेते त्याला संमती देणार का? खडसेंचा एकंदर स्वभाव पाहता भाजप आणि महायुतीतील नेत्यांशी खरंच कितपत जुळवून घेतील याविषयी साशंकताच आहे.

त्यांच्या पक्षप्रवेशामुळे आधीच संकटात सापडलेली महायुती आणखी अडचणीत येऊ शकते. खडसेंचं वय आणि प्रकृती पाहता त्यांचा भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत खरंच किती फायदा होऊ शकतो याविषयीही दिल्लीतील नेत्यांमध्ये प्रश्नचिन्ह असल्याचे बोलले जात आहे.

पण नाथाभाऊंनी आजचं विधान करुन भाजपलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.पण आजचा विचार केला तर त्यांचा मूळ हेतू साध्य झालेला आहे.रक्षा खडसे यांना भाजपने तिकीटही दिलं,त्या तिसर्यांदा खासदारही झाल्या.मंत्रिपदही मिळालं, खडसेंची आमदारकीही अजूनही शाबूत आहे.मुलगी रोहिणी खडसे यांच्याकडे महिला प्रदेशाध्यक्षपदासारखी मोठं पद आहे.त्यामुळे खडसेंची सध्या अजूनतरी फार काही महत्त्वाकांक्षा शिल्लक राहिलेली असेल असे वाटत नाही.

सगळं काही ठिकठाक करुन खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्याऐवजी राष्ट्रवादीतच थांबण्याच्या मानसिकतेत असल्याची चर्चा आहे.तर दिल्लीत फिल्डिंग लावून विनोद तावडेंसारखं राष्ट्रीय पातळीवर नवी जबाबदारी घेऊन पक्षासाठी लढत राहायचं असंही नियोजन नाथाभाऊंचं असू शकते.

Devendra Fadnavis  eknath Khadse  Sharad Pawar.jpg
Vibhav Kumar : स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी विभव कुमारला सर्वोच्च न्यायालयाकडून अटींसह जामीन मंजूर!

एकनाथ खडसेंनी ज्याप्रकारे भाजप विशेषत:देवेंद्र फडणवीसांवर टीका करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानुसार ते पुन्हा भाजपचं दार ठोठावतील असं वाटलं नव्हतं आणि तेही इतक्या कमी काळात.पण लोकसभेआधी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत त्यांनी ते घडवून आणलं.मात्र,प्रचारातही ते राज्यातील नेत्यांसोबत दिसले नाही.

तरीदेखील त्यांनी वेळोवेळी आपला भाजप प्रवेश होणारच असं ठणकावून सांगितलं होतं.पण त्याला अजूनही ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. त्याचमुळे रखडलेल्या पक्षप्रवेशामुळे की आपला जो हेतू होता तो साध्य झाला म्हणून त्यांनी भाजपलाच अल्टिमेटम देत आपण राष्ट्रवादीचं कार्ड वापरून खिंडीत गाठलं आहे.

पण त्यांचा कट्टर समर्थक भाजपची मानसिकता सोडून राष्ट्रवादीशी जुळवून घ्यायला तयार झाला, तोच त्यांनी घरवापसीचे संकेत दिले.आणि दोन तीन महिन्यांतच पुन्हा राष्ट्रवादीच बरी अशी भूमिका घेण्याचे बोलू लागले.तेव्हा हा संभ्रमावस्थेतला कार्यकर्ता त्यांना नक्की मनातला प्रश्न विचारत असणार की,नाथाभाऊ खरं सांगा नेमका तुमचा पक्ष कोणता, राष्ट्रवादी की भाजप..?

Devendra Fadnavis  eknath Khadse  Sharad Pawar.jpg
Eknath Khadse : खडसे 'राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश करणार' म्हणताच भाजपकडून आली पहिली प्रतिक्रिया...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com